Tuesday, December 22, 2009

प्लॅन्चेट – पान २८

प्रतिक्रिया: 
समारंभाचे यजमान सर जेम्स टॉमस आणि त्यांची पत्नी व्हिक्टोरियाशी ओळख झाल्यावर तर हेलनला या समारंभाला आल्याचा खूप आनंद झाला. रॉबर्टचं नवीनच लग्न झालं आहे, हे ध्यानात घेऊन त्यांनी त्यांच्या मर्जीतील एका भारतीय जमिनदाराकडे त्याचं जुनं घर काही दिवसांकरिता मागून घेतलं. जमिनदार सर्जेराव पाटलांनी ते मोठ्या आनंदाने दिलं.

गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या कुशीत वसलेलं शे-दीडशे वस्तीचं एक छोटंसं गाव. इंग्रजांच्या राजवटीचा या गावाला ना कधी तोटा झाला, ना कधी फायदा. इथले लोक आपल्याच मस्तीत रहायचे. काबाडकष्ट करून जे काही थोडंफार पिकवायचे, त्यात ते समाधानी होते. म्हणूनच की काय, या गावाला आनंदगाव असं नाव पडलं होतं.

अशा ह्या सुंदर गावी रॉबर्ट आणि हेललने आपल्या मधुचंद्रासाठी जावं, असं सर जेम्स टॉमस यांनी सुचवलं. आपले वरिष्ठ स्वत:हून आपल्याला पंधरा दिवसांची सुटी देतायंत तर रॉबर्टही कशाला नाही म्हणेल. तो नोकरीतले सगळे मनस्ताप विसरला. आता त्याला फक्त एकच दिसत होतं. तो, हेलन आणि आनंदगावातील मधुचंद्र!

घोडागाडीतून उतरल्यावर झालेलं त्या घराचं पहिलं दर्शन हेलनला त्या घराच्या प्रेमात पाडायला पुरेसं होतं. तिने रॉबर्टचा हात अत्यानंदाने दाबला आणि रॉबर्टला तिच्या पसंतीची पावती मिळाली. तिने घरात प्रवेश केला, तेव्हा एक वीस-बावीस वर्षांचा तरूण घरातील सामानाची साफसूफ करताना दिसला. हेलनला पहाताच तो अदबीने मान खाली घालून, हात बांधून उभा राहिला.

हेलन त्याच्यासमोरून पुढे निघून गेली आणि मागे वळली. तिला त्याच्याशी बोलून काही विचारून घ्यायचं होतं पण भाषेची अडचण होती. ती नुसतेच ’काय काय’ असे हातवारे करत त्याच्याकडे पहात होती. त्यालाही तिला काय विचारायचंय हे कळेना. त्याने गोंधळून स्वत:चं नाव सांगितलं.

“जी, आबाजी म्हनत्यात मला. तिकडं खालच्या अंगाला –हातो.” तो बाहेरच्या दिशेने हात करत म्हणाला.

तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक टपली बसली. आबाजीच्याच वयाचा एक तरूण रॉबर्टच्या सोबत आत आला. त्यानेच आबाजीच्या डोक्यात टपली मारली होती.

“त्यांला तुजी भाषा कळणारे व्हय?”

हेलनला तो तरूण अजिबात आवडला नाही. तिने प्रश्नार्थक चेहेरा करून रॉबर्टकडे पाहिलं. रॉबर्टने तिची त्याच्याशी ओळख करून दिली.

“ते सर्जेराव पाटील…. ज्यांचं हे घर आहे, त्यांचा हा मुलगा…. सुभानराव.”

सुभानरावाची नजर हेलनच्या पायापासून डोक्यापर्यंत फिरत होती. रॉबर्टने ओळख करून देताच त्याने तोंडभर हसत हस्तांदोलनासाठी हेलनसमोर हात पुढे केला. हेलनने त्याला हात जोडून ’नमस्टे’ म्हटलं, तसा ओशाळं हसत तो रॉबर्टला म्हणाला, “दोन महिन्यात तुमच्या बाई चांगलं शिकल्या की! कायमच्या हितंच –हायल्या तर लई शिकतील.”

त्याचा लाळघोटेपणा रॉबर्टच्या लक्षात आला. तो सुभानरावाला कटवण्याच्या निमित्तानं बाहेर घेऊन गेला. इकडे आबाजीने खाणाखुणा करत हेलनला, “काही लागलं, तर मी आहे,” एवढं समजावून सांगितलं. सुभानरावाच्या लाळघोटेपणापुढे हेलनला आबाजीचा साधेपणा जास्त आवडला.

पहिले दोन दिवस रॉबर्ट आणि हेलनने सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत होती. पण येणारा प्रत्येक दिवस सारखा नसतो. क्रांतिकारकांच्या बंडाच्या बातम्या सर जेम्सच्या कानापर्यंत येऊन थडकल्या होत्या. वेळीच ह्यांना रोखलं नाही तर एक एक करत सगळीकडून आपली हुकुमत नाहिशी होईल. परिणामी पुन्हा इंग्लंडला प्रयाण, हे ब्रिटीश सरकारला ठाऊक होतं, त्यामुळे दयामाया न दाखवता ब्रिटीश पोलिस मिळेल त्या संशयिताला तुरूंगात डांबत होते.

रॉबर्ट आणि हेलनच्या मधुचंद्राचा तिसरा दिवस होता तो. रॉबर्टने हेलनला पुन्हा तोच पारंपारिक पोशाख घालण्याचा आग्रह केला. सर जेम्सच्या समारंभाला जाण्यापूर्वी, त्या पोशाखात झालेलं हेलनचं मोहक दर्शन तो विसरू शकत नव्हता. हेलन तो पोशाख घालून बाहेर आली. रॉबर्टने तिला आपल्या मिठीत घेतलं.

“आज तुला एक गंमत दाखवतो इथली.” रॉबर्टने तिच्या नाकावर आपलं बोट हलकेच आपटत म्हटलं. तिचा हात धरून त्याने तिला दिवाणखान्यात आणलं. दिवाणखान्याच्या एका कोप-यात एक जिना खालच्या बाजूने गेलेला दिसत होता. रॉबर्टने हेलनला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि तो एक एक करत जिन्याची पायरी उतरू लागला. हेलनला ही जागा नवीनच होती. गेल्या दोन दिवसात तिचं रॉबर्ट सोडून इतर कुठेच लक्ष गेलं नव्हतं, त्यामुळे आश्चर्ययचकित होत, ती ते तळघर पहात होती. जवळजवळ दिवाणखान्याच्याच लांबीरुंदीएवढं तळघर होतं ते.

तिला तसंच हातावर ठेवून रॉबर्टने तळघराला असलेला एकमेव दरवाजा आपल्या पायाने आत ढकलला. आत एक सुंदर पलंग होता. त्याच्या बाजूला एक भली मोठी पेटी आणि आरामखुर्ची. हेलनला ते सर्व फार फार आवडलं. त्याच्या गळ्यात घातलेले आपले हात सोडवून ती जमिनीवर उभी राहिली.

“ओह रॉबर्ट, इट्स ब्युटिफुल!” ती अत्यानंदाने उद्घारली.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

2 comments:

  1. khupacha chan...pudhe kay hotay yachi ustukata tikaun thevaliy..jamalay. pls climax lihun taka na..!!!

    Mahesh

    ReplyDelete
  2. महेश, ही कथा पूर्ण प्रकाशित आहे. अनावधानाने पुढच्या पानाचा दुवा दिला गेला नव्हता. आता सुधारणा केली आहे.

    ReplyDelete