Tuesday, December 22, 2009

प्लॅन्चेट – पान २७

प्रतिक्रिया: 
ती राजेशच्या चेहे-यावर ओळखीच्या खुणा शोधत होती. मधेच तिची मान नकारार्थी हलली आणि तिने राजेशला विचारलं, “यू आर नॉट वन ऑफ देम. आर यू?” तिने विचारलं.

तिच्या प्रश्नाचा रोख राजेशला माहित होता. त्याने उत्तर दिलं.

“नाही, हेलन. मी त्यांच्यापैकी नाही. इथे कुणीच त्यांच्यापैकी नाही. तू सुरक्षित आहेस.”

तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

“मग मला प्लीज माझ्या घरी जाऊ दे. तू मला माझ्या घरी नेशील का?”

राजेशन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाला, “तुझं घर इथून खूप दूर आहे हेलन. आपल्याला खूप वेळ लागेल तिकडे जायला. तिथे कसं जायचं हेही मला माहित नाही. तू इथे कशी आलीस? ते कोण होते? मला सांगशील?”

ती मानेने ’नाही नाही’ म्हणत हमसाहमशी रडू लागली. राजेशने जयरामकाकांकडे पाहिलं. त्यांनी त्याला डोळ्यांनी खूण केली. राजेशने पुन्हा तिला समजावलं.

“बघ हेलन. तुझ्या बाबतीत काय घडलं, हे जर मला सांगितलंस, तर मला तुझी मदत करता येईल. हे बघ, मी तुझे हात सोडतोय. मला नीट सांग, काय झालं ते.” बोलता बोलता राजेशने खरंच तिचे दोन्ही हात सोडले.

तिचे हात सोडल्याक्षणी तिने दोन्ही हातांमधे आपला चेहेरा लपवला आणि हुंदके देऊ लागली. तिने चेहेरा वर केला तेव्हा तिचा संपूर्ण चेहेरा अश्रूंनी भिजलेला होता. राजेशने आपल्या रुमालाने तिचा चेहेरा पुसला. केस नीट केले आणि तिचा हात पुन्हा आपल्या हातात घेतला. त्याच्याकडे पहात तिने बोलायला सुरूवात केली….

….इंग्रज पोलिस अधिकारी रॉबर्ट स्मिथची पत्नी म्हणून हेलनने त्याच्यासोबत भारतात रहाण्याचा आग्रह धरला. रॉबर्टचा याला विरोध होता. त्याचं म्हणणं होतं की हेलन इंग्लंडमधे जितकी सुखरूप आहे, तितकी ती भारतात नाही. अर्थात यात काही खोटं नव्हतं. तो काळच असा होता की इंग्रजांची भारतावरची हुकुमशाहीची पकड सैल झालेली असली, तरी अजून पुरती सुटली नव्हती. क्रांतिकारकांच्या वरचेवर होणा-या हल्ल्यांना तोंड देणं इंग्रज अधिका-यांना जड जात होतं. एकटा इंग्रज अधिकारी रस्त्यात दिसला की त्याचा मुडदा पडलाच म्हणून समजा.
नोकरीमुळे हेलनला इंग्लंडमधे ठेवून स्वत: भारतात येणं, हे रॉबर्टलाही आवडलेलं नव्हतं. पण भारतातील परिस्थिती पाहता, आपण योग्य निर्णय घेतला आहे हे त्याला पटलं. पण बहुधा नियतिला हे पटलं नसावं. रॉबर्टला येऊन पुरते दोन महिने झाले नसतील तोच त्याला आश्चर्याचा धक्का बसला. हेलन त्याला कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्या काही नातेवाईकांसोबत भारतात दाखल झाली होती.

तिच्या आगमनाने रॉबर्टला जेवढा आनंद झाला, त्याहीपेक्षा जास्त त्याला दु:ख झालं. “आपली नोकरी ही अशी. दिवस, रात्र कशाची शुद्ध नाही. कुठून हिला वेळ देणार? खरं तर नवीन लग्न झालेलं आपलं. हिची स्वप्न पूर्ण करण्याचं सोडून आपण तिच्या डोळ्यातील झोपच हिरावून घेतो आहोत. पण परिस्थितीच अशी आहे की इथे अधिका-यांची नितांत आवश्यकता आहे.”

हेलनची मात्र रॉबर्टबद्दल काहीच तक्रार नव्हती. त्याच्यासोबत रहायला मिळतंय, हाच तिच्या दृष्टीने सर्वोच्च आनंद होता. त्यातच तिच्या आनंदात भर घालणारी एक घटना घडली. वरिष्ठ अधिकारी जेम्स टॉमस यांनी सर्व पोलिस अधिका-यांच्या पत्नींच्या सन्मानार्थ एक मेजवानी आयोजित केली होती. रॉबर्ट आणि हेलनलाही या समारंभाचं निमंत्रण होतं. ती या समारंभाला जाण्यास खूप उस्तुक होती. कदाचित तिला काही अधिका-यांच्या पत्नींशी ओळख करून घेता आली असती. या देशात तिला त्याची नितांत आवश्यकता होती.

समारंभाला जाण्यासाठी हेलनने पारंपारिक पोशाखाची निवड केली. पायघोळ झगा, फुगीर बाह्यांना सॅटीनची झालर, गळ्याजवळही सुंदर नक्षी असलेली फीत, गळ्यातील मोत्यांची माळ सारं कसं हेलनच्या गौरकांतीला शोभून दिसत होतं. ती तयार होऊन बाहेर आली आणि रॉबर्ट तिच्याकडे पहातच राहिला.

“आज कितीजण तुझ्या रूपावर फिदा होणार आहेत कुणास ठाऊक? समारंभातील एकही लेडी तुझ्याशी मैत्री करणार नाही.” रॉबर्ट चेष्टेने म्हणाला.

“डोन्ट वरी. माझ्यावर कितीही फिदा झाले, तरी मी मात्र फक्त तुझ्यावरच फिदा आहेस, हे विसरू नकोस.” हेलन त्याच्याजवळ जात म्हणाली.

रॉबर्टने प्रेमाने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ते दोघे समारंभाला जाण्यासाठी बाहेर पडले.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment