Thursday, December 24, 2009

प्लॅन्चेट – पान ३२

प्रतिक्रिया: 
राजेशने केसपेपर्स ताब्यात घेतले आणि रितूचा हात धरून अरविंदकाकांना ’चला’ म्हणून खूण केली. ते तिघे बाहेर आले, तेव्हा गाडीच्या दरवाज्याजवळ साहिल अपराध्यासारखा मान खाली घालून उभा होता. जयरामकाका त्याच्याशी बोलत होते.

“….तुझ्या मित्राची गरज मला नव्हतीच. त्याला फक्त इतकंच सांगायचं होतं की पत्त्याचा डाव जसा अर्धवट टाकून उठता येतं, तसं हे नसतं. हा खेळ नाही, साहिल.”

“काका, देवाशपथ सांगतो. मी पुन्हा कधीच हे करणार नाही.”

“गुड,” जयरामकाका त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाले. “हे तुझ्या मित्रालाही समजावून सांग आणि आता आम्ही परत येईपर्यंत अभ्यासात लक्ष घाल.”

साहिलने खाली मान घालूनच ’हो’ म्हटलं आणि तो आपल्या बाईकवरून निघून गेला.

जयरामकाका गाडीत बसले आणि राजेशने राहूलला फोन केला.

“हां, राहूल…. हो, चाललोय… नाही, नको देऊस…. मग मनूसुद्धा येईल फोनवर…. नाही, त्याची खरंच काही गरज नव्हती. तुम्हाला इथे येऊ नका सांगितलं त्याला कारण आहे…. सांगेन… हे बघ, आता जास्त बोलत नाही. पल्लवीला नंतर माझा फोन येऊन गेला एवढा निरोप दे… चल, ठेवतो..”

राजेशचा फोन झाला आणि जयरामकाकानी किंचीत मान तिरकी करून मागे बसलेल्या राजेशशी बोलायला सुरूवात केली.

“पाहिलंस ना, राजेश. आपले आजोबा खंगून खंगून मेले, हे सांगताना कशी अवस्था झाली होती, त्या कैलास पाटलाची? सुभानराव मरताना का होईना, खरं बोलला म्हणून कैलासला सर्व माहित झालं होतं. म्हणूनच त्याने घाईघाईने हे घर विकण्याचा बेत आखला. हेच मला माहित करून घ्यायचं होतं.”

राजेशने त्यांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हटलं, “आपल्या बोलण्यावरही कैलासने इतक्या सहजासहजी विश्वास ठेवला नसता, काका. पण हेलन आणि रॉबर्टचं नाव त्याने तुमच्या तोंडून ऐकलं म्हणून तो गप्प बसला.”

राजेशने रितूकडे मान वळवून पाहिलं, ती सीटवर डोकं मागे टेकवून झोपली होती. रितूने फक्त डोळे मिटलेत, तिच्यातील हेलनचं संपूर्ण लक्ष आपल्या बोलण्याकडे आहे, हे तिघांनाही जाणवत असल्याने त्यांचा पुढचा प्रवास जवळजवळ नि:शब्द झाला.

गावातल्या त्या घराजवळ गाडी येताच रितू स्वत:हून उठून बसली. काकांनी तळघरात गेल्यावर रितूला समोर बसवलं.

“हेलन, ऐकतेयंस ना?”

तिने मान डोलावली.

“ज्या माध्यमातून तुला आवाहने केलं गेलं होतं, त्याच माध्यमातून मी सुभानरावाला अवाहन करणार आहे. तो येईल की नाही, हे मला माहित नाही पण त्याच्या आत्म्याला गति मिळाली नसेल, तर तो इथे यायलाच हवा.”

हेलनचे डोळे आनंदाने लकाकले.

जयरामकांच्या एका बाजूला अरविंदकाका आणि एका बाजूला राजेश बसला होता. काकांनी मधोमध प्लॅन्चेटचा बोर्ड ठेवला त्यावर बदामाच्या आकाराचा इंडिकेटर ठेवला. राजेश आणि अरविंदकाकांनी पहिल्यांदाच तो बोर्ड पाहिला होता. बोर्डच्या वरच्या बाजूला A पासून Z पर्यंत आद्याक्षरे आणि खालच्या बाजूला 1 पासून 0 पर्यंत आकडे होते. वरच्या कोप-यात डाव्या बाजूला YES आणि उजव्या बाजूला NO असं लिहिलेलं, तर सर्वात खाली मध्यभागी GOOD BYE असं लिहिलेलं होतं. काकांनी तो बोर्ड व्यवस्थित पुसला.हेलन ते काय करतात हे पहात समोर बसली होती. काकांनी सूचना द्यायला सुरूवात केली.

“अरविंद, राजेश तुम्ही दोघंही माझ्यासोबत या इंडिकेटरवर…. हा असा…. हात ठेवणार आहात. बोटांचं वजन शून्य असलं पाहिजे. काही वेळाने इंडिकेटर हलेल, तेव्हा घाबरून जाऊ नका. जर काही प्रश्न करायचे असतील, तर मला सांगा. इथे जे काही घडेल, ते गुम्हाला समजेल किंवा कदाचित समजणारही नाही पण तुम्ही दोघांनी आपल्या मनावर ताबा ठेवायचा आहे.”

राजेश आणि अरविंदकाकांनी मान डोलावून जयरामकाकांना होकार भरला. जयरामकाकांनी हेलनला सूचना केल्या.

“हेलन, ज्या क्षणी मी तुला ’ये’ म्हणेन, त्याक्षणी तुला रितूचं शरीर सोडावं लागेल. जर तू तसं केलं नाहीस, तर तुला पुढचं काहीच कळणार नाही. तू आता मुक्त आहेस, त्यामुळे एकदा का तुझी उद्देशपूर्ती झाली की तुला या जागेतून कायमचं निघून जावं लागेल. जर दिलेलं वचन मोडलंस, तर तुला कुठल्याही मनुष्याचा माध्यम म्हणून वापर करता येणार नाहीच पण तू ह्या खोलीतूनही कधीह बाहेर पडू शकणार नाहीस.”

“मला मंजूर आहे. माझा उद्देश संपला की मी निघून जाईन.” हेलन म्हणाली.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment