Wednesday, January 27, 2010

आठवण की बक्षीस?

प्रतिक्रिया: 
२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट म्हणजे शाळेतील तासा-दीड तासाच्या कार्यक्रमानंतर सुट्टीच! पण त्या दीड तासाच्या कार्यक्रमाची मी किती वाट पहायचे? ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी शाळेमधे काही मोठ्या व्यक्तिंना बोलावलं जायचं. खरं सांगते, त्यातील एकाही व्यक्तीचं भाषण माझ्या लक्षात नाहीये. आदल्या दिवशी कॅनव्हासचे बूट व्हाईटनरने पॉलीश करून ठेवणं, वेण्यांना बांधायच्या लाल रिबिनींना सुद्धा इस्त्री करणं, दुस-या दिवशी सकाळी सहा वाजता कटकट न करता उठणं, सगळं आवरून वेळेवर शाळेत जाणं हे सर्व त्या भाषणांसाठी नि नंतर मिळणा-या गोळ्या-चॉकलेटांसाठी मुळीच नव्हतं.

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन्ही दिवशी मी जायचे, ते केवळ त्या तिरंग्याला सल्यूट करण्यासाठी. आमचे पी.टी.चे सर ऑर्डर्स द्यायचे, त्यानुसार आम्ही सगळे खाडकन सावधान व्हायचो आणि आपल्या तिरंग्याला सल्यूट द्यायचो. मग राष्ट्रगीत सुरू व्हायचं. त्यावेळी आपल्याला काय वाटतंय, हे व्यक्त करण्याएवढी बुद्धी नव्हती पण ताठ मानेनं तिरंग्याला सल्यूट करण्यामधे एक वेगळाच आनंद मिळायचा. शरीरात काहीतरी वेगाने धावतंय असं वाटायचं.

शाळेत एकदा बाईंनी सांगितलं होतं, "रस्त्यातून चालत असतानाही कुठे राष्ट्रगीत सुरू असलेलं ऐकू आलं तर आपण जागीच थांबून आपल्या राष्ट्रगीताला मान द्यायचा असतो." ही गोष्ट माझ्या पक्की लक्षात राहिली होती. मी त्यावेळेस चौथीत होते. असाच ध्वजवंदनाचा कार्यक्रम आटोपून मी घरी आले होते. आईने नेहमीसारखं ’अभ्यासाला बस’चं न सांगता खेळण्यासाठी परवानगी दिली होती. मी खेळायला गेले पण माझ्या मैत्रीणी काही अजून आपापल्या शाळांमधून आल्या नव्हत्या. मग काय करणार? इकडे तिकडे हुंदडणं सुरू होतं. आमच्या घराच्या जवळ एक मोठा हॉल होता. त्याला ’समाज मंदिर हॉल’ असं नाव होतं. या हॉलच्या समोरच्या पटांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जमायचे. आम्ही त्यांना ’शाखेचे लोक’ म्हणायचो. नेहमीसारखेच ते आजही जमले होते. आज ते नेहमीसारखा गोल करून बसले नव्हते. पांढरा शुभ्र शर्ट, खाकी हाफ पॅन्ट अशा गणवेशात ते शिस्तबद्ध उभे होते. त्यांनी तिकडे राष्ट्रगीत म्हणायला सुरूवात केली आणि मीही माझं इकडे तिकडे हुंदडणं सोडून राष्ट्रगीतासाठी जागच्या जागी उभी राहिले. राष्ट्रगीत संपलं. मी पुढे पाऊल टाकणार इतक्यात शाखेच्या लोकांमधील एका काकांनी मला हाक मारून बोलावलं. त्यांच्या मिशांमुळे आधीच मला त्यांची भिती वाटायची, त्यात त्यांनी जवळ बोलावल्यावर मला कळेना की माझं नेमकं काय चुकलं? मी त्यांच्याजवळ गेले. त्यांच्याबरोबरचे लोक माझ्याकडे बघून नुसतेच स्मितहास्य करत होते. काकांनी मला दोन्ही हातांची ओंजळ पुढे करायला सांगितली. मी हात पुढे केले. काकांनी त्यांच्या हाताच्या ओंजळीत मावतील इतकी चॉकलेटं काढून माझ्या हाताच्या ओंजळीत ठेवली आणि म्हणाले, "शाब्बास! नेहमी राष्ट्रगीताला असाच मान देत जा." चॉकलेट देण्यामागचं कारण मला कळलं. ती चॉकलेटं घेऊन मी घरी आले पण का कोण जाणे मला ती खावीशी वाटली नाहीत. मला बक्षीस मिळणं चुकीचं वाटलं.


हा प्रसंग मी आजही विसरले नाही. जेव्हा प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करण्याची बुद्धी आली तेव्हा मी या चॉकलेटच्या घटनेचे अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला. पण प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहेत. मला चॉकलेट बक्षीस मिळाली ती कशासाठी? मी राष्ट्रगीत सुरू असताना त्याला मान दिला ही अनन्यसाधारण गोष्ट होती का? की चौथीतल्या मुलीला ह्या गोष्टीची जाणीव असावी, हे कौतुकास्पद होतं? की देश व राष्ट्रगीताबद्दलच्या आपल्या भावना काळापरत्वे बदलू नयेत, म्हणून कायम लक्षात रहाण्यासाठी दिलेली ती आठवण होती?

10 comments:

 1. खरच विचार करण्या सारखी गोस्ट आहे .. पण काहीं वेळा उत्तर न शोधंच योग्य असते नाही का ? महेश

  ReplyDelete
 2. काही प्रश्न अनुत्तरीत रहाणं योग्य असलं तरी एक प्रश्न म्हणून ते विचार करायला भाग पाडतातच.

  ReplyDelete
 3. माझ्यामते ती एक केवळ शाबासी होती, आणि त्यात वाईट ते काय?
  राष्ट्रगीताला मान देणे ही अनन्यसाधारण गोष्ट होती/आहे...
  चौथीतल्या मुलीला याची जाणीव असणं हे सुद्धा कौतुकास्पद आहेच.
  आणि बक्षीसामुळे जर चांगलं काही होत असेल तर यात काहीच गैर नाही...

  ReplyDelete
 4. माझ्याही मनात पहिला विचार हाच आला होता, आनंद. आता जेव्हा मी थिएटरमधे राष्ट्रगीत सुरू असताना सीट नंबर शोधणा-या लोकांना पहाते, तेव्हा मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात तो चॉकलेटचा प्रसंग घडणं, हे माझं सुदैव आहे.

  ReplyDelete
 5. मध्यंतरी राष्ट्रगीत सुरू असताना बसलेल्या लालू आणि राबडीचा फोटो असलेला मेल तुम्हाला आला असेलच. ते पाहता एवढ्या लहान वयात राष्ट्रगीताचा आणि तिरंगग्याचा मान ठेवणे नक्कीच कौतुकास्पद होते.

  हा लेख वाचून मला देखील लहानपणीचे झेंडा वंदन, कॅनव्हासचे बूट पॉलीश करणे, तिरंग्याला सल्यूट करणे सगळं आठवलं. आमचे NCCचे सर ऑर्डर्स द्यायचे. ते आधी सैन्यात होते. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ते त्यांचा कडक यूनिफॉर्म घालून यायचे. त्या दिवशी त्यांच्याकडे पाहिलं की बाकी सगळे "मास्तर" वाटायचे.

  ReplyDelete
 6. हो सिद्धार्थ, तो लालू-राबडीचा फोटो मी पाहिला होता. मलाही आमच्या सरांच्या त्या ऑर्डर्स आठवतात.

  ReplyDelete
 7. कौतुकास्पद!!!कांचन तुझ कौतुक केल ते पुरेस नव्हत. कारण कमी वयात या गोष्टी उमगत नसतात.

  ReplyDelete
 8. धन्यवाद सुलभाजी. देश आणि राष्ट्रगीताबद्दल प्रत्येकाच्या मनात हीच भावना असावी असं मला वाटतं.

  ReplyDelete
 9. तुम्ही त्याला आठवण म्हणू शकता किंवा बक्षीसही म्हणू शकता. कदाचित तुम्ही जो आदर दाखवला तो किती योग्य आहे आणि तो सदैव तसाच ठेवा म्हणून दिलेली स्फुर्ती देखिल म्हणू शकता. जर त्यावेळी तुमच्या सोबतचे विद्यार्थि हे पाहून काही समजले असतिल तर त्याच्यासाठी तुमच्या ओंजळीत दिलेला बोध म्हणू शकता... :)

  ReplyDelete
 10. सौरभ, मी त्यावेळेस एकटीच खेळत होते. ती चॉकलेटची आठवण मला कायम स्फूर्तीरूपच वाटत आली आहे.

  ReplyDelete