Thursday, January 7, 2010

सदैव – पान ४

प्रतिक्रिया: 
“मग आता तर तुला कळलं ना की मी कुणी श्रीमंत नाही. आता तरी करशील ना माझ्या प्रेमाचा स्वीकार?” हुन ने विचारलं.

मोईला काय उत्तर द्यावं ते कळत नव्हतं. ती नुसतीच खाली मान घालून उभी राहिली.

“मला तर तुमचं नावही माहीत नाही.” तिने हळूच म्हटलं.

“तुंग.... माझं नाव तुंग आहे.” हुन ने हसत म्हटलं. तो मोईच्या चेहे-यावरचे हावभाव निरखत होता.

“मला इतक्या लगेच विचार नाही करता येणार. मी तर तुम्हाला पुरतं ओळखतंही नाही. मला विचार करायला एक आठवड्याचा अवधी द्या.” त्या अवघड प्रसंगातून्स सुटका करून घेण्यासाठी मोईने मुद्दाम अडचण उभी केली.

“जरूर! तुला माझ्याबद्दल हवी असलेली माहिती, मी आत्ताही सांगायला तयार आहे. मी अविवाहित आहे. राजपुत्र हुनच्या खास सेवकांपैकी मी एक आहे त्यामुळे मला राजमहालातच रहावं लागतं. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालावा, इतकं वेतन मला नक्कीच मिळतं. माझे वडीलच माझ्यासाठी आई आणि वडील दोन्ही आहेत. मला भाऊ-बहिण नाहीत. मला निरनिराळ्या युध्दकला येतात. शिवाय मी चित्रही काढू शकतो.” हुनने एका दमात आपली माहीती सांगितली. मोई त्याच्याकडे एकटक पहात होती.

“आणखी काही माहिती हवी आहे?” हुनने विचारलं.

मोईने नुसतीच नकारार्थी मान हलवली. ”आता काय नवीन अडचण सांगावी बरं?” ती विचार करत होती.

“मग एका आठवड्यानंतर तुझं उत्तर होकारार्थी असेल, अशी अपेक्षा करू?” हुनने तिच्याकडे पहात मिस्किल स्वरात विचारलं.

मोईने काहीही उत्तर न देता मान खाली घातली. हुन जाण्यासाठी वळला.

“.... आणि जर उत्तर नकारार्थी असेल तर....?” मोईने मुद्दामच विचारलं.

क्षणार्धात हुनच्या चेहे-यावरचं हास्य नाहीसं झालं, त्याच्या चेहेरा उदास झाला.

“....तर.... तर काय? माझं दुर्भाग्य! पण काळजी नको करूस. तू नकार दिलास तर तुला माझ्याकडून काहीच त्रास होणार नाही. तुझ्या इच्छेचा आदर करणं हे देखील प्रेमच आहे माझं.” इतकं बोलून झपाझप चालत वळणावरुन दिसेनासा झाला.

हुन गेला त्या दिशेने एकटक पहात मोई उभी होती. आपल्या मैत्रीणी आपल्या जवळ येऊन उभ्या राहिल्यात हेही तिला कळलं नाही.

*********

हुनच्या प्रेमाला होकार देण्याआधीच आपण हुनवर प्रेम करू लागलो आहोत, हे मोईला कळलंच नाही. तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडून हुन निघून गेला पण तिच्या मनात त्याच्या आठवणींनी घर केलं होतं. जेमतेम दोन क्षणांची भेट ती! पण त्या दोन क्षणांमधे काय घडलं, ते सारखं सारखं आठवण्यातच मोईचा पूर्ण दिवस पार पडला. घरी परतताना तिच्या मैत्रीणींनी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पण उत्तर देण्यासाठी मोईचं चित्त था-यावर होतंच कुठे? हुनचे शब्द तिच्या कानात साठवले गेले होते जणू. ’प्रेमाला दिलेला नकार स्विकारणं हे देखील प्रेमच असतं’, असं तिला आजपर्यंत कुणी बोललं नव्हतं.

तिच्या वस्तीतील श्रीमंत सावकार ताओचा एकुलता एक मुलगा फेई वारंवार तिची छेड काढायचा. एकदा तर मोईच्या वडीलांना पैशाचं आमिष दाखवून फेईने मोईचं सर्वस्व हिसकावण्याचीही भाषा केली होती. पण मोईच्या वडीलांनी तोडीस तोड उत्तर दिल्याने त्याला हात चोळत जावं लागलं होतं. त्यावर ताओने आपल्या मुलाचीच बाजू घेऊन, ’पैशाची बरोबरी कशाशीही करता येत नाही’, असं मोईच्या वडीलांना सुनावलं होतं. तेव्हापासून श्रीमंत व्यक्तींबद्दल मोईला चीडच निर्माण झाली होती.

वडीलांच्या कापड विणकामाच्या धंद्यात मदत करता करता, हौस म्हणून मोई नृत्यही शिकत गेली. विणकामाचा धंदा पुढे जोपासायचा आणि वडीलांना सांभाळायचं हेच मोईचं स्वप्न होतं. तिला मागणी घालणारा तरूण साधासुधा व आपल्या पत्नीच्या मताचा आदर करणारा असावा अशी तिची अपेक्षा होती. तिच्या नातेवाईकांना मोईची ही अपेक्षा म्हणजे जरा अतिच वाटायचं. पण मोईने ठरवलं होतं, ’लग्न करेन तर अशाच तरूणाशी, नाही तर आयुष्यभर अविवाहित राहीन.”ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

2 comments:

  1. मोई हुनला हो म्हणते कि नाही...? फ़ेइ मोइला आपल करण्यासाठी काय डावपेच आखतो..?मोइला हुनची खरी ओळ्ख पटते का..?
    हे जाणुन घेण्यासाठी वाचत रहा...’सदैव-एक प्रेमकथा’

    ReplyDelete
  2. देवेंद्र, तुमचा हा अभिप्राय वाचणं म्हणजे माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता.

    ReplyDelete