Friday, January 15, 2010

द डेव्हिल वेअर्स प्रॅडा – पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य

प्रतिक्रिया: 
अॅन्ड्रीया सॅक्स ही एक साधीसुधी रहाणारी पण तल्लख बुद्धीची पत्रकार असते. एक उत्तम पत्रकार होणं, हे तिचं ध्येय असतं. चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी म्हणून तिचे प्रयत्न सुरु असतात. तशातच तिला संधी मिळते, ती ’रनवे’ सारख्या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी वार्ताहर म्हणून काम करण्याची. पण प्रत्यक्षात तिला निराळंच काम करावं लागतं.

अॅन्ड्रीयाने जर एक वर्ष ’रनवे’ची कार्यकारी संचालक (एक्झिक्युटीव्ह) मिरांडा प्रिस्ले हीची दुय्यम सहाय्यक म्हणून काम केलं, तर ’रनवे’मधे वार्ताहर म्हणून अॅन्ड्रीयाचं भविष्य उज्ज्वल आहे, असं अॅन्ड्रीयाला सांगितलं जातं. ज्या नोकरीसाठी मुली वाट्टेल ते करायला तयार होतात, ती नोकरी अॅन्ड्रीयाला सहजगत्या मिळून जाते. अॅन्ड्रीया या नोकरीकडे फक्त एक चांगली संधी म्हणून पहात असते. एकदा का तिच्या प्रोफाईलवर ’रनवे’मधे मिरांडासाठी काम केलं असल्याचा रेकॉर्ड आला, की इतर ठिकाणी तिला नोकरी मिळण्यासाठी फार कष्ट करावे लागले नसते.

पण लवकरच अॅन्ड्रीयाच्या लक्षात येतं की ’रनवे’मधे काम करायचं असेल, तर छान कपडे, छान केशभूषा असणं आवश्यक आहे. त्याहूनही आवश्यक आणि कठीण आहे, ते म्हणजे मिरांडा प्रिस्लेची मर्जी संपादन करणं. मिरांडा अॅन्ड्रीयासमोर आव्हानं उभी करते, कधी गरज म्हणून तर कधी मुद्दाम. पण अॅन्ड्रीया या सगळ्याला पुरून उरते. मात्र मिरांडाची मर्जी सांभाळता सांभाळता अॅन्ड्रीया आपलं वैयक्तिक आयुष्य, बॉयफ्रेंड, मित्रमैत्रीणी, वडील यांच्यापासून लांब जाते.
अॅन्ड्रीयाच्या रूपाने मिरांडाला हवी तशी किंबहुना त्याहीपेक्षा सरस अशी सहायिका मिळते. मिरांडाच्या पहिल्या सहायिकेच्या, एमिलीच्या जागी, अॅन्ड्रीयाला मिरांडासोबत पॅरीसला जाण्याची संधी मिळते. तिथे मिरांडाचं व्यक्तिगत आयुष्य अॅन्ड्रीयासमोर येतं आणि अॅन्ड्रीयाला कळून चुकतं की आपल्याला मिरांडाची नोकरी करण्यासाठी कुणीही जबरदस्ती केलेली नव्हती, ती आपली आपण निवडली. निवडीचं स्वातंत्र्य असतानाही, आपल्याला हवं असलेलं काम न करता, आपण फक्त झगमगाटात हरवून गेलो.

लेखक लॉरेन वेइसबर्गर यांच्या 'द डेव्हिल वेअर्स प्रॅडा' या नावाने प्रकाशित झालेल्या कादंबरीवर बेतलेला हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या गरजेनुसार कादंबरीमधील मूळ कथानकात थोडेफार बदल करून प्रसंग चित्रीत करण्यात आलेले आहेत.

या चित्रपटात पहाण्यासारखं काय असेल, तर तो मेरिल स्ट्रिपचा अभिनय! मिरांडा प्रिस्ले सारखी, एका फॅशन मॅगझिनसाठी काम करणारी निर्दयी आणि व्यवहारचतुर बॉस दाखवायची असेल, तर त्यासाठी आरडाओरडा करण्याची काहीच गरज नसते, हे मेरिल स्ट्रीपने दाखवून दिलंय. अॅन्ड्रीयाच्या नजरेतून चित्रपट पाहिला तर मेरिल स्ट्रीपचा अंडरप्ले उरात धडकी भरवणारा आहे. या अंडरप्लेमुळेच अॅन्ड्रीयाची भूमिका करणा-या अॅन हॅथवेचा चंचलपणा, तिने आव्हानांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी केलेली धावपळ ठसठशीतपणे दिसून येते.

इतर सहकलाकारांच्याही भूमिका ठिकठाक आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी मेरिल स्ट्रिपला २००७ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं तर त्याच वर्षी दिला गेलेला उत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन ग्लोब पुरस्कारही, मेरिल स्ट्रीपला याच चित्रपटासाठी मिळाला.

हा चित्रपट फॅशन जगताला बदनाम करण्यासाठी निश्चितच बनवलेला नाही. एखाद्या ध्येयामागे धावताना, कधीकधी आपण हेही विसरलो असतो की आपलं ध्येय काही वेगळंच होतं. पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असूनही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. वेळीच सावरलं नाही, तर निराशा लपवण्यासाठी आपल्याला सतत खोटा मुखवटा धारण करावा लागेल.

प्रॅडा हा मारिओ प्रॅडा यांच्या मेहनतीतून आकाराला आलेला फॅशन जगतातील बहुचर्चित इटालिअन ब्रॅन्ड आहे. प्रॅडाचं लेबल असणा-या वस्तू वापरणं हे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं.

10 comments:

 1. एकदम सही... मेरील स्ट्रीप चा अभिनय खरंच पाहाण्याजोगा...

  ReplyDelete
 2. हो, ती ज्या थंडपणे एक एक संवाद म्हणते, ते पहाण्यासारखं आहे.

  ReplyDelete
 3. Mi ardhach pahila aahe ha cinema, aala HBO ver ki pahin purna

  ReplyDelete
 4. मेरील स्ट्रीपने अफलातूत काम केले आहेच पण एना हॅथवे काही कमी नाही. तिनेही जो बदल दाखवलेला आहे तो फार छान आहे. पुर्ण चित्रपट नायिकाप्रधान आहे.

  ReplyDelete
 5. अॅन हॅथवेचा अभिनय सुंदर आहे मात्र सुरूवातीला दिसणारा तिचा चंचलपणा वेंधळेपणात मोडतो, तोच चंचलपणा तिची वेशभूषा बदलल्यानंतर स्मार्ट वाटायला लागतो. त्यामुळे यात तिच्या वेशभुषा आणि केशभुषेचा जास्त सहभाग आहे, असं मला वाटतं.

  ReplyDelete
 6. merryl strip rocks as usual!!! pan mala ann hathway pan bhalati aavadate...

  ReplyDelete
 7. हो मेघा. मलाही ती आवडते. ती ’द प्रिन्सेस डायरी’मधे कसली सुरेख दिसली होती.

  ReplyDelete
 8. जबरदस्त मुव्ही आहे हा. आणि मेरील स्ट्रीप ते "That's All" ज्या सहजतेने आणि वेगळ्या टोन मध्ये म्हणते ते ऐकून तर मी वेडाच झालो.

  ReplyDelete
 9. कसं म्हणते ना ती? सगळं काम सांगून झाल्यावर केवळ ’दॅट्स ऑल’ असं म्हणून ’किती तुच्छ काम दिलंय तुला’ असं दाखवणं खूप भन्नाट आहे.

  ReplyDelete