Tuesday, January 26, 2010

सदैव – पान ११

प्रतिक्रिया: 
“मोई...., मोई, फक्त एकच क्षण थांब. मला माहित आहे, मी तुझा अपराधी आहे. तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे पण मला असं झिडकारून जाऊ नकोस. कमीत कमी माझी बाजू तरी मांडू दे.”

मोई काहीच बोलली नाही. तिच्या चेहे-यावरूनच ती खूप रागात आहे हे समजत होतं.

“मोई, ही गोष्ट अगदी खरी आहे की मी तुला सम्राटांच्या समारंभातच प्रथम पाहिलं होतं आणि ही गोष्ट देखील खरी आहे की पाहताक्षणीच मी तुझ्या प्रेमात पडलो....”

“....मला वेळ नाहीये. काय सांगायचं ते थोडक्यात सांगा.”

“मोई, तू श्रीमंतांचा तिरस्कार करतेस, हे मला आधीच कळलं होतं म्हणून मला तुझ्याशी खोटं बोलावं लागलं.”

“अस्सं! म्हणजे आधीच सर्व माहिती काढून झाली होती तर आणि मी मुर्ख....”

“असं नको म्हणूस मोई. मला आजही तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा आहे. माझ्याबद्दल तुला सर्व खरं खरं सांगून टाकावं असं ब-याचदा वाटलं पण ते ऐकून जर तू मला सोडून गेली असतीस तर.... या भितीने मी तुला ते कधीच सांगितलं नाही.”

“पण शेवटी तेच झालं ना?”

“हो. शेवटी तेच झालं.

“आणि झालं ते चांगलंच झालं!”

मोईच्या या उद्गारांनी हुनला आपल्या हृदयावरच कुणीतरी घाव घालतंय असं वाटलं.

“मोई, मला माफ कर. एकदा, फक्त एकदा मला माझ्या चुकीसाठी माफ कर मोई.”

“केलं तुम्हाला माफ. बस, आता यापुढे मला कधीही भेटू नका. इतकीच मेहेरबानी करा.” इतकं म्हणून मोई आपल्या मैत्रीणींच्या दिशेने चालू लागली.

मोईचं बोलणं ऐकल्यानंतर हुनला उभंही रहावलं नाही. तो मटकन वाळूतच बसला. आपले दोन्ही पंजे वाळूत रोवून तो मोठ्या कष्टाने आपल्या भावनांना बांध घालण्याचा प्रयत्न करत होता. वळणावर दिसेनासं होण्याआधी तरी मोई आपल्याकडे वळून पाहील, अशी त्याला अपेक्षा होती, पण तसं काहीच घडलं नाही. मोईच्या पावलांचे लांब लांब जाणारे ठसे पहात तो तिथेच बसून राहिला.

मिंगला मात्र त्याची ही अवस्था पहावली नाही. वळणावरून मुख्य रस्त्याला लागताच तिने सर्व मैत्रीणींना पुढे जायला सांगितले आणि ती मोईचा रास्ता अडवून उभी राहिली.

“काय चाललंय मोई हे?”

“हे तु विचारतेयंस मिंग? अगं माझी जीवाभावाची मैत्रीण तू. आज तुसुद्धा त्याला सामील झालीस?”

“सामील झाले म्हणजे काय गं? बिचारा, तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असतो. तुला एकदा पहाता यावं म्हणून, तुझ्याशी एकदा बोलता यावं, तुझी माफी मागता यावी म्हणून काल सकाळी सकाळी तो मला भेटला. किती आर्जवं केली त्याने. मग काय करायला हवं होतं मी?”

“त्याच्यासारखंच तुही फसवलंस मला मिंग.”

“अजिबात नाही. ना त्याने तुला फसवलं, ना मी. अगं मोई, डोळ्यावर कसली एवढी तिरस्काराची पट्टी बांधून घेतली आहेस तू की त्याचं इतकं निर्मळ प्रेम तुला दिसत नाही?”

“हूं! निर्मळ म्हणे. खोट्या माहितीच्या आधारावर रचलेली प्रेमाची पोकळ भिंत होती ती. शेवटी कोसळलीच.”

“खूप झालं मोई आता खूप झालं. अगं ज्या गोष्टीसाठी तू श्रीमंत व्यक्तींचा तिरस्कार करतेस, त्यातील एक गोष्ट तरी तुला हुन मधे दिसली का? अगं तो सरदारपुत्र आहे! त्याला वाटलं असतं तर त्याने हुकुम करून तुला आपल्या प्रासादात बोलावलं असतं. असं मला भेटून तुला भेटण्याची विनंती करण्याची त्याला काहीच गरज नव्हती. त्याला आजही तुझ्या मताचा आदर आहे. म्हणून तर तुझं घर माहित झालं असतानाही तो तुझ्या घरी आला नाही. तुझी बदनामी होऊ दिली नाही. आजही तो तुझ्याशी विवाहाची इच्छा बाळगून आहे.

तुझ्यासारख्या छपन्न मिळतील त्याला, पण त्याच्यासारखा प्रियकर तुला क्वचितच मिळेल. एका क्षणासाठी त्याची श्रीमंती त्याच्या स्वभावापासून वेगळी करून पहा, मोई. अगं मन पहा त्याचं, किती निर्मळ आहे. ज्या पुरुषाची कामना करत स्त्रिया रात्र-रात्र जागतात, अगदी तसाच पुरुष तुझ्या आयुष्यात आलेला असताता, तू मात्र त्याला धुडकावते आहेस....”



ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

6 comments:

 1. कथा छान वळणावर आली आहे.
  मला आवडली ही कथा.

  कृपया पुढील भाग लवकरात लवकर प्रकाशित करा, मी जास्ती वाट नाही बघु शकणार. :)

  ReplyDelete
 2. पुढचा भाग प्रकशित होईपर्यंत तर प्रतिक्षा करता येईल ना! ;)

  ReplyDelete
 3. ब्लॉग बद्दल तू ट्विटरवर दिलेल्या सूचनेवर विचार करते आहे. धन्यवाद!

  ReplyDelete
 4. LAWKAR PUDHACHA BHAAG PRAKASHIT KARA
  SHRADHA

  ReplyDelete
 5. KHUP CHAAN VALANAVAR AALI AAHE KATHA , PUDHACHE BHAAG LAWKARAT LAWKAR PRAKASHIT KARA,
  TUMCHI VAACHAK.
  SHRADHA

  ReplyDelete
 6. श्रद्धा, पुढचा भाग प्रकाशित केला आहे.

  ReplyDelete