Wednesday, December 16, 2009

प्लॅन्चेट – पान २३

प्रतिक्रिया: 
दारात उभ्या असलेल्या त्या माणसाला पाहून साहिलच्या चेहे-यावर ओळखीच्या खुणा उमटल्या.

“जयरामकाका!” साहिल अत्यानंदाने ओरडत धावत त्यांच्याजवळ गेला आणि पाया पडला.

“कसा आहेस बेटा?” जयरामकाका त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले.

“बरा आहे. काका.... आत या ना!”

जयरामकाका आत येऊन बसले. साहिलने त्यांना पाणी आणून दिलं.

“तुझे बाबा कुठायंत?” जयरामकाकांनी इकडे तिकडे पहात म्हटलं.

“ते एका कामासाठी गावातच गेलेत.”

“छान!” जयरामकाका हसत म्हणाले. “म्हणजे, सुटी घेऊन इथे आलाय पण गप्प बसवत नाहीये त्याला. काही ना काही काम हवंच.”

साहिल प्रतिसादादाखल नुसतंच हसला.

“आणि तुझं काय? तुला करमतं का इथे गावी?”

“अं.... नाही..... तसं करमत नाहीच पण माझे मित्र सुद्धा आपापल्या गावी गेलेत, म्हणून म्हटलं यावर्षी बाबा जाणारच आहेत तर आपणही जावं. राहूलदादासुद्धा आला होता पण त्याला काम आलं म्हणून तो निघून गेला.”

“हो का? अरे वा, मस्तच की. बरं आहे, तुम्हाला गावं पहायला मिळालं ते. तुम्हा आजकालच्या पोरांना गाव म्हणजे काय, ते ठाऊकच नसतं....”

“पण काका, तुम्ही कुठे होतात इतके दिवस? आमच्या घरी तुम्ही शेवटचं आलात, त्यालाही दोन वर्ष झाली असतील....”

हे ऐकल्यावर जयरामकाका किंचित गंभीर झाले पण चेहे-यावरचं हास्य कायम ठेवत त्यांनी साहिलला उत्तर दिलं.

“काम थोडं जास्तच लांबलं माझं, नाहीतर राजेशच्या साखरपुड्याला येऊ शकलो असतो. गेल्या आठवड्यात मी मुंबईत आलो. आल्या आल्या तुमच्याच घरी फोन लावला, तेव्हा कळलं की तुम्ही इकडे आला आहात. मुंबईतील एक दोन कामं उरकली नि तुम्हाला भेटायला निघून आलो....”

बोलता बोलता जयरामकाकांच्या लक्षात आलं की साहिलचं काहीतरी बिनसलं आहे. त्याचं बोलण्याकडे लक्षच नाहिये.

“साहिल, बेटा खूपच बोअर झालेला दिसतोस तू इथे?”

“नाही हो काका.”

“मग काही निराळं कारण आहे का, तुझ्या उदासपणाचं?”

आपल्या चेहे-यावरचे भाव इतके बोलके असतील याची साहिलला कल्पना नव्हती. जयरामकाकांनी त्याला आठवण करून दिल्यावर काल रात्री घडलेला प्रसंग त्याला पुन्हा आठवला. त्याचबरोबर त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. काकांना आपले अश्रू दिसू नयेत म्हणून त्याने चटकन मान खाली घातली.

“काका, बाबा खूप रागावलेत माझ्यावर. चूक माझीच आहे पण त्यांनी....” साहिलला पुढे बोलता आलं नाही.

जयरामकाका लक्षात आल्यासारखी मान डोलावत म्हणाले, “काय असतं ना बेटा, की लहान मुलांकडून जर एखादी अशी चूक घडते, जिचे दुषपरिणाम सर्वांना भोगावे लागू शकतात. अशा वेळी मोठ्या माणसांचा नाईलाज होतो आणि मग आपला राग व्यक्त करण्यासाठी त्यांना काहीतरी मार्ग हवा असतो. पण याचा अर्थ ते आपला तिरस्कार करतात असा होत नाही. डोळे पूस. तुझ्या हातून जी काही चूक घडली, त्यासाठी तू माफी मागितलीस ना....”

साहिलने होकारार्थी मान डोलावत म्हटलं, “... माफी मागितली काका. पण तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. मी केलेल्या चुकीची शिक्षा बहुतेक रितूवहिनी भोगतेय. मला माहिती नाही हे खरं की खोटं, पण मला असं वाटतं की माझ्या हातून ती गोष्ट घडली नसती, तर हे सर्व झालंच नसतं,.”

“कोण ही रितूवहिनी? काय झालं काय असं?”

साहिलने पल्लवी-राहुलच्या साखरपुड्यापासून ते आजपर्यंत, त्याला माहित असलेली सर्व हकिकत जयरामकाकांना सांगितली. जयरामकाका एकदम गंभीर झाले. त्यांनी त्याच गंभीर स्वरात साहिलच्या नजरेला नजर देत प्रश्न केला.

“साहिल, मला खरं सांग. तुम्ही प्लॅन्चेट केलंत, तेव्हा तुम्हाला काहीच अनुभव आला नाही?”

साहिलने चाचरत उत्तर दिलं, ““अनुभव म्हणजे... खरं सांगायचं तर.... आम्हालाच समजलं नव्हतं की ते आपोआप झालं की आमच्या बोटांच्या वजनामुळे.”

“....म्हणजे बोर्डवरचा इंडिकेटर हलला होता पण तुम्ही लक्ष दिलं नाहीत.”

साहिलला जयरामकाकांच्या नजरेला नजर देणं जड जात होतं.

“हो, तसंच काहीतरी.... आम्ही तीन-चार वेळा प्रयत्न केला पण काहीच होत नव्हतं, म्हणून आम्ही मनूलासुद्धा त्यात सामिल करून घेतलं.... नंतर इंडीकेटर हलायला लागला. ते बघून मनु जोरजोरात हसत होता. त्यामुळे आम्हाला वाटलं मनूच मुद्दाम इंडीकेटर इकडे तिकडे फिरवतोय. म्हणून आम्ही प्लॅन्चेटचा नादच सोडून दिला आणि सगळं आवरतं घेतलं.”

जयरामकाका काही न बोलता साहिलकडे पहात स्तब्ध बसून होते.

“काका....काय झालं?”

“कुणाला बोलवलं होतंत तुम्ही?” जयरामकाकांनी प्रश्न केला.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

4 comments:

 1. कथा खुपच interesting आहे, पुढ़े काय होणार याची उत्सुकता लागली आहे!! लवकर पुढ़्चे भाग टाका

  ReplyDelete
 2. हो, अनामित. रोज एक पान पोस्ट करण्याचा प्रयत्न करते आहे. अभिप्रायासाठी धन्यवाद!

  ReplyDelete
 3. hi, Mee tumchya blog chi member nahi pan tarihi tumchya katha vachate, ya kathe babat hi utsukta khup vhadhali aahe pudhe kay honar yachi phakta aamhi kalpanach karat aahot...
  Lawkar lawkar post kara.....

  ReplyDelete
 4. अनामित, आपल्या उत्कट प्रतिसादासाठी खूप धन्यवाद. तुम्ही सभासद न होताही हा ब्लॉग वाचू शकता.

  ReplyDelete