Saturday, January 2, 2010

सदैव – पान २

प्रतिक्रिया: 
"एक करता येईल. मोईच्या मैत्रीणींकडून ही बातमी काढता येईल की तिचं कुणावर प्रेम आहे की नाही. पण आपल्या उद्देशाची खबरबात मोई किंवा तिच्या मैत्रीणींना लागायला नको." हुनने म्हटलं.

"एकदमच सोपं आहे हे. मी उद्याच सकाळी माझ्या खाजगी हेराला मोई आणि तिच्या मैत्रीणींची माहिती काढायला पाठवतो."

"धन्यवाद मित्रा! माझ्या कामासाठी तू तुझ्या खाजगी हेराला माझ्या कामासाठी कामाला पाठवणार? तू मला खूपच मदत करतो आहेस." हुनने आनंदून म्हटलं.

"अरे म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं." योह ने हसत हसत हुन च्या पाठीवर थाप मारली आणि दोघेही राजवाड्यात जाण्यासाठी निघाले.

*********

अखेर हुनच्या प्रेमाचा विजय झाला. मोईचं इतर कुणावरही प्रेम नाही अशी बातमी हेराने आणून दिल्यावर हुन खूप आनंदित झाला. मोईला भेटून आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने एक दिवस तिची भेट घेण्याचं ठरवलं. मोईची घरची परिस्थिती खूपच बिकट आहे व तिला श्रीमंत लोकांबद्दल किंचितसा आकसच आहे, असं हेराने सांगितल्यावर हुन शोचं मन थोडं विचलीत झालं होतं. पण आपल्या प्रेमाने मोईचं हृदय आपण जिंकून घेऊ, यावर हुनला विश्वास होता.

चिआंग नदीच्या काठी मोई रोज सकाळी आपल्या मैत्रीणींबरोबर पाणी भरण्यासाठी येते, ही बातमी हुनला हेराकरवी कळलीच होती. मोईसोबत बोलण्यासाठी तीच वेळ योग्य आहे, हे लक्षात घेऊन हुन अगदी भल्या सकाळी चिआंग नदीच्या दिशेने आपल्या घोड्यावरून दौडत निघाला. नदीपासून काही दूर त्याने आपला घोडा बांधून ठेवला आणि वेषांतर केलं. आता तो एक थकला भागला प्रवासी वाटत होता. वेषांतर करून हुन एका आडोशाला लपून बसला आणि मोई व तिच्या मैत्रीणींची वाट पाहू लागला. वाट पाहून तो पुरता कंटाळला होता पण त्याने मोईला नदीच्या दिशेने येताना पाहिलं आणि एका क्षणातच त्याचा कंटाळा उत्साहात बदलला.

हुनने मोईला सुरूवातीला पाहिलं होतं ते नर्तिकेच्या पेहेरावात. आज प्रथमच तो तिला साध्या पोशाखात पहात होता. साध्या कपड्यांतदेखील मोईचं सौंदर्य उठून दिसत होतं. इतकी सुंदर युवती अजून कुणाच्याही मनात कशी भरली नाही, याचंच त्याला नवल वाटत होतं. कदाचित परिस्थितीने ती गरिब असल्यामुळे तिच्या सौंदर्याकडे कुणाचंच लक्ष गेलं नसावं असं त्याला वाटलं.

पाणी भरत असताना मोईच्या हातांची होणारी लयबद्ध हालचाल, खाली वाकल्यामुळे गालावर आलेल्या बटा, हसताना विलग झालेल्या ओठांतून दिसणारी मोत्यांसारखी दंतपंक्ती, हे पाहून हुन अगदी वेडापिसा झाला. असंच धावत जावं आणि मोईला आपल्या बाहुपाशात घ्यावं असं त्याच्या मनात येऊन गेलं. पण तसं करणं त्याच्या सभ्यतेला शोभून दिसलं नसतं. शिवाय त्याचं मोईवर प्रेम होतं. अशी अतिरेकी कृती करून त्याला मोईचा अपमान नव्हता, तिच्या तिरस्कारला पात्र व्हायचं नव्हतं. पाणी भरून होताच मोई आणि तिच्या मैत्रीणी जाण्यासाठी वळल्या तसा हुन आडोशामागून बाहेर आला आणि आपण खूप थकलेले व तहानलेले प्रवासी आहोत असं भासवत मोईच्या जवळ गेला.

"प्.... पाऽणी.... पाणी...." हुन खाली कोसळला.

मोई आणि तिच्या मैत्रीणी धावतच हुन पाशी गेल्या. मोई ने झटकन आपल्या सॉन्गमधून थोडंसं पाणी हातावर घेऊन ते हुनच्या चेहे-यावर शिंपडलं. हुनने अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी ते पाहिलं. मोईच्या हातचा पाण्याचा शिडकावा त्याला अमृताच्या शिडकाव्यासारखाच वाटला. डोळे किलकिले करत शुद्धीवर आल्यासारखं भासवत हुनने इकडे तिकडे पाहिलं.10 comments:

 1. एखादा चायनिज़ (त्या चायनिज़ नावांमुळे)सिनेमा पाहत असल्यासारख वाटल वाचतांना...येउन दयात पुढचे भाग लवकर... तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

  ReplyDelete
 2. चला, म्हणजे माझ्या कथांमधील पात्रं डोळ्यासमोर साकार होतात तर! तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा, देवेंद्र.

  ReplyDelete
 3. मस्त वाटतेय चायनीज लव-स्टोरी :-) .. पुढचा भाग कधी?

  ReplyDelete
 4. धन्यवाद हेरंब. कामात थोडी व्यस्त आहे, त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला थोडा उशीर झाला.

  ReplyDelete
 5. very nice
  Chinese "forever - A love story"
  खूपच सुंदर
  चायनीज "सदैव - एक प्रेम कथा"
  :)

  ReplyDelete
 6. अरे वा! मंदार तू तर माझ्या कथेला एकदम ग्लॅमरस शिर्षक दिलंस.

  ReplyDelete
 7. खुपच छान क्था जमून आली आहे pravin

  ReplyDelete
 8. very nice all story's
  good.
  please relies next part of Hangama urgently.
  -Ajay

  ReplyDelete
 9. Thanks. Hungama's last part was posted yesterday.

  ReplyDelete