Friday, December 11, 2009

प्लॅन्चेट – पान २०

प्रतिक्रिया: 
अरविंदकाकांनी मागचा पुढचा काही विचार न करता, साहिलच्या एक कानाखाली मारली.

“नालायक! असले उद्योग करताना काय होऊ शकतं याचा विचार केला होतास का?” अरविंदकाका चढ्या आवाजात बोलले.

“काका.... काका.... प्लीज! त्याच्यावर हात उचलू नका. अहो, त्याला काय कल्पना.... “

“मुळात अशा माहित नसलेल्या गोष्टी कराव्यातच का मी म्हणतो?” अरविंदकाका साहिलकडे रागाने पहात बोलले. “ह्या कार्ट्याला काही अक्कल आहे की नाही? असल्या गोष्टीत विषाची परिक्षा पहातात का?”

साहिल गाल चोळत तिथेच उभा होता. त्यालाही आपल्या कृतीता पश्चात्ताप होत होता. वडिलांनी ति-हाईतासमोर केलेल्या अपमानामुळे त्याच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले होते.

“राजेशदादा, मी आणि अमितने तुझ्या घरात प्लॅन्चेट केलं, तेव्हा खरंच काही घडलं नव्हतं. अरे, एका जागी शांत बसून बसून शेवटी मनूसुद्धा कंटाळला होता. थोड्या वेळाने आम्ही सगळंच आवरतं घेतलं आणि वर जाऊन जोडपत्ते खेळत बसलो.” साहिलने अरविंदकाकांकडे चोरट्या नजरेने पहात राजेशला स्पष्टीकरण दिलं.

“म्हणजे तुम्हाला प्लॅन्चेट करताना रितूने पाहिलं नव्हतं?” राजेशने अविश्वासाने विचारलं.

“नाही. रितूवहिनी, आम्ही पत्ते खेळत होतो, तेव्हा आली. आम्ही तिथे तळघरात प्लॅन्चेट केलं होतं, हे तिला माहितीच नाही.”

राजेश अजूनही अविश्वासाने साहिलकडे पहात होता.

“साहिल, तू खरं सांगतोयंस ना?”

“हो, दादा. खरंतर मी दुस-या दिवशी रितूवहिनीला ह्या प्लॅन्चेटबद्दल सांगायला घरी गेलो होतो पण ती मुंबईला जायची तयारी करत होती म्हणून मी तसाच मागे फिरलो.”

साहिलचं बोलणं ऐकून राजेश बुचकळ्यात पडला. “रितूने जर हा प्रकार पाहिलेलाच नाही, तर तिच्या चमत्कारिक वागण्याला दुसरं काय कारण असू शकतं?”

अचानक त्याला आठवलं!

“काका, इथे आमच्या घराच्या साफसफाईसाठी दोन-तीन माणसं आली होती बघा! त्यात्यल्या कुणाच्या तरी घरी रितू गेली होती. तिला त्या घरात एक ड्रेस सापडला होता आणि कुणीतरी तिला ह्या घराबद्दल काही तरी सांगणार होतं म्हणे.....”

“दादा, तो महादूचा आजा.... आय मिन आजोबा. त्यांना भेटायला रितूवहिनी गेली होती.”

“कुठे रहातात माहित आहे तुला?”

“माहितीय....”

आता अरविंदकाकांनी राजेशला अडवलं. ते रागाने साहिलकडे पहात राजेशला समजावू लागले.

“राजेश, महादूचं घर मला माहित आहे. तुला रितूची काळजी आहे तशीच मलाही आहे. पण हे खेडेगाव आहे. पायाखालचा रस्ता सवयीचा नाही. रात्रीच्या वेळी जनावर कुठे दबा धरून बसतं, काही सांगता येत का? आता रात्रीतून तर तुला मुंबईला काही परत जाता येत नाही, तर सकाळीच महादूच्या घरी जा ना! तुला व्यवस्थित बोलताही येईल.”

राजेशला अरविंदकाकांचा सल्ला पटला. अंथरूणावर अंग टेकताच त्याला गाढ झोप लागली. मधेच केव्हातरी त्याचा मोबाईल वाजला. त्याने फोन उचलून हॅलो म्हणायच्या आधीच तो कट झाला.

“शॅ:ऽ! हे नेटवर्क ना!” असं म्हणून राजेश पुन्हा झोपी गेला. झोपेत केव्हातरी त्याला रितूचा चेहेरा दिसला. रितू खूप लांबून हाका मारून त्याला बोलवत होती.


No comments:

Post a Comment