Saturday, December 12, 2009

प्लॅन्चेट – पान २१

प्रतिक्रिया: 
“पल्लवी, ठिक आहेस ना?” राहूलने विचारलं. त्याच्या नुसत्या स्पर्शानेही पल्लवी केवढीतरी दचकली.

“राहूल....” पल्लवी त्याला घट्ट बिलगली. राहूल काही न बोलता तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला.

काही वेळापूर्वीच्या त्या प्रसंगाने पल्लवीची मानसिक स्थिती ढासळली होती. तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती, असा प्रसंग तिच्या आयुष्यात घडला होता. जर वेळेवर हॉस्पिटलची लोकं आली नसती, तर पल्लवी आणि मनू, दोघंही आपला जीव गमावून बसले असते. नशीब! मनू जागा होऊन बाहेर आला, तेव्हा हॉस्पिटलच्या लोकांनी रितूला बाहेर नेलं होतं.

“राहूल.... हे.... हे काय झालं रे वहिनीला?” पल्लवी हमसाहमशी रडू लागली.

“पल्लवी, मला काहीच माहिती नाहीये. डॉ. चांदोरकरांच्या हॉस्पिटलमधून फोन आला आणि त्यांनी ’तू हॉस्पिटलला आहेस’ असं सांगितलं, म्हणून मी इथे आलो.”

“तू पाहिलंस वहिनीला? तिकडे.... त्या शॉक ट्रिटमेंटच्या रूममधे आहे ती.” पल्लवी भेदरलेल्या स्वरात म्हणाली. राहूलने नकारार्थी मान हलवली.

“पल्लवी, रितूवहिनीला शॉक ट्रिटमेंट द्यावी, असं झालं तरी काय?”

पल्लवीने राहूलला घडलेला प्रसंग सांगितला.

“अरे, काय भयानक दिसत होती ती! तिला बघूनच भिती वाटली मला. कधी नव्हे, ते इंग्रजीतच बोलत होती.... आणि तिचे डोळे.... हॉस्पिटलची लोकं दरवाजा तोडून आत शिरली नसती, तर....”

“काय? दरवाजा तोडून? राहूलने आश्चर्याने विचारलं.

“हो. रितूवहिनीने इथे हॉस्पिटलमधे सुद्धा कुणाला तरी जखमी केलं आणि डोळा चुकवून ती घरी पळून आली. पण ते लगेच लक्षात आलं म्हणून नशीब. घरचा फोन बंद नसता, तर मी आधीच सावध झाले असते.”

“पल्लवी, हे तुला चमत्कारिक वाटत नाही? रितूवहिनीला मी गेली दोन वर्षं पहातोय. शी इज अ नॉर्मल पर्सन. तिला असलं काही झाल्याचं मला आठवत नाही. मग आजच अचानक…”

“राहूल, मला पक्की खात्री आहे की त्या आनंदगावच्या घरात काहीतरी आहे. दादाच्या तसल्या गोष्टींवर विश्वास नाही, म्हणून तो वहिनीला डॉक्टरांकडे घेऊन आला पण मला आता वहिनी म्हणाली होती तेच बरोबर वाटतंय.”

“म्हणजे तुला असं म्हणायचंय, की रितूवहिनीला आधीच काही माहित झालं होतं का?”

“असावं. पण बहुधा दादा तिला वेड्यात काढेल, म्हणून तिने ते कुणालाच सांगितलं नसावं.”

“आपण दोघं मिळून एकदा राजेशशी बोलू या का?”

“आता त्याची गरज नाही, राहूल. बहुतेक दादालासुद्धा असा अनुभव आला असावा, म्हणून तर तो इतक्या तातडीने आनंदगावला रवाना झाला.”

“अच्छा! पण मग तू मला राजेश कामासाठी गेलाय म्हणून का सांगितलंस?”

“अरे, मग काय सांगू? मलाच नीट काही कळलं नव्हतं. दादाने जे सुचवलं तेच कारण मी तुला दिलं.”

“मनू ठीक आहे ना?”

“हो. त्याने काहीच बघितलं नव्हतं.”

“तू राजेशला फोन लावला होतास?”

“खूप प्रयत्न केले. नेटवर्क मिळत नाहिये.”

“तू झोप शांतपणे, मी ट्राय करून पहातो.”

“नाही राहूल. ही शांत झोपायची वेळ नाही. अरे, मला काही झालं नाहीये. मला वहिनीची काळजी वाटतेय….”

“पल्लवी, आता तू जास्त विचार करू नकोस. शांत पडून रहा. बघ, मनूसुद्धा शांत झोपलाय नं?”

“राहूल, प्लीज इथून जाऊ नकोस हं. मला खूप भिती वाटतेय.”

“नाही जाणार. इथेच तुमच्या दोघांच्या उशाशी बसून राहीन मी. आता तरी झोपशील ना?”

उत्तरादाखल पल्लवी पुन्हा कॉटवर आडवी झाली. राहूल तिच्या खांद्यावर थोपटत राहिला.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment