Tuesday, January 5, 2010

नटरंग उभा, ललकारी नभा, स्वरताल जाहले दंग!

प्रतिक्रिया: 
’एका कलाकाराच्या आयुष्याचा तमाशा’, या चार शब्दांमधे नटरंगची कथा सामावलेली आहे. आयुष्यभर कलेसाठी दिलेलं योगदान म्हणून एखाद्या ज्येष्ठवयीन कलाकाराला जेव्हा ’जीवनगौरव पुरस्कार’ सारखा सन्मान लाभतो, तेव्हा तिथे टाळ्या वाजवणारे असंख्य हात उपस्थित असतात. त्यातल्या कित्येक हातांना त्या कलाकाराचं नेमकं योगदान किती आणि काय, हेही ठाऊक नसतं. कलेसाठी केलेल्या खडतर तपश्चर्येचा साक्षिदार असतो, तो त्या पुरस्काराचा मानकरी कलाकार आणि ज्यांनी त्याची तपश्चर्या अगदी जवळून पाहिली आहे, असे त्याचे सोबती.

कागलगावचा गुणवंत वृत्तीने मल्ल पण हाडाचा कलाकार आहे. व्यायाम करून आपल्या शरीराचा मर्दानी बाज राखणारा हा गुणा, मनाने मात्र कवी आहे, उत्तम अभिनेता आहे. दिवसभर दुस-याच्या शेतावर राबून, आपल्या कुटुंबासाठी मजूरी करताना, संध्याकाळी मात्र फडावरची घुमणारी ढोलकी त्याला साद घालीत असते. गुणाला कलेचं अभिजात अंग आहे. तो उत्तम कवनं करू शकतो, त्यामुळे त्याच्यासाठी लावणी म्हणजे नुसती फडावर नाचणारी बाई नाही. तमाशा म्हणजे त्याच्यासाठी गीत, नृत्य, संगीत आणि सौंदर्य याची रेलचेल असलेला असा दरबार आहे.

पण नुसती कला पाहून नि कलाकार असून पोट भरत नाही. रोजच्या मिळणा-या मजूरीमधे दोन वेळेची भाकरी मिळायची पंचाईत होत असतानाच, रोजची मजूरीही हातातून हिसकावली जातेय असं लक्षात आल्यावर गुणाच्या आतील कलावंत त्याला कलेतूनच उपजिविका भागविण्याचा नवा मार्ग सुचवतो. तो आणि त्याचे काही सोबती मिळकतीसाठी तमाशा काढायचं ठरवतात. उत्साहात सर्व गडी सामानाची जमवाजमव करून तालमीही सुरू करतात. पण तमाशा म्हटला म्हणजे तो बाईशिवाय सुरूही होत नाही आणि बाईशिवाय संपतही नाही. मोठ्या मुश्किलीने बाई मिळून जेव्हा तमाशाला आकार देण्याची वेळ येते, तेव्हा नाच्याच्या कामासाठी कुणी तयार होत नाही. हो, नाही करता करता शेवटी गुणावरच नाच्या बनण्याची वेळ येते आणि सुरू होतो, एका कलाकाराच्या आयुष्याचा तमाशा.

अतुल कुलकर्णींसारख्या गुणी अभिनेत्याने गुणाची भुमिका साकारून तिचं सोनं केलं आहे. मध्यंतरापूर्वीचा मर्दानी तोरा असलेला गुणा आणि मध्यंतरानंतर केवळ कलेच्या आसक्तीपायी आपला मर्दानी बाज उतरवून लचकत मुरकत चालणारा तमाशातील नाच्या, अतुल कुलकर्णींनी अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. मल्ल आणि नाच्या यांच्यातील फरक १०१ टक्के जाणवतो.

तमाशातील नाच्या म्हणजे सर्वांच्या चेष्टेचा विषय. पण नाच्या म्हणजे बाईसारखे हावभाव करणारा, गर्र्कन टाळी वाजवून हाताचा पंजा पुढे करणारा आणि तमाशा सुरू असताना, ’आत्ता गं’ म्हणणारा तृतीयपंथी नव्हे. एका मर्दाने स्त्रीसारखे हावभाव करून, जणू आपण स्त्रीच आहोत, असं भासवणं म्हणजे तोंडच्या गप्पा नाहीत. त्यासाठी गुणाला खूप मोठं बलिदान द्यावं लागतं. ती व्यथा आणि वेदना अतुल कुलकर्णींच्या चेहे-यावरील रेषेरेषेत दिसते.

अतुल कुलकर्णींप्रमाणेच अभिनयासाठी उल्लेख करावा लागेल, तो किशोर कदम यांचा. फडाच्या व्यवस्थापकाचा व्यवहारीपणा आणि व्यावसायिकपणा किशोर कदम यांनी अचूकपणे आपल्या अभिनयातून दाखवला आहे. हाडाचा कलावंत आणि पोटाचा कलावंत यांच्यात शेवटी हाडाचा कलावंतच तग धरून रहातो, हे दाखवण्यासाठी चित्रपटात जे प्रसंग आले आहेत, ते पहाताना तमासगीर कोणकोणत्या अग्निदिव्यातून जात असतील, गेले असतील याची कल्पना येते.

अप्सरा आली आणि आता वाजले की बारा या गाण्यांमधील शब्द न् शब्द अलंकार लेवून नटला आहे. विशेषत: अप्सरा आली हे गाणं, ’ही लावणी आहे की अप्सरेचं स्तुतीगान” असा प्रश्न पडावा इतपत सुंदर झालेलं आहे. चित्रपटातील संवाद सुंदर आहेत मात्र पात्रांच्या संवादफेकीमधे किंचित शहरीपणा जाणवतो.

चित्रपटाचे गीत व संवाद लेखक गुरू ठाकूर यांनी या चित्रपटात एक छोटीशी पण लक्षात राहण्याजोगी भूमिका साकारली आहे. सोनाली कुलकर्णी व प्रिया बेर्डे यांच्या भूमिका तशा लहानच आहेत पण दोघींनीही आपापली बाजू व्यवस्थित सांभाळली आहे. सोनालीचं नृत्यकौशल्य डोळ्यात भरणारं आहे. इतर सहकलाकारांची कामही चोख झाली आहेत. पाहुणी कलाकार असलेल्या अमृता खानविलकरचं ’आता वाजले की बारा’ हे एक धमाल आणि श्रवणीय लावणीनृत्य आहे.

अजय-अतुल या संगीतकार जोडीबद्दल काय म्हणावं? नेहमीप्रमाणेच दणकेबाज आणि थोडं वेगळ्या बाजाचं संगीत त्यांनी या चित्रपटाला दिलं आहे. आहे. अजय-अतुल यांच्या संगीतातच अशी जादू आहे की आपण हातातलं काम थांबवून त्यांचं संगीत ऐकावं.

बेला शेंडे यांनी सर्वच गाणी उत्कृष्ट गायली आहेत पण ’आता वाजले की बारा’ ह्या गाण्यामुळे त्यांच्यातील गायिकेने खूप मोठी जबाबदारी पेलून ती पारही पाडून दाखवली आहे. अप्सरा आली हे गाणं ऐकताना आपल्याला वेगळ्याच काळात गेल्याचा भास होतो. तर ’खेळ मांडला’ ह्या गाण्यात अजय गोगावले यांनी जो आर्त स्वर लावला आहे, त्यामुळे ते जास्त लक्षात रहातं. ’कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी’ ही गवळण शब्दांप्रमाणे नटखट आहे. चित्रपटातील तीनही कटाव ऐकताना छान वाटतं आणि ऐकताना बोटांचा ठेका आपसूक धरला जातो.

ज्याला ’टीम वर्क’ म्हणता येईल, असा हा चित्रपट आहे. संपूर्ण मराठी बाजाचा, मराठी रंगाचा. तमाशाप्रधान असूनही तमाशाकडे वेगळ्या दृष्टीने पहायला लावणारा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मानाचं पान मिळवणार हे नक्की.

रसिक होऊ दे दंग चढू दे, रंग असा खेळाला
साता जन्माची देवा पुण्याई लागू दे आज पणाला
हात जोडतो, आज आम्हाला, दान तुझा दे संग
नटरंग उभा, ललकारी नभा, स्वरताल जाहले दंग

39 comments:

 1. खुपच सविस्तर आणि छान लिहिले आहे, सिनेमा पाहणं आता गरजेचं झालं आहे...

  ReplyDelete
 2. अतिशय समर्पक रसग्रहण... असा चित्रपट एखादाच होतो.

  ReplyDelete
 3. @ आनंद, चित्रपट मनाला भिडला. बरंच लिहायचं राहूनही गेलंय. तू पाहिलास की तुही लिही.

  @ पंकज, खरं आहे. असे चित्रपट फार नाहीत पण असायला मात्र हवेत. अस्सल मराठीत चित्रपट निघू शकतात हे आता आपल्याला कळलंय.

  ReplyDelete
 4. सह्ही लिहिलं आहेस कांचन. चित्रपट पहायची इच्छा आधीपासूनच होती, पण परिक्षण वाचल्यावर उत्सुकता खूप वाढली आहे.

  -अनामिक

  ReplyDelete
 5. चित्रपट विचार करायला भाग पाडेल असा आहे, जरूर पहा.

  ReplyDelete
 6. अतिशय सुंदर समीक्षण. अतुल कुलकर्णीने चित्रपटात काम केलं तेंव्हाच हा चित्रपट काही खासं असणार असे वाटले होते. गाणी तर अप्रतिम आहेत. ह्या महिन्यात नटरंग बरोबरच झेंडा, शिक्षणाच्या आयचा घो, हरिश्चंदाची फॅक्टरी आणि विहीर चित्रपट प्रदर्शित होतं आहेत आणि यापैकी एक ही निव्वळ विनोदी चित्रपट नाही हे विशेष.

  ReplyDelete
 7. हो सिद्धार्थ, मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहील, इतकी ताकद या चित्रपटांमधे नक्कीच आहे. मात्र या सर्व चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या काळात थोडं अंतर असायला हवं होतं, असं मला वाटतं. एकदम इतकी भरमार झाल्यावर प्रेक्षकालाही काय पाहू अन् काय नको असं होऊन जातं.

  ReplyDelete
 8. दुसरं समीक्षण आलं आहे हे. यात सुद्धा कौतुकच कौतुक. आम्हाला कधी पहायला मिळत्तो कोण जाणे, ऑनलाईन आल्याशिवाय आम्ही पाहु शकत नाही, खूप दिवसांनी एखाद्या मराठी चित्रपटासाठी झुरतोय. छान लिहिलं आहे तुम्ही. आभार.

  ReplyDelete
 9. खुपच छान लिहिलंय परीक्षण.. !! कधी बघायला मिळणार हा चित्रपट देव जाणे :(

  ReplyDelete
 10. @ साधक, @ हेरंब, असा सुंदर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर, तो न पाहता येण्यातील तळमळ समजू शकते. जेव्हा जमेल तेव्हा नक्की पहा. ह्या चित्रपटाची सी.डी. बहुधा उशीरा निघेल असा अंदाज आहे. पण सी.डी. बाजारात आली की लगेच विकत घेणार. संग्रही ठेवावा असा हा चित्रपट आहे.

  ReplyDelete
 11. kuni tari mala NATARANG che Gane dyal ka???

  ReplyDelete
 12. सी.डी. अवघ्या ४५ रुपयांना, सर्व म्युझिक स्टोअर्समधे उपलब्ध आहे. त्यात इतरही चित्रपटांची गाणी आहेत. इंटरनेटवर मिळणारी गाणी सदोष आहेत. कृपया अस्सल गाणी खरेदी करा.

  ReplyDelete
 13. this is fabulous, espacially apsara ali , it never allows yout o think on vulgar side of lavani, which may be possible.i completely involved in sonali superb dance.
  hats off for team efforts

  ReplyDelete
 14. अप्सरा आली हे अतिशय निराळा अनुभव देणारं गाणं आहे. ’वाजले की बारा’ ही अस्सल लावणी आहे पण ऐकताना खूप मजा येते. नटरंग मधे जसं टीमवर्क जमलंय तसंच टीमवर्क पुढेही इतर मराठी चित्रपटांना लाभेल, अशी आशा करूया.

  ReplyDelete
 15. Hi Kanchan,
  Natarang ha ek utkrushta cinema aahe. Apratim ha shabdhi kami pdel tyala..
  Marathimadhe ase darjedar cinema baghayala milatahet hech aaple bhagya..
  Atul Kulkarni is the best.. tyala shatashaha dhanywad ani shubhechha..
  ani tuhi khhup chhan parikshan lihile aahes. tulahi shubhechha..

  ReplyDelete
 16. मराठी प्रेक्षक नटरंग सारखे चित्रपट पहायला गर्दी करतो आहे. यावरून हे दिसून येतं की मराठीला प्रेक्षक नाही असं म्हणण्यापेक्षा, मराठी प्रेक्षक मराठी भाषेत दर्जेदार चित्रपट बनण्याची वाट पहात होता, असं म्हणावं लागेल. अतुल कुलकर्णी हा हरहुन्नरी अभिनेता आहे. पेज थ्री, रंग दे बसंती, दिल्ली ६ सारख्या हिंदी चित्रपटांमधे त्याने ज्या सहजतेने भूमिका केल्या, त्याच सहजतेने त्याने गुणा साकारला आहे. त्याच्याबद्दल जितकं बोलावं तितकं थोडंच. त्याचा कोणताही चित्रपट पहाताना तो त्या भूमिकेशी समरस झालेला आढळतो. नटरंग मधील गुणा साकारण्यासाठी त्याने घेतलेली सहा महिन्यांची मेहनत फळाला आली आहे.

  तुमच्या शुभेच्छा पाठीशी आहेत तर मला लेखनासाठी आणखी हुरूप येईल.

  ReplyDelete
 17. चित्रपट उत्तम आहे, अतुल कुलकर्णीने जबरदस्त अभिनयाचे प्रदर्शन घडवले आहे.
  शेवट फक्त गुंडाळल्यासारखा झाला आहे.

  ReplyDelete
 18. आनंद,
  कादंबरी वाचल्यावर मला असं जाणवलं की कादंबरीवरून जरी चित्रपट काढला असला, तरी कादंबरी व चित्रपट ह्या दोन सर्वस्वी भिन्न कलाकृती आहेत. कादंबरीतील शेवट चटका लावून जातो, तर चित्रपटाचा शेवट आशावादी आहे.

  ReplyDelete
 19. मी कादंबरी वाचलेली नाही त्यामुळे मी तिच्या सोबत कंपेअर नाही करत आहे, मला फक्त असं वाटलं की शेवट गोड करण्याच्या नादात तो ५ मिनिटात उरकला गेला. तरिही उत्तम निर्मितीमुल्य, उत्तम संगीत आणि अभिनयाच्या जोरावर सिनेमा खुपचं सुंदर बनलाय....
  दुसर्‍यांदा पाहीन तर केवळ अतुलच्या अभिनयासाठी...

  ReplyDelete
 20. केवळ शेवटच नाही, तर गुणाला नाच्या गृहीत धरल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियांमुळे व कृतींमुळे गुणाला होणा-या वेदनाही आवरत्या घेतल्यासारख्या वाटतात. मी केवळ अतुलसाठीच चित्रपट दुस-यांदा पाहिला. तू कादंबरी वाच, आनंद. त्यातील गुणा तुला निश्चितच आवडेल. शिवाय सिनेमॅटीक लिबर्टी कुठे कुठे वापरली आहे, हेदेखील कळेल.

  ReplyDelete
 21. give it me natrang kadambari for learn to me

  ReplyDelete
 22. महेंद्रजी, ही कादंबरी मी नवीन लायब्ररीमधून मागवली होती.

  ReplyDelete
 23. छान आहे हा समीक्षण खरंच...!!!!!एक पुण्यातील मित्राने सांगितले कि मोगरा फुलला वाच...आम्हा लोकांना इकडे लंडनमध्ये आपल्या मातीविषयी, आपल्या लोकांविषयी, आपल्याकडे काय सुरु असेल, कुठला पिक्चर प्रभातला हिट झाला असेल असे वाचायला मिळाले कि खूप बरे वाटते आणि त्यात आसे नटरंग सारखे मूवी जर आले ना तर दुग्धशर्करा योग ..आपले मराठीचे भविष्य खरंच खूप उज्ज्वल आहे यात शंकाच नाही ...आणि कांचन आपण सुद्धा खूप खूप छान लिहिले आहे आणि इतर प्रतिसादसुद्धा छान आहेत बर का..मनापासून आपल्याला शुभेच्छा!!!....रामकृष्ण

  ReplyDelete
 24. रामकृष्णजी, माझ्या ब्लॉगवर आपलं स्वागत आहे. आपला अभिप्राय खूप प्रोत्साहनात्मक आहे. माझ्या ब्लॉगवर मराठी, हिंदी व आंतरराष्ट्रीय चित्रपटांची परिक्षणं लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. प्रभातच्या एकाच चित्रपटाचं परिक्षण लिहिलं आहे. मात्र, भविष्यात प्रभातच्या व इतरही मराठी चित्रपटांबद्दल लिहिण्याचा मानस आहे. माझ्या ब्लॉगवरील लेखन जास्तीत जास्त मराठीमधे कसे होईल, हे पहाण्याकडे माझा कल आहे. माझा ब्लॉग जरूर वाचा. आपल्या शुभेच्छा पाठीशी आहेतच. भविष्यात हातून चांगलंच लिहिलं जाईल.

  ReplyDelete
 25. रामकृष्णजी,
  माझ्या ब्लॉगचं नाव ज्यांनी सुचवलं त्या आपल्या पुण्याच्या मित्राचं नाव जाणून घ्यायला आवडलं असतं.

  ReplyDelete
 26. नक्कीच आम्हाला सुद्धा सांगायला आवडेल ना!!... श्रीपाद नाव आहे त्याचे ...श्रीपाद ब्रम्हे त्यानेच सुचविला मला आपला हा ब्लॉंग ..एक सांगायचे होते मराठीत टाईप करता येईल का तिकडे प्रतिक्रिया लिहिताना may be its easier ...ok best of luck once again ....आणि प्रतिसादात म्हणल्या प्रमाणे आम्ही नक्कीच आपल्या पुढल्या लेखणीची वाट पाहू ...धन्यवाद ...व हार्दिक शुभेच्छा!!!...रामकृष्ण

  ReplyDelete
 27. धन्यवाद रामकृष्णजी. श्रीपाद ब्रम्हे यांच्याबद्दल ऐकून आहे. पत्रकारितेमधे ज्यांचे नाव घेतले जाते तेच श्रीपाद ब्रह्मे का? मराठीत टंकलेखन करण्याची सुविधा मला या ब्लॉगवर उपलब्ध करून द्यायची आहे. मात्र त्याचे तांत्रिक ज्ञान मला अजून नाही. माहिती मिळवून लवकरच ही सुविधा उपलब्ध करून देईन. पुढील लेखांची प्रतिक्षा करा.

  ReplyDelete
 28. I have seen this movie. Everyone has acted awesome, the music is good and the lyrics are the best. I like the way you have described this Chitrapt in your this article. Kiti Sudar lihita tumhi!...kharach farach chhan watale hi samiksha (shabda barobar aahe ka?) wachun..mal ajamel kadhi aasa lihayala? Mala aawadale mhanoon abhipray pathawat aahe.

  ReplyDelete
 29. गुरु ठाकुर ने भुमिका केलिय ? प्रसंगाचा वैगेरे संदर्भ दिलात तर बर होईल.

  कमाल आहे बुवा ह्या माणसांची .. बहुगुणी कलावंतांचं मला नेहमीचं कौतुक वाटतं , विशेष करुन विकास कदम, किशोर कदम ( सौमित्र ) आणि चिन्मय मांडलेकर.

  ReplyDelete
 30. कांचनजी,

  नटरंगबद्दल खूप सुरेख लिहिलंत. पोस्ट वाचून आज पुन्हा नटरंग बघायचा प्लॅन केलाय.

  आमच्याकडे (खरगपूरमध्ये) मराठी चित्रपट मिळणं महामुश्कील आहे (कदचित कलकत्त्यात मिळत असतील). पण नटरंग आला तेंव्हा प्रचंड खटाटोप करून soft copy मिळवली आणि चित्रपट पाहिल्यानंतर तो खटाटोप सार्थकी लागल्यासारखं वाटलं. पिंजरानंतर असा चटका लावणारा तमाशापट नटरंगच! तरी मोठ्या पडद्यावर पाहण्याचं राहूनच जाणार आहे.

  लावणीइतका अस्सल मराठी कलाप्रकार दुसरा नसेल.
  एरवी शहरी आणि सुशिक्षीत वर्ग लावणीला नाकं मुरडतो, पण अजय-अतुलनी तरुणांना लावणी ऐकायला लावलंय यातच त्यांच्या संगीताची ताकद आहे.

  नटरंगप्रमाणंच विश्वास पाटलांची चंद्रमुखीदेखील तमाशाचं जग प्रत्ययकारी शब्दांत उभं करते, फक्त चंद्रमुखीचा कॅनव्हास वेगळा (चित्रपटाची कथा लिहिल्यासारखा) आहे.

  प्रशांत पवारांचे लोकसत्तातले हे दोन लेख (टीकाकारक असले तरी) वाचनीय आहेत:
  १) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=55630:2010-03-18-11-24-47&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

  आणि

  २) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=57651:2010-03-26-10-13-05&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

  विवेक.

  p.s.

  तुमचा ब्लॉग आज प्रथमच पाहिला. सुरेश पेठेंच्या ब्लॉगवरील विजेटवरून "मोगरा फुलला" वर आलो.
  तुमच्या लेखांचा खजिना मला खूप दिवस पुरेल. मीही नुकताच ब्लॉग सुरु केलाय.
  http://ramalkhuna.blogspot.com/ लिखाणाचा उत्साह किती टिकेल सांगता येत नाही.

  आणि तुमचा प्रोफाईलवरील फोटो पाहताच तुम्ही gemini (मिथुन राशीच्या) असाव्यात असं फटकन वाटून गेलं. (वाचण्याआधी हं!)

  ReplyDelete
 31. सचिन,

  प्रतिक्रिया स्विकारण्याच्या स्वरूपात थोडा बदल केल्याने आपली प्रतिक्रिया मला दिसली नव्हती. इतक्या उशीरा उत्तर दिल्याबद्दल क्षमस्व! नटरंग मनाला भावला. सिनेमॅटीक लिबर्टी याही चित्रपटात आहे. पण असंच घडू शकेल, असं जर डोक्यात ठेवलं तर नटरंग एक उत्कृष्ट चित्रपट आहे.

  सोहम,
  हो, गुरू ठाकूरांनी त्यात भूमिका केली आहे. शिरपतराव! गुणा ज्याच्या शेतावर काम करत असतो तो. ती भूमिका गुरू ठाकूरांनी केली आहे.

  विवेकजी,
  एकदा तरी पहावाच असा नटरंग आहे. मी स्वत: हा चित्रपट दोन वेळा पाहिला. मूळ कथा व पटकथा यांत थोडा फरक आहे पण चित्रपट म्हटला की हे बदल असतातच. मात्र मूळ संहितेला पटकथेमधे कुठेही धक्का लागलेला नाही. आपला ब्लॉग पाहिला. अवश्य वाचेन. आपण दिलेल्या लोकसत्ताच्या दोन दुव्यांपैकी लावणीचे वाजले की बारा हा लेख वाचला आहे. दुसरा वेळ काढून वाचावा लागेल कारण बराच मोठा व माहितीपूर्ण लेख आहे. ब्लॉगर मेळाव्यास आपली उपस्थिती अवश्य असू द्या.

  ReplyDelete
 32. अरे हो ... ऑफिसमधुन घरी येईपर्यंत मी आठवत होतो. म्हटल २ वेळा पाहिला आपण सिनेमा पाहिला आपल्याला कसा नाही दिसला कळालं गुरु ठाकुर ? मग आतुन आवाज आला ... " लबाडा सोनाली शिवाय काय दिसलं का तुला ?"

  :- सोहम

  ReplyDelete
 33. अरे लब्बाड!ती अप्सरा तुझ्या मनात घर करून गेली म्हणायची.

  ReplyDelete
 34. हो ना .. कांचन .. पण दुनिया किती जालिम असते पहा ...

  पुष्कळ प्रयत्नांनंतर तीचं फेसबुक प्रोफाईल मिळालं. पण मी तिला अ‍ॅड करु शकत नाही ... टु मेनी फ्रेंड्स म्हणे .. :(

  ReplyDelete
 35. खरच छान वाटल पाहून, अभिनंदन आणि सर्वाना शुभेछ्या

  http://www.marathimann.in/

  http://freemarathicalender2010kalnirnay.blogspot.com/

  ReplyDelete
 36. सोहम,
  :-( वाईट वाटलं ऐकून पण हरकत नाही. तिचे फोटो तर पहायला मिळतील ना तुला!

  ReplyDelete
 37. नटरंगसाठी माझ्याही सदिच्छा आहेतच. हा चित्रपट जास्तीत जास्त मराठी प्रेक्षकांनी पहावा.

  ReplyDelete
 38. natrang chitrapat khup chan ahe tyatil kalakarani khup mehnat ghetali ahe.baryach vershananter punha junya marathi chitrapatanchi athavan zali

  ReplyDelete
 39. natrang chitrapat khup chan ahe tyatil kalakarani khup mehnat ghetali ahe.baryach vershananter punha junya marathi chitrapatanchi athavan zali

  ReplyDelete