Sunday, January 17, 2010

द ग्रीन माईल – अनंताचा प्रवास आणि अश्वत्थाम्याचं जगणं

प्रतिक्रिया: 


मृत्यूची शिक्षा ठोठावलेले कैदी ज्या तुरूंगात ठेवले जातात, त्या तुरूंगातील एका रांगेचा पॉल एजकोम्ब हा अधिकारी आहे. हा काळ आहे १९३० सालचा, जेव्हा कैद्यांना मृत्यूदंड देण्यासाठी इलेक्ट्रीक खुर्चीचा वापर केला जात असे. तुरूंगातील जमिनीवर बसवलेल्या फरशांच्या हिरव्या रंगावरून ह्या तुरूंगाला ग्रीन माईल असं म्हटलं जात असे.

मृत्यूदंडासाठी आलेले कैदी काही दिवस त्या तुरूंगात राहत आणि त्यांच्या शिक्षेचा दिवस उगवला की ग्रीन माईलवरून चालत चालत आपल्या अनंताच्या प्रवासाला इलेक्ट्रीक खुर्चीच्या दिशेने निघून जात. या कैद्यांना पाहून पाहून पॉलची नजर इतकी निगरगट्ट झालीय की त्याचा दैव, नशीब या गोष्टींवर विश्वासच राहिलेला नाही. कैद्याच्या मृत्यूदंडाच्या एक दिवस अगोदर मृत्यूच्या शिक्षेची तालीम करणंही आता त्याच्या अंगवळणी पडलं आहे. पण एक दिवस एक कैदी त्याच्या तुरूंगात येतो आणि पॉलचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन साफ बदलून जातो.

जॉन कॉफी हा अवाढव्य शरीर असलेला एक काळा कैदी पॉलच्या तुरूंगात दाखल होतो. त्याला दोन लहान मुलींच्या बलात्कार व खून प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते. खरं तर जॉनला पाहूनच तुरूंगातील सर्व अधिका-यांची छाती दडपलेली असते. त्याचं डोळ्यांच्या कक्षेत न मावणारं शरीर आणि त्याला झोपताना वाटणारी अंधाराची भिती याबद्दल तुरूंगातील अधिकारी आणि कैदी या सर्वांनाच कुतुहल असतं.

जॉनला दैवी शक्तीची देणगी लाभली आहे, याचा पॉलला शोध लागतो. त्याच्यासोबत बोलताना जॉन खूप हळव्या मनाचा आहे, हे त्याला उमगतं. ’जॉन खरंच अपराधी आहे का’, याबद्दल त्याच्या मनात शंका उत्पन्न होते. तो जॉनच्या वकिलाला भेटतो पण जॉन अपराधी आहे असंच वकिल सांगतो आणि त्या भेटीतून काहीच निष्पन्न होत नाही.
त्याच सुमारास पॉलच्या तुरूंगात एक उंदीर आपली हजेरी लावू लागतो. हा उंदीर इतर उंदीरांपेक्षा निराळाच असतो. तो चटकन माणसाळतो. तुरूंगातील डेल नावाचा एक कैदी या उंदराला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळू लागतो आणि त्या उंदाराला नाव देतो, मिस्टर जिंगल्स. जॉनप्रमाणेच पॉलला या मि. जिंगल्सचंही कौतुक वाटतं पण तसं तो दाखवत नाही.

एकीकडे तुरूंग अधिका-याचा कर्तव्यकठोरपणा तर एकीकडे जॉनमुळे आलेला दैवी शक्तीचा अनुभव या दोन्ही मधून पॉल कर्तव्य कठोरपणाची निवड करतो. आपल्या वरिष्ठ अधिका-याच्या पत्नीचा कॅन्सर बरा करण्यासाठी पॉल जॉनचा उपयोग करून घेतो. या घटनेनंतर घडणा-या प्रसंगांतून जॉन संपूर्णपणे निर्दोष आहे, हे पॉलला कळूनही तो जॉनच्या सुटकेसाठी कोणतेच प्रयत्न करत नाही. अखेर जॉनला मृत्यूदंडाची शिक्षा भोगावी लागते. त्याला मरणाचं दु:ख नसतं. जगात फक्त स्वार्थी आणि मतलबी माणसं का भरलेली आहेत, हे त्याचं दु:ख असतं. पॉल जॉनच्या मृत्यूनंतर इतर कुठल्याही कैद्याच्या मृत्यूदंडाला हजर राहू शकत नाही.

मृत्यूला कवटाळण्यापूर्वी जॉन आपल्या दैवी शक्तीने पॉलला एक देणगी देतो. त्या देणगीला वरदान म्हणावं की शाप हेच पॉलला कळत नाही. जॉनच्या मृत्यूनंतर पॉलला मि. जिंगल्स सापडतो. तो त्याला आयुष्यभर आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतो. पॉलला मिळालेल्या देणगीचा मि. जिंगल्स हा एकमेव साक्षिदार उरतो.

२००० सालचा गोल्डन ग्लोब अवॉर्ड विजेता मायकल क्लार्क डंकन याने या चित्रपटात जॉन कॉफीची भूमिका केली आहे. अवाढव्य शरिराचा पण मन मनाने हळवा असलेला जॉन कॉफी मायकलने तंतोतंत उभा केला आहे. पॉल एजकोम्ब या तुरूंग अधिका-याचा कर्तव्यकठोरपणा टॉम हॅन्क्सने आपल्या अभिनयातून प्रभावीपणे दाखवला आहे. पर्सी वेटमोर ह्या घमेंडी आणि उद्धट पोलिस अधिका-याच्या भूमिकेत डग हचिन्सनने प्राण ओतला आहे. तो पडद्यावर दिसला की त्याच्याबद्दल चीड निर्माण व्हावी इतका सुंदर अभिनय त्याने केला आहे. स्टिफन किंगच्या कांदंबरीवरून बनविलेल्या या चित्रपटाचा दिग्दर्शक व पटकथालेखक आहे फ्रॅन्क डॅराबॉन्ट.

चित्रपटातील हिंसक दृश्ये अंगावर काटा आणणारी आहेत. संवाद आणि आक्षेपार्ह दृश्यांचा यात भरणा असला तरी एक निराळा अनुभव म्हणून ग्रीन माइलचा शेवट मनाला स्पर्शून जातो.

20 comments:

 1. टॉम हॅनक्सचा हा वन ऑफ द ग्रेटेस्ट मुव्ही. माझा जाम आवडता.. तुम्ही खूप छान मुव्हीज निवडता आणि त्या खूप छान मांडताही.. !!

  ReplyDelete
 2. नाव ऐकलेलं होतं पण अजुन नाही पाहीला आहे, इंटरेस्टिंग तर वाटतोय, मिळवतोच आता आणि पहातो.
  बाकी आज काल जोमाने चित्रपट पहाणे चालु आहे वाटते, बरंय चांगल्या चित्रपटांची नावे तरी मिळतील.... :)

  ReplyDelete
 3. धन्यवाद हेरंब. टॉम हॅन्क्स हा माझा आवडता अभिनेता आहे. त्याचा चेहरा अॅन्ग्री यंग मॅनसारखा नसूनही, तो तशा भूमिका प्रभावीपणे साकारतो, हे विशेष. तुम्ही त्याचा 'द टर्निनल' हा सिनेमा पाहिला नसेल, तर अवश्य पहा.

  ReplyDelete
 4. :)) आनंद, Let me tell you the secret. रोज रात्री एक चित्रपट पहाणं हा क्रम जवळजवळ गेली पाच ते सहा वर्ष सुरू आहे. दिवसभराच्या कामामधे टि.व्ही. पहायला वेळ नसतो. पण रात्री चित्रपट पहाणं मी चुकवलेलं नाही. हे वेड लहानपणापासून आहे. मला भाषेचं वावडं नाही. समजत असेल, तर मी कुठल्याही भाषेचा चित्रपट पहाते.

  ReplyDelete
 5. सह्हीच, मी ठरवुन देखिल हे नाही करु शकलो.
  कधी कधी ऑफिसच्या कामामुळे कधी असेच...हा वसा घेण्यासारखा आहे... :)

  ReplyDelete
 6. कांचन, वॉव. माझा पण टॉम हँक्स सगळ्यात आवडता. त्याचे मी बरेचसे चित्रपट पहिले आहेत. बरेचसे ३-४-५ वेळा पण. बिग, टर्मिनल, कॅच मी इफ यु कॅन, कास्ट अवे, यु हव गॉट मेल, फीलाडेल्फिया, फोरेस्ट गंप, दा विंची कोड हे काही माझे विशेष आवडते.

  ReplyDelete
 7. कांचन, वॉव. टॉम हँकस माझाही फेवरेट. त्याचे बरेच सिनेमे बऱ्याचदा बघितले आहेत. बिग, टर्मिनल, यु हॅव गॉट मेल, फोरेस्ट गंप, कॅच मी इफ यु कॅन, फीलाडेल्फिया, कास्ट अवे, दा विंची कोड हे माझे विशेष आवडते. (याआधी हाच कमेंट टाकला तेव्हा बहुतेक गेला नाही. म्हणून पुन्हा टाकतोय)

  ReplyDelete
 8. आनंद, मला ही सवय कशी लागली, ते ठाऊक नाही. आता व्यसन जडलं आहे पण चांगलं व्यसन आहे, नाही का? खरं तर मला मोठ्या पडद्यावर चित्रपट पहायला खूप आवडतात. अर्थात, सगळेच चित्रपट थिएटरमधे जाऊन पहाणं शक्य नसतं. मला एकदा ’लॉर्ड ऑफ द रिंग्” चे सर्व भाग पहाण्याचं धैर्य एकवटायचंय. त्याच्या डी.व्ही.डी अनकट व्हर्जन्स मधे विकत मिळतात. ५० मिनिटांचा चित्रपट जास्त. :-))

  हेरंब, तुम्ही आधी दिलेली कमेंटही आली होती माझ्याकडे, म्हणून दोन्ही पब्लिश करतेय. मला वाटतं मी फॉरेस्ट गम्प पाहिलेला नाही. पुढच्या आठवड्यात पहाते. नावावरून लक्षात येत नाहीये. :-/

  ReplyDelete
 9. कांचन ताई तू खुपच सुंदर विश्लेषण करून चित्रपट डोळ्यासमोर आणतेस..
  वाचल्यानंतर कधी एकदा तो पाहतो असे होते..
  टॉम हँक्स चा मी डाय हार्ड फैन आहे.
  हेरम्ब दादा ने सांगितलेले सगळे चित्रपट पाहून झालेत..
  तू एकदा फौरेस्ट गंप बघच..आणि टर्मिनल तर काय सुंदर चित्रपट आहे.. अप्रतिम

  ReplyDelete
 10. मला आणखी एक चित्रपट आठवतो आहे..
  तो म्हणजे नो मैन्स लैंड
  हा एक जर्मन भाषेतला चित्रपट आहे त्याला मागच्या वर्षी ऑस्कर मिळाले..
  बघ कधी वेळ मिळाला तर..

  ReplyDelete
 11. नो मॅन्स लॅन्ड मी पाहिलेला नाही बहुतेक. पुढच्या आठवड्यात पहाते.

  ReplyDelete
 12. फारच छान लेख लिहला आहे .तुझा ब्लोग सुद्दा आवडला,खुप सुंदर सजावला आहे.

  ReplyDelete
 13. धन्यवाद कृष्णा, माझ्या ब्लॉगवर आपलं स्वागत आहे. आपल्या नवीन ब्लॉगसाठी शुभेच्छा!

  ReplyDelete
 14. टॉम हॅन्क्स चे सारेच सिनेमे पाहण्यासारखे असतात, ग्रीन माईल हा ही एक तसाच सिनेमा. बाय द वे, नो मॅन्स लॅड ला गेल्या वर्षी नव्हे तर लगान च्या वेळेस लगान ला मागे सारुन ऑस्कर मिळालं होतं.

  -अजय

  ReplyDelete
 15. दुरूस्तीसाठी धन्यवाद, अजय. नो मॅन्स लॅन्ड या आठवड्यात पहाण्याचा बेत आहे. टॉम हॅन्क्स हा माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

  ReplyDelete
 16. वर्णन वाचुन तरी पाहावासा वाटतो आहे...

  ReplyDelete
 17. देवेंद्र, हा चित्रपट तुम्हाला आवडेल याची खात्री आहे. इथे मी चित्रपटाची कथा अथ पासून इति पर्यंत मुद्दामच लिहिली नाही.

  ReplyDelete
 18. no mans land ha khupach sundar chitrapat ahe
  jarur paha .
  tumhi chitrapat vishleshan far chan karata!
  mi gelya kahicha diwasapasun ehte bhet deto ahe
  farcha chan

  ReplyDelete
 19. Ððð÷ ÙðûÐðçð âðûÂÀ èð ¦¨î ®ðôÑðµð çðôÐÇÜ òµðëðÑð¾ ¡ðè÷

  ReplyDelete
 20. धन्यवाद अमोल. माझ्या ब्लॉगवर स्वागत आहे. ’नो मॅन्स लॅन्ड’ मला अजूनही पहाता आलेला नाही. आता रिमाईन्डर लावून ठेवते म्हणजे लक्षात राहील ;-). तुझी नंतरची प्रतिक्रिया मला वाचता आलेली नाही. बहुधा श्रीलीपी किंवा वरूण फॉन्ट असावी. मराठीत लिहीण्यासाठी Baraha या सॉफ्टवेअरचा वापर कर. गमभन किंवा quillpad देखील उत्तम आहेत.

  ReplyDelete