Tuesday, January 12, 2010

सदैव – पान ६

प्रतिक्रिया: 
मोई दिसेनाशी झाली आणि हुन उठला, त्याने तो कागद उलगडून वाचला. मोईने त्याला दुस-या दिवशी सकाळी भेटायला बोलवलं होतं, तेही नेहमीच्या वेळेपेक्षा थोडंसं आधी! हुनचा विश्वासच बसेना! त्याने पुन्हा पुन्हा तो कागद वाचून पाहिला. तो कागद हातात धरुन नाचत नाचत आपल्या प्रासादापर्यंत जावं इतका तो आनंदित झाला होता. पण दुस-याच क्षणी तो पुन्हा उदास झाला.

“इतके दिवस इथे येऊन बसतो आहे. पण तिने माझ्याकडे कधीच पाहिलंही नाही आणि आज ही चिठ्ठी! कुणास ठाऊक, ती ’हो’ म्हणतेय की....” हुनने दूर कुठेतरी पहात स्वत:शीच म्हटलं.

दुस-या दिवशी मोईला आपल्याही आधी आलेलं पाहून हुनच्या मनातील निराशेची जळमटं साफ झाली. तिचं लाजरं हास्य पाहूनच हुन काय समजायचं ते समजला. पण तिच्या तोंडून होकार ऐकल्याशिवाय त्याला चैन थोडचं पडणार होतं? तिच्याजवळ जाऊन तो चुपचाप उभा राहिला, तिच्या उत्तराची वाट पहात.

मोईची अवस्था तर अशी होती की लज्जेमुळे तोंडातून शब्द फुटत नव्हता पण न बोलते तर त्याचा गैरसमज व्हायचा. अंगठ्याने जमीन उकरता उकरता तिने हळूच त्याच्याकडे पाहून घेतलं. त्याचा चेहरा पाहून ती खुदकन हसली. तिला हसताना पाहून तोही हसू लागला. अचानक त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले.

“मोई, तुझं हसू किती सुंदर आहे गं!”

मोईने त्याच्या हातून आपला हात सोडवूनही घेतला नाही की काही बोललीही नाही.

“बोल ना गं काहीतरी.”

“एक विचारू तुला?”

“हं. विचार ना!”

“माझ्या उत्तरासाठी एक आठवड्याची मुदत मागितली होती मी. तरीसुद्धा तू रोज इथे येऊन बसण्याचं कारण?”

“तुला पहाण्यासाठी!”

हुनच्या या शब्दांनी मोई पुन्हा लाजली. हुनने तिची हनुवटी धरून तिचा चेहेरा आपल्या दिशेने वर केला.

“खरंच मोई. तुला ज्या दिवसापासून पाहिलं, त्या दिवसापासून केवळ तुझाच विचार केला मी. तुला सारखं पहात रहावं असं वाटायचं. म्हणून तर रोज सकाळी इथे येण्याची सवयच लागली मला.”

“पण तुंग, आपल्याला नेहमी इतक्या सकाळी भेटता येणार नाही. माझ्या मैत्रीणींना, माझ्या बाबांना कधीतरी माझा संशय येईल.”

“तर मग आपल्या भेटीची वेळ निराळी ठेवावी लागेल.”

“मी सांगते. दर दोन दिवसांनी संध्याकाळी मी तान फू व्यापा-याच्या घरी सूत आणायला जाते. तिकडे कितीही वेळ जाऊ शकतो. तान फूचं घर गावाच्या एका टोकाला आहे. सूत घेऊन झालं की मी गावाबाहेरच्या सर्वात मोठ्ठ्या झाडामागे भेटत जाईन. ती वेळ आपल्या भेटीसाठी सर्वात योग्य वेळ आहे.”

“छान! मग तर प्रश्नच मिटला.”

हुन आणि मोईने अशा त-हेने आपल्या भेटीचे ठिकाण आणि वेळ निश्चित केली. त्यांच्या या गुप्त भेटींची खबरबात कुणालाच नव्हती. नाही म्हणायला मोईची मैत्रीण मिंग हिला सर्व ठाऊक असायचं पण मिंगने याची वाच्यता कुठेच केली नव्हती.

जसजशा मोईसोबत भेटी वाढू लागल्या तसतशी हुनच्या मनात मोईबद्दलची अभिलाषा आणखीनच बळावू लागली. पण एकीकडे त्याचं मन त्याला खात होतं. मोई त्याला हुनचा खास सेवक तुंग म्हणून ओळखत होती. तिला जर तो सरदारपुत्र हुन आहे, हे कळलं असतं तर ती त्याचा तिरस्कारच करू लागली असती. मोईशी विवाह करण्याच्या निश्चयावर हुन अगदी ठाम होता. मोईनेही त्याला विवाहाच्या बाबतीत दोन-तीनदा छेडलं होतं. पण खरं सांगितलं तर विवाह होणार नाही आणि खोटं सांगून विवाह करता येत नाही अशा द्विधा मन:स्थितीत हुन अडकला होता. हा तिढा कसा सोडवायचा, हेच त्याला कळत नव्हतं. मोईला खरं सांगून मोकळं व्हावं असं त्यालाही वाटत होतं, पण ते खरं तिला अशा पद्धतीने कळेल, असा विचार त्याने कधीच केला नव्हता.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.


No comments:

Post a Comment