Monday, December 21, 2009

प्लॅन्चेट – पान २६

प्रतिक्रिया: 
जयरामकाकांनी संपूर्ण तळघरावरून नजर फिरवत होते. अचानक एका ठिकाणी ते थांबले. त्यांनी साहिलला विचारलं, “साहिल, प्लॅन्चेट करायला इथेच बसला होतात ना?”

साहिल डोळे विस्फारून जयरामकाकांकडे पहात होता. काकांबद्दल त्याने बरंच ऐकलं होतं पण आज त्याला प्रत्यक्ष अनुभवच आला.

“हो काका, इथेच बसलो होतो आणि....”

त्याला हाताने अडवत जयरामकाका खाली उकीडवे बसले आणि त्यांनी जमिनीला स्पर्श केला. अरविंदकाका आणि राजेश तर काही न बोलता, जयरामकाका काय करतायंत, ते पहात होते. चार माणसं त्या तळघरात असूनही तिथे टाचणी पडली तर आवाज येईल इतकी शांतता होती. अचानक जयरामका उठले आणि त्यांनी सर्वांना सांगितलं, “चला, माझं इथलं काम आत्तापुरतं संपलंय. आता थेट मुंबई.”

सुदैवाने जयरामकाकांना वाटलं होतं, तसा कोणताही अडथळा त्यांना मुंबईला जाताना आला नाही. त्यांनी आधीच ठरवून दिल्याप्रमाणे अरविंदकाका आणि साहिल आपल्या मुंबईच्या राहत्या घरी गेले. राजेश आणि जयरामकाकांनी हॉस्पिटलची वाट धरली. जाण्यापूर्वी जयरामकाकांनी राजेशला रितूसोबत कसं वागायचं, काय बोलायचं हे आधीच सांगून ठेवलं होतं.

ते दोघे हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा बरीच रात्र झाली होती. पण प्रसंगाचं गांभिर्य ओळखून डॉ. चांदोरकरांनी राजेशला रितूची भेट घेण्याची परवानगी देऊन ठेवली होती. त्यामुळे त्यांना कुणी अडवलं नाही. रितूच्या स्पेशल वॉर्डबाहेर एका वॉर्डबॉयला बसवूनच ठेवलं होतं. दाराला असलेल्या काचेतून त्याला रितूची प्रत्येक हालचाल कळू शकेल अशी व्यवस्था होती. पण हालचाल करण्यासाठी रितू मोकळी होतीच कुठे? राजेशने वॉर्डबॉयला बाहेरच थांबण्याची खूण केली आणि त्याने दरवाजा आत ढकलला.

रितूने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या खुनशी चेहे-यावर त्याला एका क्षणासाठी ओळखीचं चिन्ह दिसलं. हातपाय घट्ट बांधलेले, विस्कटलेले केस, डोळे खोल गेलेले, सुकलेले ओठ, त्यात हॉस्पिटलच्या गाऊनमुळे ती आणखीनच विचित्र दिसत होती. तिची अवस्था पाहून राजेशच्या पोटात तुटलं. त्याच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. न रहावून तो रितूच्या दिशेने धावत गेला.

“रितू.... रितू....” त्याला पुढे बोलवलंच नाही. तो नुसताच मूकपणे रडत तिच्या डोक्यावरून, चेहे-यावरून हात फिरवत राहिला. एका दिवसात झालेली तिची ही अवस्था त्याला पहावत नव्हती.

“राजेश, प्लीज मला घेऊन चल.... मला नाही रहायचं इथे.... प्लीज....” रितूसुद्धा हमसाहमशी रडत होती.

राजेशने मनाशी निर्णय झाल्यासारखे आपले अश्रू पुसले आणि तो रितूच्या हातांना लावलेला बेल्ट काढू लागला. इतका वेळ लांब गप्प उभे असलेले जयरामकाका आता वेगाने पुढे झाले आणि त्यांनी राजेशचा हात धरला.
राजेश आणि रितूने एकाच वेळी जयरामकाकांकडे पाहिलं. फरक इतकाच होता. राजेशच्या नजरेत आश्चर्य होतं. रितूच्या नजरेतून अंगार बरसत होता. तिच्या तोंडून गुरगुरत्या स्वरात शिव्या बाहेर पडल्या. जयरामकाका तिच्याकडे रोखून पहात होते. त्या नजरेला प्रत्युत्तर म्हणून ती जयरामकाकांच्या तोंडावर पचकन थुंकली.

रितूचा बदललेला अवतार पाहून राजेश ताडकन उभा राहिला आणि दोन पावलं मागे सरकला. जयरामकाकांनी शांतपणे खिशातून रुमाल काढून आपला चेहेरा पुसला. ती त्या दोघांकडे पहात नुसतीच गुरगुरत होती. मधेच तिने गदागदा मान हलवून दात विचकले आणि ती पुन्हा शिव्या देऊ लागली.

जयरामकाकांनी अतिशय हळू आवाजात राजेशला सांगितलं, “तू तिच्या बाजूने आहेस, हे विसरू नकोस.”

राजेशने पटकन जयरामकाकांकडे पाहिलं. त्यांनी राजेशला डोळ्यांनीच ’तिच्याजवळ जा’ अशी खूण केली. जयरामकाकांनी अशा वेळी काय करायचं हे सांगून ठेवलेलं असलं, तरी ते प्रत्यक्षात आणताना राजेशच्याही उरात धडकी भरली होती. तो घाबरत घाबरतच तिच्या जवळ जाऊन बसला. यावेळेस तिच्या हातांना बांधलेला बेल्ट सोडवण्याचा वेडेपणा न करता, त्याने नुसतात तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याने तिला हाक मारली.

“हेलन....”

जादू झाल्यासारखी तिच्या तोंडून पाहेर पडणारी शिवीगाळ खाडकन थांबली. तिच्या नजरेतील धग हळूहळू कमी झाली. राजेशने तिला पुन्हा हाक मारली.

“हेलन, इकडे.... माझ्याकडे बघ.”

तिने हळूहळू मान वळवून राजेशकडे पाहिलं. राजेश तिच्या चेहे-याकडे पहात होता. तिच्या चेहे-यावरचे क्षणापूर्वीचे रानटी भाव जाऊन, त्याजागी एक निरागस चेहेरा दिसत होता. हा चेहेरा रितूचा असूनही रितूचा नाही, हे कळण्याइतपत वेगळेपण त्या चेहे-यामधे होतं. तिच्या सुकलेल्या ओठांवर एक हलकसं स्मित उमटलं.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

2 comments:

 1. Hi,
  gelya kahi divasanpurvi mi sahaj aaplya blogla bhet dili hoti khupach utkrushta aahe aapla blog, rahasya katha tar agdi aprateem aahet, Planchet hi katha tar rahasya kathechi aavad asalelyana khilavun thevate....
  Itar kathahi chhan aahet.

  WISH U ALL THE BEST

  PRASHANT

  ReplyDelete
 2. धन्यवाद प्रशांत. या ब्लॉगवर उत्तम कथा देण्याचा नेहमीच प्रयत्न करेन. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी क्रमश: प्रेमकथेला प्रारंभ करत आहे, ती देखील अवश्य वाचा.

  ReplyDelete