Friday, January 1, 2010

सदैव – पान १

प्रतिक्रिया: 
सम्राट शिंग ने आपल्या वाढदिवसाप्रित्यर्थ ठेवलेल्या समारंभात, समारोपाच्या नृत्यामधे प्रमुख नर्तिका म्हणून मोई ने अप्रतिम नृत्य सादर केलं. तिच्या नृत्यनिपुणतेने सर्वच उपस्थित दिपून गेले. सम्राट शिंग ने तर खुश होऊन आपल्या हातातील सोन्याची अंगठी मोईला बक्षीस म्हणून दिली. पण सरदारपुत्र हुन मात्र मोईला पाहताक्षणी आपलं हृदयच हरवून बसला होता.

आपल्या सौंदर्याने कुणाचं तरी हृदय घायाळ झालंय, याची कल्पनाही नसलेली मोई समारंभ संपल्यावर आपल्या मैत्रीणींबरोबर निघूनही गेली. हुन मात्र अजूनही बसल्या जागी पुतळ्यासारखा निश्चल होता. त्याला तसं बसलेलं पाहून राजपुत्र योह ने त्याच्या जवळ जाऊन त्याची मन:स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राजपुत्र योह आणि सरदारपुत्र हुन बालमित्र होते, त्यामुळे योहला आपल्या मित्राची काळजी न वाटती तरच नवल.

"काय सरदारपुत्र हुन? आज इथून हलण्याचा विचार दिसत नाही?" राजपुत्र योह ने विचारलं.

"मोई.... " हुन इतकंच म्हणू शकला आणि त्याने एक दीर्घ उसासा सोडला.

"हंऽऽ! ती नर्तिका खूपच आवडलेली दिसतेय माझ्या मित्राला!" योह कौतुकाने हुनकडे पहात उद्गारला.

"आवडली? मित्रा, ती जर पुन्हा दिसली नाही, तर तुझा हा मित्र संपलाच म्हणून समज." हुनने शुन्यात पहात म्हटलं.

"हातिच्या! त्यात काय एवढं? अरे, आत्ताच सेवकांना पाठवून तिला इथे यायला लावतो. ती आजच्या दिवसापुरती नृत्य करण्यासाठी या समारंभाला आली होती. पण तुला हवं असेल, तर तुझ्या सदनात ती रोज नृत्य करेल, अशी व्यवस्था करतो." राजपुत्र योह म्हणाला.

"नाही, नाही मित्रा! भलतंच काय?" हुन व्यथित होत उद्गारला. "मला.... मला मोई आवडलीय हे खरं आहे पण तुला वाटतं तशी नाही. माझ्या आयुष्यात ती अर्धांगिनी म्हणून...." हुन चक्क लाजला.

"अच्छा! म्हणजे प्रकरण गंभीर आहे तर?" हुनकडे मिस्किल नजरेने पहात योह म्हणाला. "बोल मित्रा, आज पहिल्यांदाच तुझ्या चेहे-यावर एक वेगळीच चमक दिसते आहे मला. माझा मित्र चक्क प्रेमात पडला आहे. तुला हवी असलेली सर्व मदत करायला मी तयार आहे."

"खरंच मित्रा, खरंच मदत करशील मला?"

"आपल्या मैत्रीची शपथ घेऊन सांगतो, हुन. तुझं आणि मोईचं मिलन घडवून आणण्यासाठी मी तुला सर्वतोपरी मदत करायला तयार आहे."

"मित्रा, तू मला मदत करणार म्हटल्यावर तर मला उत्साह आलाय पण त्यापूर्वी मला एका गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे." हुन योहला म्हणला.

"आता आणखी काय?" योहने विचारलं.

"आपण इथे मारे माझ्या नि मोईच्या मिलनाचे बेत आखतो आहोत पण मोईच्या मनात काय आहे, हे मला कुठे माहित आहे? न जाणो तिचं दुस-या कुणावर प्रेम असलं तर?" हुन उदास स्वरात म्हणाला.

"मग काय झालं? अरे, एक सरदारपुत्र तिला मागणी घालतोय म्हटल्यावर, कुठल्याही सामान्य तरूणाच्या प्रेमापेक्षा, ही मागणी तिला लाख मोलाची वाटेल." राजपुत्र योह बेफिकीरपणे म्हणाला.

"नाही मित्रा, हे चुकीचं आहे. हा तर सरळसरळ अन्याय आहे त्या तरूणाच्या प्रेमावर. शिवाय मोई ने जर मी सरदारपुत्र आहे म्हणून तिच्या प्रियकराचं प्रेम धुडकावलं, तर ती माझ्याशी किती बरं एकनिष्ठ राहू शकेल? हा माझ्यावर आणि तिच्यावरही अन्यायच नाही का?"

"तू तर मलाच द्विधा मन:स्थितीत टाकलंस, हुन. आता या समस्येवर काय उपाय आहे, हे मला माहित नाही." आपले दोन्ही हात कमरेवर ठेवत राजपुत्र योह म्हणाला.

No comments:

Post a Comment