Saturday, December 19, 2009

प्लॅन्चेट – पान २५

प्रतिक्रिया: 
“कुणाला बोलवायचं असं काही आमचं ठरलं नव्हतं. अमितला त्याच्या एका मित्राकडे पडून असलेला प्लॅन्चेट बोर्ड मिळाला. त्या मित्राने आत्म्याला कसं बोलवायचं त्याची प्रोजीसर सांगितली आणि म्हणाला, “कुणालाही बोलवा”, म्हणून आम्ही जस्ट....” अरविंदकाकांच्या चेहे-यावरचे भाव पाहून साहिलने वाक्य अर्धवट सोडून दिलं.

“म्हणजे.... तू मला अर्धवट खरं सांगितलंस साहिल, हो ना?” अरविंदकाका डोळे वटारत म्हणाले.

“एक मिनिट, एक मिनिट.” जयरामकाका अरविंदकाकांना अडवत म्हणाले. “हे बघ, तू ह्याला ओरडल्याने प्राप्त परिस्थितीत काहीही फरक पडणार नाहीये. त्यापेक्षा आपण उपाय शोधू या.

अरविंदकाकांनी साहिलवरुन नजर वळवून घेतली आणि जयरामकाकांना म्हणाले, “जया, तुझ्याकडून काही होऊ शकतं का रे?”

“मी आत्ताच कुणालाही वचन देत नाही.” जयरामकाकांनी अरविंदकाका आणि राजेशकडे पहात म्हटलं, “पण मी या प्रकरणात लक्ष जरूर घालणार आणि माझी संपूर्ण ताकद पणाला लावणार, या प्रकरणाची पाळं मुळं खणण्यासाठी....”

त्यांच्या तेवढ्या बोलांनीही राजेशला खूप धीर आला. त्याने पुढे होऊन जयरामकाकांचे पाय धरले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

“उठ, राजेश, असं काय करतोस? अरे, आता तुझ्याच मदतीची मला सर्वात जास्त गरज आहे....”

राजेश उठून बसला आणि त्याने महादूच्या आज्याकडून कळलेली सर्व हकीकत जयरामकाकांना सांगायला सुरूवात केली. प्रसंगाचं गांभिर्य ओळखून अरविंदकाकांनी साहिलला जेवायला पिटाळलं. राजेशचं बोलणं संपलं, त्याच वेळेला त्याचा मोबाईल वाजला. यावेळी संपर्क तुटू नये म्हणून राजेश धावत मोबाईल घेऊन घराबाहेर पडला. फोनवर राहूलने मनू आणि पल्लवी त्याच्या घरी सुखरूप असल्याचं सांगितलं.

“राहूल.... रितू कशी आहे रे?”

“रितूवहिनी अजून तशीच आहे. काल रात्री पल्लवी फॉर्मवर सही करू शकत नव्हती, म्हणून तिला शॉक ट्रिटमेंट दिली नाही, पण चांदोरकर म्हणतायंत....”

“त्याची काही गरज नाही,” राजेश चटकन म्हणाला, “चांदोरकरांना म्हणावं, कोणत्याही परिस्थितीत रितूला शॉक ट्रिटमेंट द्यायची नाही. ती वेडी नाही की तिच्या डोक्यावर कसलाही परिणाम झालेला नाही. ही केस वेगळी आहे. मी उद्या सकाळपर्यंत मुंबईत पोहोचतोय, तोपर्यंत राहूल, तू सांभाळून घे, प्लीज.”

“शेवटी तुला पटलं तर, राजेश.”

राजेशने एक दीर्घ उसासा सोडला, “हो. पटलंय मला. शंभर टक्के ही केस वेगळी आहे.”

“ठीक आहे. ये तू. आम्ही सगळे तुझीच वाट पहातोय.”

राजेश फोन बंद करून आत गेला तेव्हा जयरामकाका डोळ्यातील पाणी पुसत होते. ते उपहासाने हसले आणि म्हणाले, “ह्‍! आपण कसं मनाशी ठरवलेलं असतं नाही? भूत हे वाईटच असतं. खरं तर त्यांची दया यावी अशी परिस्थिती असते त्यांची. स्वत:च्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जिवंत माणसाच्या शरिरात शिरायचं, त्याच्या मानसिक आंदोलनांना बळी न पडता आपल्या इच्छा त्याच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या.... सोपं नसतं हे....”

अरविंदकाका आणि राजेश आ वासून त्यांचं बोलणं ऐकत होते. जयरामकाकांच्या ते लक्षात आलं तसं ते मनापासून हसले.

“तुम्हाला वाटत असेल, काय बडबड करतोय हा. चला, ही बडबड इथेच संपवतो. आता आपण पुढे काय करायचं, ते ठरवूया. राजेश, आता सर्वात आधी तू रितूला भेटायचंस. ती खूप आक्रमक झालेली असेल, गोंधळलेली असेल पण कुठल्याही परिस्थितीत तू तिच्या म्हणजे.... तुला समजलं ना.... ’तिच्या’ विरोधात आहेस, असं तिला जाणवू देऊ नकोस.” राजेशने मान डोलावली.

जयरामकाका अरविंदकाकांकडे वळून म्हणाले, “अरविंदा, तू ह्या घराचा जुना मालक कैलास पाटील कुठे रहातो, त्याचा ठावठिकाणा काय, याचा शोध घ्यायचास. काहीही कारण सांग, खोटं बोल पण त्याचा पत्ता काढून घे आणि त्याला भेट. त्याला काय सांगायचं, हे मी तुला वेळ आल्यावर सांगेन. आपण तिघेही, मिळेल त्या गाडीने, मिळेल त्या वाहनाने मुंबईला जाणार आहोत. राजेश, मी तुझ्यासोबत हॉस्पिटलला येणार आहे....”

“काका, मी काही मदत करू का?” अचानक साहिलचा आवाज आला. तो नुकताच जेवून बाहेर आला होता. जयरामकाका काहीतरी उपाय शोधतायंत म्हटल्यावर त्यालाही मदत करण्याची संधी हवी होती.

“साहिल, तुला रितूवहिनी पहिल्यासारखी चांगली व्हायला हवी असेल, तर एकच करायचं. तुझ्या त्या मित्राला सांगायचं की पुन्हा प्लॅन्चेट करायचं आहे. त्याच जागी! तो ’नाही’ म्हणाला तर तसं मला कळवायचं.”

साहिलने ’हो’ म्हणत मान डोलावली.

“इथून मुंबईला जाण्याआधी मला ते घर पहायचं आहे.” जयरामकाका म्हणाले.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

8 comments:

 1. tumchi katha khupach chaan hot aahai. roj navinch vachayal milat aahai.please pudhil pan pg:26 lawkar post kara. Mr. Murphy.

  ReplyDelete
 2. धन्यवाद, मर्फी. ही कथा लिहिताना प्रत्येक पानावर एक नवीन प्रसंग, अशा प्रकारे कथा लिहिण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे. पुढील पाने लवकरात लवकर पोस्ट करेन.

  ReplyDelete
 3. me mrs. murphy, lawakarat lawakar mhanje kadhi???? khup - khup vaat pahat aahai pudhil panachi. please post karanaaa........ katha kharch chaan aahai mhanun utsukta wadhat aahai.

  ReplyDelete
 4. मर्फी, आपली उत्सुकता समजू शकते. पान २६ पोस्ट केले आहे. उद्या शक्य झाल्यास एकापेक्षा जास्त पाने पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन.

  ReplyDelete
 5. me. mrs. murphy, sorry kanchan kathechya utsuktye mule lakshat rahila nahi tumhala kamacha khup vyap aahai.

  ReplyDelete
 6. काही हरकत नाही मर्फी. तुम्ही माझ्या कथेचा प्रत्येक भाग इतक्या उत्सुकतेने वाचता, यातच मला आनंद आहे. ही कथा थोडी लांबणीवर पडतेय, त्याचा मलाही खेद आहे.

  ReplyDelete
 7. अप्रतिम
  या शिवाय दुसरे शब्दच नाहीत.

  ReplyDelete