Saturday, January 9, 2010

सदैव – पान ५

प्रतिक्रिया: 
मनासारखा जीवनसाथी न मिळाल्यास अविवाहित राहण्याचा निर्धार करणा-या मोईला हुन भेटला. त्याला ती तुंग म्हणून ओळखत होती. आपल्या घरात पलंगावर पडल्या पडल्या मोई तुंगचाच विचार करत होती. पहिल्या भेटीतच तिला तो आवडला होता. त्याचा स्पष्टवक्तेपणा, तिच्यावरचं प्रेम व्यक्त करणं, तिच्या नकाराचाही आदर करणं, हे सगळं सगळं तिला खूप आवडलं होतं. उतावीळपणे ती त्याला दुस-याच दिवशी होकार देणार होती. पण एक आठवड्याची मुदत तिनेच मागून घेतली होती. तेव्हा असं अधीर होणं बरं दिसलं नसतं. हुनकडून मागितलेली मुदत संपली की त्याला होकार द्यावा, असं मोईने ठरवलं.

पण दुस-याच दिवशी तुंगला नदीकिनारी बसलेलं पाहून मोईच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. त्याला तसं बसलेलं पाहून मोईच्या मैत्रीणींनी तिची चेष्टामस्करी करायला सुरूवात केली. मोईला काय करावं कळत नव्हतं. त्याला तिथे पाहून तिला खरं तर खूप आनंद झाला होता. त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी बोलावं असं तिला खूप वाटत होतं पण सोबत मैत्रीणी होत्या. तसं केलं असतं तर चेष्टामस्करी आणखीनच वाढली असती. म्हणून मोईने त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि पाणी भरून ती निघून गेली.

पुढचे दोन दिवस हाच प्रकार घडला. तुंग शांतपणे लांबूनच तिच्याकडे पहात असायचा. त्याच्याकडे लक्ष नाही असं दाखवताना मोईला फार प्रयास पडायचे. त्याची नजर आपल्यावरच खिळलेली आहे, हे जाणवलं की तिला आणखीनच अवघडायला व्हायचं. त्यातच मैत्रीणींची चेष्टामस्करी सुरू झाली की ती अगदी गुदमरून जायची. ’आत्ता ही अवस्था, तर त्याने दिलेली मुदत संपेल, त्या दिवशी काय होईल,’ असा विचार मनात आला की मोईच्या गालावर लज्जेची लाली पसरायची. मैत्रीणींच्या न कळत तुंगशी कसं बोलता येईल याचा ती विचार करत होती. शेवटी तिला काहीच सुचलं नाही म्हणून तिने सरळ मिंगची मदत घ्यायचं ठरवलं. मिंगला एकांतात गाठून तिने तुंगबद्दल सगळं सांगितलं.

“काय सांगतेस? त्याने तुला लग्नाची मागणी घातली?” मिंगचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते.

मोईने फक्त होकारार्थी मान हलवली. तिचा लाजरा चेहेरा पाहून मोईदेखील तुंगवर अनुरक्त आहे हे मिंगने ओळखलं. तिलाही कळेना की तुंग आणि मोईची एकांतात भेट होण्यासाठी मोईला मैत्रीणींच्या गराड्यातून कसं बाहेर काढावं. अचानक तिला एक युक्ती सुचली.

“हे बघ मोई, आपली नदीवर जाण्याची वेळ ठरलेली असते. म्हणून तर तुंग सुद्धा त्याच वेळी येऊन बसतो. एक करता येईल. तू ठरलेल्या वेळेच्या आधी जर तुंगला भेटलीस तर कुणालाच कळणार नाही.” असं म्हणून मिंगने मोईला एक युक्ति सांगितली. मोई त्या युक्तीवर इतकी खुश झाली की तिने मिंगला मिठीच मारली. त्यावर मिंगनेही तिची चेष्टामस्करी केली.

“बास, बास, बाईसाहेब. हे सर्व त्या तुंग महाशयांसाठी राखून ठेवा.”

मोईने हे ऐकलं आणि ती लाजून बाहेर पळाली.

दुस-या दिवशी मोईला अपेक्षेप्रमाणे तुंग नदीकिनारी बसलेला दिसला. तिने नेहमीसारखंच त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं आणि पुढे झाली. सर्वजणी पाणी भरत असताना तिने अचानक मागे वळून पाहिलं. तुंग तिच्याचकडे पहात होता. मोईने झटकन आपल्या अंगरख्यातून एक कागद व दगड काढला आणि कागदात दगड बांधून तिने तो किना-यावर फेकून दिला. तुंगकडे एक कटाक्ष टाकून ती पुन्हा आपल्या सॉन्गमधे पाणी भरू लागली. तुंगने तो फेकलेला कागद पाहिला होता पण तो कागद केवळ आपल्यासाठीच आहे, याची त्याला कल्पना आली होती. इतर कुणासमोर तो कागद उचलला असता, तर मोईचं गुपित फुटलं असतं. त्यामुळे चेहे-यावर कोणतेही भाव न आणता, तो तसाच बसून राहिला. मोई नेहमीप्रमाणे पाणी भरून आपल्या मैत्रीणींसोबत निघून गेली.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment