Wednesday, December 23, 2009

प्लॅन्चेट – पान २९

प्रतिक्रिया: 
रॉबर्टने तिला कवेत घेतलं. तिच्या ओठांना स्पर्श करण्यासाठी तो पुढे झाला, तेवढ्यात वरच्या बाजूने आबाजीने मोठ्याने मारलेली हाक त्याने ऐकली.

“स्सायेऽऽब, लवकर या हिकडंऽऽ….“

रॉबर्ट धावतच वर गेला. आबाजी काय म्हणतोय, हे त्याला कळलं नाही, तरी त्याच्या हावभावांवरून बाहेर काहीतरी विचित्र घडलंय, याची त्याला कल्पना आली. आबाजीला तसाच सोडून तो दरवाजापाशी गेला. दरवाजा उघडल्या उघडल्या त्याने पाहिलं की पंधरा वीस तरूणांचा घोळका हातात पेटत्या मशाली घेऊन, मोठमोठ्याने कसल्यातरी घोषणा देत, त्यांच्या घराच्याच दिशेने येत होता. क्रांतिकारक शोधून शोधून इंग्रज अधिका-यांना मारून टाकतात, ही बातमी रॉबर्टला नवीन नव्हती.

ते दृश्य पाहून रॉबर्ट मनातून चरकला. पण एकटा असला, तरी तो पोलिस अधिकारी होता. तो मागे फिरला आणि आपल्या खोलीतून बंदूक घेऊन बाहेर आला. त्याने हवेत बंदूक झाडून त्या घोळक्याला पांगवण्याचा प्रयत्न केला.

रॉबर्टने गोळी हवेत झाडली होती पण त्या घोळक्यातील कुणीतरी त्याचा कांगावा करून ’गोळीबार, गोळीबार’ अशी बोंब उठवली. रॉबर्टला विनाकारण कुणाला जखमी करायचं नव्हतं, त्यामुळे त्याने ओरडून, हाताने इशारा करून ’थांबा, थांबा’ असं सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्या तरूणांनी त्याचं न ऐकता, घराच्या दिशेने आपली पावलं उचलली.

घोळक्याच्या म्होरक्याला पाहताच रॉबर्टच्या लक्षात आलं की त्याला वाटतंय, तसा हा क्रांतिकारकांचा घोळका नाही. सुभानराव होता तो! छद्मी हसत आपल्या बरोबरच्या तरूणांना पुढे जाण्याचा आदेश देत होता. रॉबर्टला संकटाची कल्पना आली. तो हेलनला सावध करण्यासाठी मागे वळला. हेलन तर केव्हाचीच त्याच्या मागे येऊन उभी होती. रॉबर्ट काय सांगणार आहे, हे तिला समजलं होतं. पण थोडा उशीर झाला होता.

हेलनने सुरक्षित ठिकाणी लपून बसावं, याआधीच सुभानराव आपल्या साथिदारांच्या सोबत घराच्या दारापर्यंत पोहोचला होता. रॉबर्टने आपल्या हातातील बंदूक त्याच्यावर रोखून धरली.

“अवो, हे काय करताय साहेब? तुमच्या वाटंला त्यांनी जाऊ नये म्हणून मी लई झटलो बगा पन माजं कुनी ऐकतंच न्हाई.” सुभानराव मानभावीपणे म्हणाला.

“काय हवंय तुला?” रॉबर्टने बंदूक तशीच रोखलेली ठेवून विचारलं.

“माज्याच घरात मला काय हवं म्हून इचारताय?” सुभानराव पुन्हा छद्मी हसला, “इथलं सर्व माजंच हाय की!”

रॉबर्टला परिस्थितीची कल्पना आली होती. तो नरमाईने घेत म्हणाला, “हे बघ सुभानराव, तू उद्या सकाळी ये. आपण बोलू.”

“…. आनि यांला काय सांगू, सायेब. त्यांला तर तुमीच हवे आहात.” एवढं बोलून सुभानरावाने रॉबर्टच्या हातावर फटका मारला. त्यासरशी रॉबर्टच्या हातातील बंदूक खाली पडली. सुभानरावाच्या सोबत असलेल्या तरूणांनी रॉबर्टला गराडा घातला. कुणीतरी खाली पडलेली बंदूक उचलली आणि रॉबर्टच्या छातीचा वेध घेतला.

“नाहीऽऽ!“

बंदूकीच्या आवाजापाठोपाठ हेलनची किंकाळी घुमली. एकट्या सुभानरावाचं लक्ष गेलं तिच्याकडे. तरूणांच्या गराड्यातून वाट काढत सुभानराव हेलनच्या दिशेने धावला. हेलन पुन्हा तळघराच्या दिशेने पळाली. सुभानरावाला वाटलं होतं, तसं हेलनला मिळवणं इतकं सोपं नव्हतं. इतका वेळ ह्या तमाशाने गोंधळून गेलेल्या आबाजीने सुभानरावाच्या अंगावर झेप घेतली.

“न्हाई मालक. आपल्या अब्रूत आन् परक्याच्या अब्रूत फरक करू नका.” त्याने सुभानरावाला विनवलं.

“अरे हट! ह्ये जाऊन त्या विलायती सायबाला सांग,” असं म्हणून सुभानरावाने आबाजीच्या छातीत लाथ मारली. आबाजी तिथेच खाली पडला. सुभानरावाने तळघर गाठलं. हेलनने चपळाईने तळघरतील दार आतून बंद करून घेतलं होतं. सुभानराव दारावर थडाथड लाथा मारत होता.

आबाजी पुन्हा जोर करून उठला. धडपडत तळघरात गेला. रॉबर्टला गोळी घालून झाल्यावर त्याच्या मृतदेहाला लाथाबुक्क्यांनी तुडवून त्या तरूणांचा घोळकाही तळघराच्या दिशेने धावला. सुभानरावाचं दारावर लाथा मारणं सुरूच होतं. आपले साथिदार आलेले पाहून सुभानरावाने त्यांनाही दारावर लाथा मारायला लावल्या.

“मालक, असं नगा करू. परक्याच्या आयाभनीबी आपल्या आयभनीवानी असत्यात.” आबाजीने सुभानरावाचे पाय धरले.

“लई वटवट करतोय हा. ए, ह्याचं हात पाय बांधा रं आन् तोंडबी बंद करा.”

दोन तरूणांनी मिळून आबाजीचे हात पाय बांधले आणि त्याच्या तोंडात बोळा कोंबला. आबाजी विस्फारलेल्या डोळ्यांनी पहात होता. लाथांच्या आघातांनी तळघराचं दार उघडलं होतं.

सुभानरावाने त्या खोलीत सगळीकडे नजर फिरवली. हेलन कुठेच दिसत नव्हती. ह्या खोलीला दुसरं दार, खिडकी, झरोका काही नसताना हेलन गेली कुठे हे त्याला समजत नव्हतं. अचानक त्याची नजर पलंगाजवळच्या मोठ्या पेटीवर गेली. तो स्वत:शीच हसला.

सुभानराव शांतपणे एक एक पाऊल टाकत, त्या पेटीच्या जवळ गेला. त्याने हळूच पेटीचं झाकण वर उचललं आणि आत लपलेल्या हेलनच्या केसांना धरून तिला बाहेर काढलं. हेलन त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी झटापट करत होती. आबाजीची हातपाय सोडवण्याची धडपड निष्फळ ठरत होती पण त्याही अवस्थेत तो तोंडातल्या तोंडात आवाज काढून सुभानरावाला विरोध दर्शवत होता….ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment