Monday, January 18, 2010

बोलपटाचा मुहूर्त - अयोध्येचा राजा

प्रतिक्रिया: 
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक श्री. दादासाहेब फाळके यांनी निर्माण केलेला पहिला बोलपट - अयोध्येचा राजा.

अयोध्येचा राजा हरिश्चंद्र हा दानशूर म्हणून अतिशय प्रसिद्ध होता. त्याच्या दानशूरपणाची ख्याती ऐकून महर्षी विश्वामित्र एकदा त्याची सत्वपरिक्षा घेण्याचं ठरवितात. या सत्वपरिक्षेत राजा हरिश्चंद्र केवळ आपलं राज्यच दान करत नाही, तर आपलं सर्वस्व गमावून बसतो, या पौराणिक कथेवर आधारित हा चित्रपट होता.

गोविंदराव टेंबे व दुर्गा खोटे यांनी या चित्रपटात अनुक्रमे राजा हरिश्चंद्र व राणी तारामतीच्या प्रमुख भूमिका केल्या होत्या तर मास्टर विनायक ह्यांनी नारदाची भूमिका केली होती. मास्टर विनायक म्हणजे मिनाक्षी शिरोडकर यांच्या स्विमिंग कॉस्च्युममुळे बहुचचर्चित ठरलेला जुना मराठी चित्रपट ’ब्रह्मचारी’चे नायक व सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री नंदा यांचे वडील. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते व्ही. शांताराम.

अयोध्येचा राजा
Image credit: YouTube video

चित्रपटात आणखी एक पहाण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रसंग सुरू असताना, एखाद्या पात्राच्या तोंडी विशेष संवाद असताना इतर पात्रं हळूहळू कॅमे-याच्या फ्रेममधून बाहेर जात, ज्यामुळे आपोआप एकाच पात्रावर लक्ष एकवटलं जात असे.

अनेक परिश्रम घेऊन दादासाहेब फाळक्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. १९३२ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट पहाताना लक्षात येतं की राजवाड्याचा मोठा सेट व बाह्यचित्रीकरणासाठी बनविलेले इतर सेट, तसेच कपडेपट, दागिने यांच्यावर किती पैसा खर्च झाला असेल. प्रभात चित्र या बॅनरखाली हा चित्रपट प्रदर्शीत झाला.

दादासाहेब फाळक्यांच्या रुपाने भारतीय जनतेला स्वप्न पहाण्यासाठी एक नवीन चित्रप्रभात झाली. बोलपटाचा ध्यास घेऊन, वेळप्रसंगी कर्जबाजारी होऊन प्रेक्षकांसमोर कलाकृती सादर करणा-या त्या महर्षीला त्रिवार वंदन आणि ‘प्रभात चित्र’ला मानाचा मुजरा!

दादासाहेब फाळक्यांबद्दल अधिक माहिती या ठिकाणी वाचावयास मिळेल.


या लेखात ब-याचशा चुका आहेत. लेखाखाली दिलेल्या प्रतिक्रिया वाचल्यास त्याचा उलगडा होईल.

11 comments:

 1. माहिती बद्दल धन्यवाद.
  पण एक शंका आहे. तुम्ही 'अयोध्येचा राजा' हा सिनेमा पहिला भारतीय बोलपट म्हणताय की दादासाहेब फाळके ह्यांचा पहिला बोलपट? कारण माझ्या माहितीप्रमाणे 'आलम आरा' हा पहिला भारतीय बोलपट १४ मार्च १९३१ ला प्रदर्शित झाला होता.

  ReplyDelete
 2. ’अयोध्येचा राजा’ हा दादासाहेब फाळक्यांनी बनविलेला पहिला बोलपट आहे. पहिला भारतीय बोलपट असण्याचा मान ’आलम आरा’ या चित्रपटाकडेच जातो. दादासाहेब फाळक्यांनी ’राजा हरिश्चंद्र’ या नावाचा एक मूकपट तयार केला होता, तो भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट आहे. बोलपट ’आलम आरा’ १९३१ साली, तर बोलपट राजा हरिश्चंद्र’ १९३२ साली प्रदर्शित झाला. मूकपट राजा हरिश्चंद्र’ १९१३ साली प्रदर्शित झाला होता. आता तुम्ही विषय दिलाच आहे, तर ’आलम आरा’वरही लिहीन. पण मला वाटतं तो चित्रपट पहाण्यासाठी उपलब्ध नाही.

  ReplyDelete
 3. कराई बाई : 'राजा हरिश्चंद्र' हा मूकपण दादासाहेब फाळके यांनी निर्माण केला आणि १९१३ साली तो प्रदर्शित झाला. त्याआधीही एक भारतीय सूत्र असलेला मूकपट बहुतेक प्रदर्शित झाला होता, पण त्याची निर्मिती परदेशात झाली होती. परदेशात झाली म्हणजे १००% बाहेरच झाली, असे नसेल. चित्रपटाचे नाव आठवत नाही, पण त्याचा उल्लेख भालजी पेंढारकरांच्या 'साधा माणूस' नावाच्या पुस्तकात आहे. फाळक्यांचा मूकपट हा भारतात तयार केलेला पहिला मूकपट.

  पुढे बाबूराव पेंटरांच्या 'महाराष्ट्र फ़िल्म कंपनी'ने कोल्हापुरात मूकपट निर्मितीत लौकीक कमावला. त्यांच्या गलथान कारभाराला कंटाळून व्ही शांताराम, विष्णुपन्त दामले, फ़त्ते लाल आदि मंडळींनी आपली प्रभात फ़िल्म कंपनी (१९२८ सुमारास) स्थापिली. प्रभातचे मूकपटही गाज़ू लागले. मार्च १९३१ मधे इंपीरिअल-चा 'आलम आरा' हा पहिला बोलपट प्रदर्शित झाला. बोलपट उथळ असतात आणि लोक त्यांना लवकरच विसरतील, असा प्रभातचा अंदाज़ होता. पण आपण बोलपट टाळून चालणार नाही हे लक्षात येऊन त्यांनी फाळक्यांच्याच 'राजा हरिश्चंद्र' नावाचा वापर करून हिंदी आणि मराठीत चित्रपट करायला घेतला. या बोलपटाशी फाळके यांचा काहीही संबंध नाही.

  २३ जानेवारी १९३२ रोजी 'अयोध्या का राजा' हा हिंदी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. दोन आठवड्यांनी (६ फ़ेब्रुवारीला) मराठी चित्रपट मुंबईतच प्रदर्शित झाला. ६ फ़ेब्रुवारीच्या ७-१० दिवस आधी एक मराठी बोलपट (नाव आठवत नाही, आणि पुस्तक उघडून ते पहायचा कंटाळा आला आहे) प्रभातपेक्षा आधी प्रदर्शित करण्याच्या जिद्‌दीने घाईघाईत पूर्ण करून प्रदर्शित झाला. त्याचे संगीतकार केशवराव भोळे लिहितात की या बोलपटातले देखावे धड दिसत नव्हते, गाणी नीट ऐकू येत नव्हती.

  'आलम आरा'ची प्रिण्ट कधीच ज़ळून नष्ट झाली. त्यातल्या एका गाण्याचे काही शब्द त्या बोलपटातली नटी 'ज़ुबेदा' एका कार्यक्रमात गायली. नूर जहाँ १९८२ सुमारास भारतात आली होती, तेव्हाचा हा कार्यक्रम असेल. ती एक ओळ काय ती आज़ ऐकायला मिळते.

  प्रभात-चा 'अयोध्येचा राजा' हा मराठी बोलपट तबकडीवर आला आहे. हिंदी रीळ उपलब्ध आहे, पण ती तबकडी काढल्यास विकल्या ज़ाणार नाही ही भीती असल्यामुळे ती नुसतीच पडून आहे.

  सप्टेंबर-ऑक्टोबर १९३३ च्या सुमारास 'प्रभात'नी आपला मुक्काम पुण्याला हलवला. तो इतिहास सर्वश्रुत आहे.

  - नानिवडेकर

  ReplyDelete
 4. मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६ जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश

  ReplyDelete
 5. I checked the wiki article on Dadasaheb Phalke, and realised that Phalke's first silent film was named 'Raja Harishchandra', not 'Ayodhyecha Raja'. Prabhat chose the same theme but used the title 'Ayodhyecha raja' for its first talkie. To repeat, Phalke played no part in producing Prabhat's first talkie.

  Dadasaheb Torne's 'Pundlik' was screened before Raja Harishchandra. It might have been produced outside India or with the help of foreign technicians, or its length may not entitle it to be called a full-scale film, or its production started after Raja Harishchandra but its release came before. Some such reason should account for Raja Harishchandra, instead of PUNDLIK, being treated as the first Indian silent film.

  - dn

  ReplyDelete
 6. I had written : पण आपण बोलपट टाळून चालणार नाही हे लक्षात येऊन त्यांनी फाळक्यांच्याच 'राजा हरिश्चंद्र' नावाचा वापर करून हिंदी आणि मराठीत चित्रपट करायला घेतला.

  Please change नावाचा to kathechaa, if possible.
  I knew I had made some mistake somewhere in my first post.

  - dn

  ReplyDelete
 7. नानिवडेकर साहेब, अत्यंत मोलाची व महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार! ’आलम आरा’ची प्रिंट जळाली आहे, हे माहित नव्हतं. मात्र त्या गाण्यातील शब्द जुबेदाजींनी ज्या कार्यक्रमात गायले होते, तो कार्यक्रम मी पाहिला होता. शबाना आजमींनी त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. तो माझ्या आयुष्यातील पहिला वहिला कार्यक्रम होता, जो मी टि.व्ही. वरून टेपरॉकर्डरवर रेकॉर्ड केला. त्याच्या जवळपास साडेचार कॅसेटस (ध्वनिफिती) माझ्याकडे होता. आता एकही नाही. मी ’साधा माणूस’ पुस्तक वाचलेलं नाही. मिळवून वाचेन.

  आपल्याला जुन्या चित्रपटांबद्दल बरीच माहिती आहे, असे दिसते. ’अयोध्येचा राजा’ची संकलित चित्रफित उपलब्ध आहे, त्यामुळे त्यात ब-याचशा गोष्टी गायब आहेत. प्रभात चित्रचं सुरूवातीचं संगीतही त्यात उपलब्ध नाही. मी प्रभात चित्रच्या इतरही चित्रपटांबद्दल लिहिणार आहे. लेखामधे अनावधानाने काही चुका झाल्यास किंवा काही बदल करावयाचा असल्यास आपण तो जरूर करावा अशी विनंती करेन. आपला ईमेल आय. डी. मिळाला असता, तर लेख प्रसिद्धीपूर्व सुधारणेसाठी आपल्याकडे पाठवता आला असता. (ऋणनिर्देशात आपले नाव असेल, याची दक्षता घेईन.)

  प्रभात चित्रच्या बोलपटाआधी जिद्दीने प्रदर्शित केलेल्या ’त्या’ बोलपटाचे नाव ’रोपट्यांची वाढ’ असे तर नाही? कृपया त्या बोलपटाचे नाव निराळे असल्यास तसे इथे नमूद कराल का?

  आपण लेख वाचून, वेळ काढून कळकळीने इतकी माहिती पुरविल्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनापासून आभार! आणि ’बाई’ वगैरे नको. मी आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही नक्कीच लहान आहे. मला कांचन म्हटलंत तर आवडेल.

  ReplyDelete
 8. महेश, त्या सर्वांनी केवळ चर्चा न करता, कृती केली, याचा एक ब्लॉगर म्हणून मला अभिमान वाटतो. मीही त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते.

  ReplyDelete
 9. नानिवडेकर साहेब, आपल्या सर्व प्रतिक्रिया व अभिप्राय वाचले. आपण खरोखरच उत्तम माहिती दिली आहेत. प्रतिक्रिया देताना नकळत एखादी चूक होऊन जाते पण आपण इतकी माहिती दिलीत, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

  ReplyDelete
 10. मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली होती, पण ती प्रतिक्रिया इथे काही दिसत नाही. ते असो.

  प्रभातच्या चित्रपटांवर भरपूर लिहिल्या गेलं आहे. १९३१ ते १९५० मधले इतर मराठी चित्रपट हा त्या मानानी दुर्लक्षित विषय आहे. त्यातल्या काही चित्रपटांच्या प्रिंट्‌स गांधीजींच्या वधानंतर भालजींचा स्टुडिओ ज़ाळला, तेव्हा नष्ट झाल्या असतील. उदा. 'गजाभाऊ', 'माझं बाळ', 'चिमुकला संसार' हे मा विनायक यांचे चित्रपट उपलब्ध नसावेत. तुम्ही त्याबद्‌दल संशोधन करू शकता. असे इतरही विषय हाताळण्यासारखे आहेत.

  - नानिवडेकर

  ReplyDelete
 11. नानिवडेकर साहेब, माझ्याकडे आलेल्या आपल्या सर्व प्रतिक्रिया मी इथे प्रकाशित केल्या आहेत. त्या प्रतिकियांचे नमुने माझ्याकडे अजूनही उपलब्ध आहेत. मी तपासून पाहिले. आज दिलेल्या प्रतिक्रियेच्या आधीची आपली प्रतिक्रिया म्हणजे आपण जो शब्दबदल सुचवला होतात - नावाचा to kathechaa, ही शेवटची प्रतिक्रिया होती. आपल्याला शक्य असल्यास आपल्याला अपेक्षित असलेली प्रतिक्रिया लिहून पाठवा. आपण वर उल्लेखिलेले तीनही चित्रपट मला उपलब्ध झालेले नाहीत. शोधून अवश्य पाहिन. धन्यवाद!

  ReplyDelete