Thursday, December 24, 2009

प्लॅन्चेट – पान ३३

प्रतिक्रिया: 
जयरामकाका, अरविंदकाका आणि राजेश तिघांनी आपली बोटं इंडिकेटरवर टेकवली.

“आता डोळे बंद करा आणि चित्त एकाग्र करा. तुमचं लक्ष केवळ इंडिकेटरवर असलेल्या बोटांकडे असलं पाहिजे.” जयरामकाकांनी सूचना केली.

दोघांनीह डोळे बंद केले. जयरामकाकांनी हलक्या हाताने तो इंडिकेटर बोर्डवरच तिनदा वर्तुळाकार फिरवला आणि त्यांनी डोळे बंद केले. ते काहीतरी पुटपुटत होते. हळूहळू त्यांचा आवाज वाढला. जणू काही ते कुणाला तरी आज्ञा करत आहेत अशा प्रकारचा आवाज होता तो. अचानक ते थांबले आणि त्यांनी गंभीर स्वरात प्रशन केला.

“सुभानराव, तू आला आहेस?”

राजेश आणि अरविंदकाकांना बोर्डवरचा इंडिकेटर हळूहळू सरकल्याची जाणीव झाली. जयरामकाकांनी राजेश आणि अरविंदकाकांना डोळे उघडायला सांगितलं. त्यांनी पाहिलं, इंडिकेटर YES वर जाऊन थांबला होता. जयरामकाकांच्या ओठांवर एक अस्पष्टसं स्मित आलं. ते पुन्हा गंभीर स्वरात फर्मावलं.

“तू सुभानराव आहेस, याचा पुरावा दे.”

इंडीकेटर हलला. एकेका अक्षरावरून फिरत एक वाक्य तयार झालं – “काय पुरावा हवा आहे?”

“तुझं पुर्ण नाव सांग.”

इंडिकेटर पुन्हा हलला – सुभानराव सर्जेराव पाटील

जयरामकाकांनी एक नि:श्वास सोडला. अरविंदकाका आणि राजेश जयरामकाकांकडे पहात होते.

आता जयरामकाकांनी आपल्या ख-या प्रश्नांना सुरुवात केली.

“तू हेलनचा अपराधी आहेस. तू तिचा खून केलास?”

-हो

“ती तुला शोधते आहे. तुझ्या पापाची शिक्षा तुला भोगलीच पाहिजे.”

-नाही

“ती इथेच आहे. मी तुला इथे बोलवलं आहे, ते त्याच्याचसाठी. मी माझी सगळी ताकद पणाला लावली आहे, ते तुला इथे थांबवण्यासाठी. मी जोपर्यंत मी ’जा’ म्हणत नाही तोपर्यंत तुला इथून हलता येणार नाही.

-मला जाऊ दे

“तू हेलनच्या जागी असतास, तर तू काय केलं असतंस?”

-माहित नाही

“मी तुला या बोर्डवरून मुक्त करतोय. पण तू ह्या खोलीच्या बाहेर जाऊ शकणार नाहीस. मी आता हेलनला बोलावतोय. ती तुला जी शिक्षा देईल, ती तू भोगलीच पाहिजे. कारण जोपर्यंत तुला शिक्षा होत नाही तोपर्यंत दोघांच्याही आत्म्याला गति मिळणार नाही.”

इंडिकेटर हलण्याआधीच काकांनी, अरविंदकाका आणि राजेशल हात काढायला सांगितले. आता ते एकटेच डोळे मिटून काहीतरी म्हणत होते. अरविंदकाका आणि राजेशला अचानक खूप थंडी जाणवायला लागली. ते दोघेही हातपाय जवळ घेऊन कुडकुडत होते. जयरामकाका मात्र डोळे मिटून शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहे-यावर कोणतेही भाव नव्हते मात्र तोंडाने त्यांच बडबडणं चालूच होतं.

जयरामकाकांनी मधेच ’हेलन ये’ असं म्हटलं त्यासरशी समोर बसलेली रितू धाडकन जमिनीवर पडली आणि त्या खोलीत अचानक खूप हवा वाहू लागली. आजूबाजूला असलेल्या जड वस्तू देखील हलू लागल्या. कोप-यात ठेवलेल्या जुन्या कंदिलाची काच खळ्कन फुटली. हवेचा जोर आणखीनच वाढला. जागा चारही बाजूंनी बंद असल्याने हवेचा घों घों असा आवाज आणखीनच भिती वाढवत होता. भिंतीवर काहीतरी दणादण आपटलं जातंय असे आवाज येऊ लागले. त्यापाठोपाठ किंकाळ्या ऐकू आल्या. काही वेळाने सर्व शांत झालं. जयरामकाकांनी हळूहळू डोळे उघडले. त्यांनी अरविंदकाका आणि राजेशकडे पाहिलं. ते दोघेही डोळे मिटून हातपाय जवळ घेऊन बसले होते.

जयरामकाकांनी दोघांनाही हाक मारली आणि पुन्हा इंडिकेटरवर बोटं टेकवण्यास सांगितलं. यावेळेस त्यांनी हेलनला बोलावलं.

“हेलन आलीस?”

-हो

“तुझं काम झालं?”

-हो

“तुला इथून जावं लागेल आता.”

-मी तयार आहे

“तुला आता मुक्ती मिळेल.”

-मला माहित आहे

“हेलन, सुभानरावाचा सूड घेतल्याक्षणी तू सर्व बंधनांतून मुक्त झाली होतीस. मग थांबलीस का?

-आभार मानायला

“आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मीही तुझे आभार मानतो. आता तू जाऊ शकतेस हेलन.”ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment