Thursday, December 24, 2009

प्लॅन्चेट – पान ३१

प्रतिक्रिया: 
इतक्या वेळात पहिल्यांदाच जयरामकाकांनी हेलनला प्रश्न विचारला.

“हेलन, जर तुला एकदा सुभानरावापर्यंत पोहोचता आलं होतं, तर दुस-या वेळेस तू रितूला माध्यम का बनवलंस?”

“कुणाला माध्यम बनवणार होते नाहीतर? गेली कित्येक वर्षं त्या घरात कुणी फिरकलेलंच नाहीये. आबाजीसारख्या साध्या माणसाला त्रास द्यायचा नव्हता मला. एके दिवशी तोही यायचा बंद झाला. मी वाट पहाण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हते. त्या खोलीच्या चौकटीतून बाहेर पडण्याचा मी खूप वेळा प्रयत्न केला पण मला ते शक्यच झालं नाही. कसलीतरी शक्ती मला रोखून ठेवतेय असं कायम वाटायचं.”

“मग रितूला कसं माध्यम बनवलंस तू?”

“एका मुलाने तिथे प्लॅन्चेट केलं होतं. त्याने अनाम आत्म्याला आव्हान केलं होतं. इतर कुणीही ते आवाहन स्विकारण्यापेक्षा मीच ते स्विकारणं जास्त चांगलं नव्हतं का? त्याला कुणीही हवं होतं आणि मलाही सुभानरावापर्यंत पोहोचण्यासाठी कुणाची तरी गरज होती. त्याच्या आवाहनाला मला सहज प्रतिसाद देता आला. त्यावेळेस मला कुणीही बांधून ठेवलंय असं वाटत नव्हतं. त्याने मला बोलवलं आणि तो निघून गेला. त्या दिवशी मला मुक्त असल्यासारखं वाटत होतं. त्याच रात्री मला रितूच्या शरीराचा ताबा घेता आला….”

“….म्हणजे साहिलने केलेल्या प्लॅन्चेटमुळे तुला मनुष्याला माध्यम बनवण्याचा रस्ता मिळाला….”

“हो.”

“पण मग रितूच का? साहिल किंवा त्याचा मित्र का नाही?”

“एका स्त्रीच्या शरीरात प्रवेश करून आपलं ईप्सित साध्य करून घेणं मला जास्त सोपं होतं.”

जयरामकाकांनी पटल्यासारखी मान डोलावली. ते हेलनला पुढे काहीतरी विचारणार होते, त्याचवेळी त्यांचा मोबाईल वाजला. अरविंदकाकांचं नाव स्क्रिनवर पाहून, बहुधा त्यांना बातमी मिळाली असावी असा अंदाज जयरामकाकांनी केला.

“हां, अरविंद…. गुड…. ती ठिक होईल, काळजी करू नकोस….. हं… हं…. अच्छा…. बरं…. पण तू काही सांगितलंस का…. बरं, बरं…. हो का…. अच्छा… हं…. ओ.के. ठिक आहे…. आम्ही वाट पहातोय….”

जयरामकाकांनी फोन ठेवला आणि ते पुन्हा हेलनकडे वळले. त्यांनी मोठ्या प्रेमाने हेलनला विचारलं.

“हे बघ, हेलन. तुझ्याबाबतीत जे झालं, ते खूप वाईट आहे. तुझा राग संपूर्णपणे समर्थनीय आहे पण तुला माहित आहे का? तुझ्या उद्देशपूर्तीसाठी तू ज्या स्त्रीला माध्यम बनवलंयस तिची काय अवस्था झाली आहे?”

“मला फक्त एकदा त्या नराधमापर्यंत पोहोचू दे. मी रितूला स्वत:हून सोडून देईन. तिच्याशी माझं काहीच शत्रुत्व नाही.”

जयरामकाकांना तिला कसं समजावून सांगावं, हे समजत नव्हतं.

“हेलन, ह्या सूडाच्या विचारापायी तू किती वर्षं वाट पाहिली आहेस, हे माहिती आहे का तुला?”

“मी कितीही वर्षं वाट पहायला तयार आहे.”

“पण तोपर्यंत ती व्यक्तीसुद्धा जिवंत असायला हवी ना?”

“म्हणजे….?”

“म्हणजे…. म्हणजे हेलन, तुला वाटतं तसा फक्त आठ-दहा वर्षांचा काळ उलटलेला नाहीये. त्या प्रसंगाला आता किमान साठ-पासष्ट वर्षं होऊन गेली आहेत..”

“काय?” हेलनच्या तोंडून अपेक्षाभंगाने उद्गार निघाला.

“हो हेलन. आबाजीच आता ब्याण्णव वर्षांचा आहे आणि सुभानराव….”

“सुभानराव….?” हेलनच्या डोळ्यात पुन्हा ठिणगी फुलताना दिसली.

“सुभानराव हे जग सोडून गेल्याला किमान तीस वर्ष झाली आहेत.” शेवटचं वाक्य उच्चारताना जयरामकाकांनाही तिच्याकडे पहाणं जड गेलं.

“नाहीऽऽ, नाहीऽऽ…. तो माझ्याच हातून मरायला हवा होता…. मला मारून टाकायचं होतं त्याला…. तिथेच… त्याच जागी….” हेलनचा चेहेरा पुन्हा विद्रुप झाला. ह्या बातमीने ती चवताळली होती.

हेलनची ही प्रतिक्रिया जयरामकाकांना अपेक्षित अशीच होती. ती रागाने मुठी वळवत होती. जयरामकाकांनी जाऊन तिचे दोन्ही हात धरले.

“हेलन…. हेलन…. इकडे बघ…. इकडे बघ, हेलन,” जयरामकाकांनी तिचा चेहेरा आपल्याकडे वळवला.

“तुला सूड घ्यायचा आहे ना?…. सूड घ्यायचा आहे ना?”

हेलनने मानेने ’हो’ म्हटलं.

“तर मग त्यासाठी मी प्रयत्न करतो. तू आधी शांत हो. शांत हो.”

आणि खरंच हेलन पहिल्यासारखी शांत झाली. राजेश आश्चर्य आणि भितीने जयरामकाकांकडे पहात होता. जयरामकाकांनी त्याला हसू उत्तर दिलं.

“तुझा अंदाज खरा आहे, राजेश. मी तोच प्रयत्न करून पहाणार आहे. मला फक्त कैलास पाटीलशी एकदा बोलायचंय. अरविंदकाका त्याच्याच घरी गेलेत. तुमच्या घराच्या करारपत्रावरील त्याचा पत्ता खरा होता.”

“काका, एकाच्या चुकीसाठी दुस-याला शिक्षा देणार तुम्ही?”

“अजिबात नाही. आणि शिक्षा करणारा मी कोण? सुभानराव पाटील माझा अपराधी नाही, तो हेलनचा अपराधी आहे.”

“पण काका….”

“राजेश, काही गोष्टी आपल्या त्रिमितीपलिकडच्या असतात. मी हे मान्य करतो कारण मी स्वत: तशा प्रसंगातून गेलोय. त्या प्रसंगानेच मला पॅरानॉर्मल केसेसचा अभ्यास करायला प्रवृत्त केलं. हेलनच्या केसमधे मला फक्त एक गोष्ट खात्रिलायकरीत्या माहित करून घ्यायचीय, म्हणून मी अरविंदची वाट बघतोय.”ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment