Wednesday, December 23, 2009

प्लॅन्चेट – पान ३०

प्रतिक्रिया: 
जयरामकाकांनी संतापाने मान दुसरीकडे वळवली. हेलन खाली मान घालून रडत होती. राजेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. त्याने पुढची कथा जयरामकाकांना सांगायला सुरूवात केली.

“हेलनच्या विनवण्यांना, आरडाओरड्याला बळी न पडता सुभानरावाने आणि त्याच्या साथिदारांनी तिची विटंबना केली होती. तेवढंच करून ते थांबले नाहीत. हेलनला रॉबर्टसोबत तळघरात जिवंत जाळण्यात आलं.

गावात क्रांतिकारक शिरले आणि त्यांनी केलेल्या हल्ल्यातच रॉबर्ट व हेलनचा मृत्यू झाला अशी खोटी बातमी सुभानरावाने आपल्या वडीलांना दिली. सर्जेराव पाटलांना सर जेम्सकडून बरंच ऐकून घ्यावं लागलं पण क्रांतिकारकारकांचे हल्ले वारंवार होत असल्याने, ह्या बातमीत काही खोटं असेल, असं खुद्द सर जेम्सनाही वाटलं नाही.

रॉबर्ट आणि हेलनचे जळालेले मृतदेह तळघरातून उचलताना, “क्रांतिकारकांनीच यांची हत्या केली असावी,” असंच प्रत्येकाला वाटलं होतं. आबाजीसारख्या सामान्य तरूणाला कुटुंबाच्या हत्येची धमकी दिल्यावर तर ह्या प्रकरणावर संपूर्णपणे पडदाच पडला.

त्या प्रकरणानंतर कित्येक वर्ष सुभानराव गावच्या घराकडे फिरकलाच नाही. आबाजी आणि त्याचं कुटुंबच त्या घराची देखभाल करत असे. सुभानरावाने त्या घरात पुन्हा पाय ठेवला तो भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ जंगी मेजवानी दिली तेव्हा! खाऊनपिऊन तृप्त झालेले लोक एक एक करून सुभानरावाच्या घरातून बाहेर पडले. आबाजीला आवराआवर करायला सांगून सुभानराव झोपायला निघून गेला.

रात्री केव्हातरी त्याला स्त्रीच्या हुंदक्यांच्या आवाजाने जाग आली. आवाजाचा शोध घेत घेत सुभानराव तळघराच्या जिन्यापर्यंत पोहोचला. हुंदक्यांचा आवाज वाढतच होता. बेचैन झालेल्या सुभानरावाने शेवटी तळघरातील खोली गाठली.

करकरत दार उघडलं. त्याने आत पाहिलं. आवाज येत होता पण कुठून ते समजत नव्हतं. त्याला मागच्या प्रसंगाची आठवण झाली. तो सावधपणे त्या मोठ्या पेटीच्या दिशेने गेला. त्याने पेटीचं झाकण उघडताक्षणी त्याच्या गळ्यावर एका पंजाची घट्ट पकड बसली. कशीबशी आपली सुटका करून घेत, सुभानराव आरडाओरडा करतच तळघराच्या जिन्याच्या दिशेने धावला. त्याचा आरडाओरडा ऐकून आबाजी हातातलं काम टाकून दिवाणखान्याकडे धावला. सुभानराव विस्फारलेल्या डोळ्यांनी तळघराच्या दिशेन पहात होता.

“हेलन…. हेलन….” तो घोग-या स्वरात पुटपुटला.

आबाजीने मान वळवून तळघराच्या दिशेने पाहिलं. त्या प्रकरणानंतर गेली आठ वर्षे तो इथे रहात होता. त्याला एकदाही हा अनुभव आला नव्हता. तो सुभानरावाकडे पाहून फक्त हसला. त्या हास्यात सुभानरावाबद्दल कीव होती. ते हास्य पाहून सुभानराव चिडला. तो आबाजीच्या अंगावर धावून गेला पण त्याला आबाजीवर हात उचलता आला नाही. उचललेला हात स्वत:च्या छातीवर दाबत तो तिथेच कोसळला.

आबाजीने प्रसंगावधान राखून डॉकटरांना वर्दी दिली होती. सुभानराव वाचला पण त्या प्रसंगानंतर तो पुन्हा कधीच त्या घराकडे वळला नाही. त्याच्या मनात हेलनची भिती कायमची बसून राहिली. आपल्या मुलाबाळांना खरं सांगण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती, म्हणून जे वाटेल ते कारण सांगून त्याने आपल्या कुटुंबाला त्या घरापासून दूरच ठेवलं.”

हेलनने सुभानरावाला एकदा पाहिलं होतं. आपल्याला आयुष्यातून उठवणा-या सैतानाचा बळी घेण्याच्या इच्छेने तिचा आत्मा तिथेच घुटमळत राहिला. तिला काळाची शुद्ध नव्हती, वेळेची पर्वा नव्हती. सुभानराव आला की त्याला सोडायचं नाही या एका आशेवर ती रोज रात्री तेच तेच मरण जगत राहिली.”

हेलनने मान वर करून राजेशकडे पाहिलं. राजेशच्याही डोळ्यांतून अश्रू वहात होते.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

2 comments:

  1. कांचन अग तुला टॆगलयं गं..... :)

    ReplyDelete
  2. अय्या, खरंच?! थॅंकू!! आता ही कथा संपली की मी पण टॅगते.

    ReplyDelete