Tuesday, January 5, 2010

सदैव – पान ३

प्रतिक्रिया: 
मोईने एका हाताने त्याचं डोकं वर उचलून दुस-या हाताने थोडसं पाणी त्याच्या तोंडात घातलं. इतक्या जवळून मोईला पाहण्याची हुनची ही पहिलीच वेळ होती. त्यात मोईच्या नरम तळव्याचा स्पर्श त्याच्या ओठांना झाला. त्या स्पर्शाने अंगात जणू विज सळसळल्यासारखं वाटलं त्याला. त्या उत्तेजनेत त्याने पटकन पाणी गिळलं आणि त्याला जोराचा ठसका लागला.

“अरे, बापरे. हा प्रवासी तर खूपच आजारी दिसतो आहे.” मोईने घाबरलेल्या स्वरात आपल्या मैत्रीणींकडे पहात म्हटलं.

“गावातून याच्यासाठी मदत मागवायला हवी.” मोईची लिन नावाची मैत्रीण म्हणाली आणि ती गावाच्या दिशेने जायला वळली.

आता जर आपण बोललो नाही, तर आपलं भांडं फुटेल हे ओळखून हुन ताबडतोब उठून बसला व त्याने लिनला थांबवले.

“थांबा, थांबा! मी ठिक आहे.” हुन आपले कपडे झटकत उठला.

सगळ्याजणी आश्चर्याने त्याच्याकडे पाहून लागल्या. तसं हुनने मोईकडे पाहून म्हटलं, “मला माफ कर मोई. मला प्रवासी असल्याचं नाटक करावं लागलं. मी खरं तर इथे तुझ्यासाठी आलो होतो. गेल्या आठवड्यात झालेल्या समारंभात तुला नृत्य करताना मी पाहिलं आणि....”

हुन पुढे काही बोलला नाही. तो मोईच्या डोळ्यांत एकटक पहात होता. मोईचा चेहेरा गोरामोरा झाला होता. तीने आपल्या मैत्रीणींकडे पाहिलं. त्या नजरेने एकमेकींना खुणा करत गालातल्या गालात हसत होत्या. मिंग ही मोईची सर्वात समजूतदार मैत्रीण होती. तिने बाकीच्या मैत्रीणींना गप्प रहाण्यासाठी खुणावलं.

“अं....मला वाटतं, तुम्हाला मोईशी काहीतरी खाजगी बोलायचं आहे, हो ना? आम्ही थोडं लांब जाऊन उभं रहातो. तुम्ही तिच्याशी बोला. पण लक्षात ठेवा, जर मोईला काही दगा होतोय असं कळलं तर तुमची खैर नाही.”

“धन्यवाद. काळजी करू नका. तुमच्याइतकीच मलाही तुमच्या मैत्रीणीची काळजी आहे.” हुनने मिंगला आश्वासन देत म्हटलं.

हुन ने असं म्हटल्यावर मोईच्या विरोधाकडे, खाणाखुणांकडे न पहाता, मिंग बाकीच्या मैत्रीणींसोबत लांब जाऊन उभी राहिली. त्यांना लांब गेलेलं पाहून मोईने रागानेच हुनला विचारलं.

“कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला?”.

“मोई.... मी.... कसं सांगू तुला? माझं .... माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुला पहाताक्षणीच मी वेडा झालो. तुझ्याशिवाय काहीच सुचत नाही मला. सतत तूच माझ्या डोळ्यांपुढे असतेस. आज जर तुला पहाता आलं नसतं तर मी खरंच जीव दिला असता. माझ्या आयुष्याच्या प्रवासात तू माझी जीवनसाथी बनावंस अशी माझी इच्छा आहे.” हुनने व्याकूळ स्वरात म्हटलं.

“पण माझं तुमच्यावर प्रेम नाही. मी आज तुम्हाला प्रथमच पहाते आहे. तसंही, मला कुणा श्रीमंताचं प्रेम नको आहे. आपल्या पैशाचा तोरा दाखवून, प्रेम विकत मिळत नसतं म्हटलं.” मोईने फणका-याने म्हटलं.

हुनला हेराचे शब्द आठवले.

“मोईला श्रीमंत लोकांबद्दल किंचितसा आकसच आहे.”

आपलं खरं रूप उघड करण्यासाठी काहीकाळ थांबावं लागेल, हे हुनने ओळखलं.

“हा, हा, हा! कुणी सांगितलं मी श्रीमंत आहे म्हणून?”

“तर मग त्या समारंभात काय करत होतात तुम्ही?” मोई अजूनही रागातच होती.

“समारंभात तूही होतीस. तू श्रीमंत आहेस का?” हुनने तिच्याकडे रोखून पहात हसत विचारलं.

“म्हणजे...”

“म्हणजे, मी त्या समारंभाला उपस्थित होतो, पण मी अतिथी नव्हतो, तर काम करायलाच आलो होतो. सरदारपुत्र हुनचा मी खास सेवक आहे. म्हणून मी त्यांच्याचबरोबर तिथे आलो होतो.”

“असं आहे होय. मला वाटलं....” मोईच्या रागाचा पारा खाली आला.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment