Thursday, December 17, 2009

प्लॅन्चेट – पान २४

प्रतिक्रिया: 
म्हाता-याचं बोलून संपलं, त्याला बराच वेळ होऊन गेला, तरी अरविंदकाका आणि राजेश सुन्न बसून होते.

म्हाता-याने पुन्हा बोलायला सुरूवात केली आणि ते दोघेही दचकले.

“त्या दिशी सुभान्याला शेवटचं पाह्यलं म्या. त्या दिवसापासून ते आजपातूर त्या घरात पाटलाच्या घरचं कुनी बी –हात न्हाय. तुला घर इकताना काय मोहिनी घातली, त्यानं त्यालाच ठावं.”

राजेशने म्हाता-याला यावर काहीच उत्तर दिलं नाही. त्याने अरविंदकाकांकडे पाहिलं.

“काका, काय करायचं?”

“काय करायचं म्हणजे? हा गुन्हा आहे. अपराध्याला शिक्षा ही व्हायलाच हवी.”

“पण अपराधी शोधायचा कसा काका?”

या प्रश्नाचं उत्तर अरविंदकाकांनाही माहित नव्हतं. अचानक काहीतरी सुचल्यासारखं ते उठले.

“चल, राजेश.”

राजेश उठून कपडे झटकेपर्यंत अरविंदकाका झपझप चालायला लागले होते. त्यांना गाठावं की म्हाता-याचा निरोप घ्यावा हेही राजेशला कळत नव्हतं इतका तो अरविंदकाकांच्या कृतीने गोंधळून गेला. तो खाली वाकून म्हाता-याला “येतो” म्हणाला. तेवढ्यात म्हाता-याने त्याचा हात गपकन पकडला.

“पोरा, इतकी वर्सं ह्ये गुपित माझ्या काळजात दडवून ठिवलं हुतं. माज्या नातवला बी ठावं न्हाय त्ये. तुजी बायको मला भेटाया आली नसती, तर माझ्यासंगच ह्ये गुपित बी संपलं आसतं. आता येकच सांगतो. त्या घराचा नाद सोड.... त्या घराचा नाद सोड.”

राजेशने मान डोलावली आणि तो अरविंदकाकांना गाठण्यासाठी निघाला. दोघे घरी पोहोचले तेव्हा दुपार होत आली होती. म्हाता-याची हकिकत ऐकताना वेळ कसा गेला, हे दोघांनाही समजलं नव्हतं. घराजवळ येताच बाहेर उभी असलेली गाडी पाहून अरविंदराव धावतच घरात शिरले.

जयरामकाका सोफ्यावर बसले होते. साहिल त्यांच्या समोर उभा होता आणि जयरामकाका त्याला प्रश्न विचारत होते.

“कुणाला बोलवलं होतंत तुम्ही?”

साहिलने या प्रश्नाचं उत्तर देण्याआधीच अरविंदकाकांनी जयरामकाकांना हाक मारली. दोघं एकमेकांकडे पाहून हसले आणि एकमेकांना कडकडून भेटले.

“अजून तस्साच आहेस.” जयरामकाकांकडे पहात अरविंदकाका म्हणाले.

“तू तरी कुठे बदलला आहेस? काम नसलं की नवीन काम शोधून काढण्याचा तुझा स्वभाव कुठे बदलला आहे.”

“अरे दोन वर्षांत काय स्वभाव बदलतो का?” असं म्हणत हसत हसत अरविंदकाकांनी जयरामकाका आणि राजेशला बसण्याची खूण केली. राजेशची ओळख करून दिल्यानंतर अरविंदकाकांनी राजेशला जयरामकाकांची ओळख करून दिली.

“राजेश, हे जयराम महाबळ. माझे वर्गमित्र आहेत. शाळेपासूनच आमची मैत्री आहे.” मग अरविंदकाका जयरामकाकांकडे वळून म्हणाले, “जया, बरं झालं तू आलास. खरं तु आला नसतास तर मी स्वत:च तुला बोलवून घेणार होतो....”

जयरामकाका साहिलकडे पाहून म्हणाले, “मलाही कल्पना आलीय त्याची थोडीफार. थोडं गंभीर प्रकरण दिसतंय. तुम्ही आत्ता जिथे गेला होतात, तिथून काही बातमी मिळालीय या प्रकाराबाबत?”

“थोडीफार? अरे जवळजवळ नव्व्याण्ण्व टक्के बातमी मिळालीय!” अरविंदकाका म्हणाले.

राजेश नुसतंच ते काय बोलतात, हे ऐकत होता. आपल्या प्रकरणात जयरामकाका काय म्हणून लक्ष घालणार, हे त्याला समजलं नव्हतं. त्याचा गोंधळ लक्षात घेऊन अरविंदकाकांनी माहिती पुरवली.

“अरे हो, राजेश. हा जया माझा नुसता वर्गमित्र नाही बरं का! तो पॅरानॉर्मल केसेस आणि पॅरानॉर्मल बिहेविअर या विषयतील तज्ञ आहे. एका केसच्या अभ्यासासाठी तो फ्लोरिडाला गेला होता, तो आज दोन वर्षांनी उगवलाय. मगाशी त्या म्हाता-याजवळून निघताना माझ्या डोळ्यासमोर हाच होता. शंभर वर्ष आहेत तुला जया.”

राजेश एका नव्याच नजरेने जयरामकाकांकडे पाहू लागला. त्याला इतक्या दिवसापासून सतावत असलेला प्रश्न त्याने अचानकपणे जयरामकाकांना विचारला.

“काका, हे भूत प्रेत, खरंच असतं का?”

जयरामकाका त्याच्याकडे पाहून हसले. राजेश हा त्यांना असा प्रश्न विचारणारी पहिली व्यक्ती नव्हता.

“राजेश, मला सांग. हवा तुला दिसते का? नाही ना. पण ती आहे, हे तू मान्य करतोस. बरोबर? देवळात गेल्यावर जसं भारलेलं वातावरण अनुभवायला मिळतं, तसं रस्त्यावर का नसतं? सिनेमाच्या थिएटरमधे का नसतं? देव तर सर्वत्र आहे पण देवळात गेल्यावर जसं पवित्र, मंगल वाटतं, तसं इतर ठिकाणी का वाटत नाही? याचं कारण एका विशिष्ट प्रकियेमुळे प्रत्येक जागेला काही वैशिष्ट्ये प्राप्त होतात. आणि प्रक्रियेच्या गुणधर्मांनुसार त्याच प्रकारच्या शक्ती त्या प्रक्रियेमुळे आकर्षिल्या जातात आणि एक वातावरण तयार होतं. उत्तरोत्तर ते वातावरण अधिकाधिक गडद होत जातं. आता देवळाच्या विरुद्ध उदाहरण देतो. दारूचा गुत्ता! तिथे कसं वातावरण असतं? एखादा देवळातून प्रसाद घेऊन निघालेला भक्त थेट दारूच्या गुत्त्यावर जाताना तू पाहिलायंस कधी?”

राजेशने नकारार्थी मान हलवली. काकांनी बोलणं पुढे सुरू केलं.

“याचं कारण, त्या मनुष्याची सद्संद्‍विवेकबुद्धी त्याला दारूच्या गुत्त्यावर जाण्यापासून रोखत असते. म्हणजेच या जगात जशा चांगल्या शक्ती आहेत, तशाच वाईट शक्तीही आहेत. घरी खाऊन-पिऊन तृप्त असणारी माणसं काहीही कारण नसताना, चोरी करतात. त्याला शास्त्रीय भाषेत क्लेप्टोमेनिया असं म्हणतात. पण ही वाईट शक्तिच ना!”

राजेशला काकांचं म्हणणं पटलं होतं. अरविंदकाका आणि साहिलही लक्ष देऊन ऐकत होते.

“जया, आता तर मला खात्रीच पटलीय की आम्हाला तूच मदत करू शकशील. या आमच्या लेकाने....”

जयरामकाका अरविंदकाकांच बोलणं तोडत मधेच म्हणाले, “अरविंदा, साहिलकडून मला जे काही कळलंय, त्याचा राजेशच्या पत्नीच्या बदललेल्या वागण्याशी खूप जवळचा संबंध आहे. अरे हो! साहिल, मगाशी ते राहूनच गेलं..... कुणाला बोलवलं होतंत तुम्ही?”ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

6 comments:

 1. Me, Mrs. Murphy, when you send page. : 25
  murphy_chindarkar@rediffmail.com

  ReplyDelete
 2. मर्फी, आज संध्याकाळी पुढील पान पोस्ट करत आहे.

  ReplyDelete
 3. khup chaan challi aahe hi gudkatha.lawkarat lawkar post kara.me vatt bhaght aahe

  ReplyDelete
 4. धन्यवाद श्रद्धा. आज संध्याकाळी पुढचं पान पोस्ट करतेय.

  ReplyDelete
 5. khup chaan kathan lihit aahat tumhi.please pudhil pan lawkar post kara. Pg: 26.Mrs. Murphy.

  ReplyDelete
 6. मर्फी, पान २६ लवकरच पोस्ट करत आहे. धन्यवाद!

  ReplyDelete