Thursday, January 28, 2010

सदैव – पान १२

प्रतिक्रिया: 
मोई स्तिमित होऊन मिंगचं बोलणं ऐकत होती. इतका गहन विचार तर तिने केलाच नव्हता. हुन श्रीमंत आहे आणि आपल्याशी संबंध वाढवण्यासाठी तो खोटं बोलला या पलिकडे तिचे विचार जातच नव्हते. तिला हुनसोबतचे क्षण आठवू लागले. एकही क्षण असा नव्हता जिथे हुनने तिची आणि तिच्या सन्मानाची काळजी घेतली नाही. हुनच्या सहवासात तिला सुरक्षितच वाटलं होतं. ती भानावर आली. मिंग पुढे काहीतरी बोलत होती.

“....मोई, हुन तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो गं. त्याचं प्रेम धुडकावणं म्हणजे देवाची पुजा धुडकावण्यासारखं आहे. तो तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाण्याआधीच त्याला थांबव. नाहीतर खूप उशीर होईल.”

मिंगचे हे शब्द ऐकल्यावर मात्र मोईचा संयम सुटला. आपली सॉन्ग तिथेच टाकून ती मागे वळली. धावत धावत पुन्हा नदीच्या दिशेने गेली. तिने जवळ जाऊन पाहिलं तर हुन जिथे बसला होता, ती जागा रिकामी होती. तिने आजूबाजूला पाहिलं. कुठेच हुनची चाहूल नव्हती. मोईच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. तिने न रहावून त्याला जोरात हाक मारली.

“हुनऽऽऽ, कुठे आहेस तू? मी.... मी आलेय. हुनऽऽऽऽ परत ये. खरंच, परत ये. मला माफ कर, मी खूप त्रास दिला तुला.... परत ये हुन.... तुझ्या मोईसाठी, परत ये....” तिला बोलवेना. आपला चेहेरा दोन हातांनी झाकून ती वाळूत बसली. तिला हुंदके अनावर होत होते.

अचानक आपल्या जवळ कुणी तरी येऊन उभं राहिल्याची तिला जाणीव झाली. तिने मान वर करून पाहिलं. तिचा हुन परत आला होता. हुनने तिचे दोन्ही दंड धरून तिला उठवलं, तिचे अश्रू पुसले. काही क्षण ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात एकटक पहात होते. प्रेमाशिवाय तिथे काहीच नव्हतं. हुनचे ओठ बोलण्यासाठी विलग झाले.

“मोई, मला माफ....” मोईने हुनला बोलू न देता पटकन त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. वळणावर उभ्या असलेल्या मिंगच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वहात होते आणि ते पुसावेत असं तिला अजिबात वाटत नव्हतं.
********

सरदार हुआन आज खूपच आनंदात होते. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा आज विवाह होता. त्यांचा मुलगा हुन लहानपणापासून वेगळा होता. त्याने विवाहासाठी सुद्धा कुणा सरदार ,जहागिरदाराची मुलगी न निवडता एक गरीब परंतु स्वाभिमानी मुलगी निवडली. सुरूवातीला त्यांना आपल्या मुलाचा निर्णय आवडला नाही पण जेव्हा त्यांनी मोईशी संभाषण केलं तेव्हा तिच्यातील संस्कारांची व शिक्षणाची चुणूक त्यांना दिसली. हुनने जीवनसाथी म्हणून अगदी योग्य मुलगी निवडली आहे, याची त्यांना खात्री पटली.

मोई चा आनंद गगनात मावत नव्हता. तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की हवा तसा जीवनसाथी तिला हुन सारख्या सरदारपुत्राच्या रूपाने मिळेल. अक्षरश: परिकथेत घडावं तसंच घडलं होतं. विवाहात सर्वात जास्त कोण मिरवलं असेल, तर ती मिंग. हो! तिच्या जिवश्चकंठश्च मैत्रीणीचा विवाह होता हा. शिवाय मोई आणि हुनच्या पुनर्मिलनात तिचाच मोठा वाटा होता. तेव्हापासून तर ती हुनचीही चांगली मैत्रीण बनली होती. मिंगला आपल्या सोबतच घेऊन जायचं असा मोईने निश्चय केला होता. लालचुटूक विवाहाच्या पोशाखातील मोई आणि निळ्या पिवळ्या पोशाखासोबत कमरेला तलवार लटकवलेला हुन यांचा जोडा शोभून दिसत होता.

विवाह सोहळा संपला आणि सुरू झाली तयारी पहिल्या रात्रीची. आज हुन आणि मोई प्रथमच एका शयनकक्षात एकत्र झोपणार होते. त्यांचा कक्ष सजवता सजवता दासी एकमेकांत चेष्टामस्करी करत होत्या. त्यांच्या हसण्याखिदळण्याने तो कक्ष अगदी गजबजून गेला होता. मिंगदेखील त्यांच्यासोबत आपल्या मैत्रीणीचा शयनकक्ष सजवत होती. तिच्याही कानावर ही चेष्टामस्करी पडत होती.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment