Tuesday, December 8, 2009

प्लॅन्चेट - पान १९

प्रतिक्रिया: 
राजेशचं नशीब आज जोरावर होतं. मेन रोडवरच्या धाब्यावर तो पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी थांबला नसता, तर आज आनंदगावला जाण्याचा शॉर्टकट त्याला कळला नसता. त्या अपरिचित माणसाने, आज त्याचा तीन तासांचा प्रवास वाचवला होता. वास्तविक कुणाही अपरिचितावर विश्वास ठेवून, त्यानुसार वागणा-यांपैकी राजेश नव्हता. पण त्या माणसाने केलेली विनंती राजेशला धुडकावता आली नाही.

“आज मेन रोडने जाऊ नका साहेब. नेहमीपेक्षा जास्त वेळ लागेल. त्यापेक्षा शॉर्टकटने जा. त्या रस्त्यावर खाचखळगे आहेत पण तरीसुद्धा तुम्ही खूप लवकर पोहोचाल. पिवळ्या दगडांची एक रांग डाव्या बाजूला दिसेल. ती ओलांडली की अर्ध्या किलोमिटरवरच तुम्हाला आनंदगावचा फाटा दिसेल,”

“तुम्हाला कसं कळलं, मला आनंदगावचा रस्ता हवा आहे?” राजेशने संशयाने विचारलं.

“नाही. मला माहित नव्हतं. आत्ता तुम्ही कुणाला तरी फोनवरनं सांगितलंत ना, ते कानावर पडलं.” त्या माणसाने उत्तर दिलं.

आता राजेशला आठवलं. राहूलला फोन करून, पल्लवीला घरी थांबवल्याचं सांगताना, राजेशच्या बोलण्यात आनंदगावचा उल्लेख आला होता.

“नक्की लवकर पोहोचेन ना?” राजेशने विचारलं.

“माझ्यावर विश्वास ठेवा साहेब.”

“ठिक आहे. बघतो. वेळ वाचला तर चांगलंच आहे. पेट्रोल पण वाचेल.” राजेशने त्या माणसाचा निरोप घेऊन पुन्हा प्रवासाला सुरूवात केली.

तो अपेक्षेपेक्षा लवकर पोहोचल्याने अर्थातच अरविंदकाका आणि साहिल फाट्यावर थांबले नव्हते. तसंही राजेशला त्यांना इतक्या रात्री त्याच्यासाठी फाट्यावर थांबायला लावणं बरं वाटत नव्हतं.

गावाच्या हद्दीतून गाडी आत शिरताना राजेशच्या लक्षात आलं की आपण त्या अपरिचित माणसाचं नावही विचारायला विसरलो. त्याचे आभारही आपण मानले नाहीत. आता या सगळ्यासाठी खूप उशीर झाला होता. मनातील विचार झटकून राजेशने गाडी गावात आणली.

स्वत: विकत घेतलेल्या घरात न जाता, आधी अरविंदकाकांना तोंड दाखवावं असा विचार करून राजेशने गाडी अरविंदकाकांच्या घरासमोर उभी केली.

त्याच्या गाडीचा आवाज ऐकून अरविंदकाका स्वत:च बाहेर आले. राजेशने घरात शिरताना त्यांना शॉर्टकटचा किस्सा सांगितला. अरविंदकाकांनाही ही गोष्ट नवीनच होती.

जेवण होईपर्यंत विषय काढायचा नाही असं अरविंदकाकांनी स्वत:च ठरवलं होतं. पण राजेशने तातडीने येण्यामागचं कारण स्पष्ट न केल्यामुळे, जेवताना सर्व शांतपणे जेवत असले, तरी वातावरणातील ताण सर्वांनाच जाणवत होता.

जेवण झाल्यावर या विषयावर बोलायला कशी सुरूवात करावी, हे राजेशलाही कळत नव्हतं. पण बोलणं भाग होतं.

“काका, इथे, या आम्ही विकत घेतलेल्या घरात असं काहीतरी नक्की घडलंय. जे कदाचित तुम्हाला माहित नाहीये पण खूप महत्त्वाचं आहे.” वळणं घेत बोलण्यापेक्षा थेट मुद्यालाच हात घालणं राजेशने पसंत केलं.

“काहीतरी म्हणजे काय म्हणायचंय तुला?” अरविंदकाकांनी विचारलं.

“मलाही माहित नाही पण भयंकर, गूढ, अगम्य असं काहितरी या घरात नक्की घडून गेलंय.”

“कशावरून हा अंदाज बांधलास तू?” अरविंदकाका हा प्रश्न विचारत असताना साहिलदेखील त्यांच्यात येऊन बसला होता.

राजेशने उत्तरादाखल रितू गावावरून मुंबईला परतल्यानंतरचा सर्व वृत्तांत कथन केला. जसजसा राजेश सांगत केला, तसंतसे अरविंदकाका आणि साहिलच्या चेहे-यावरचे भाव बदलत गेले. डॉ. चांदोरकरांकडचा प्रसंग सांगितल्यानंतर तर साहिल ताडकन उठून उभा राहिला.

राजेश आणि अरविंदकाका, दोघंही साहिलकडे आश्चर्याने पहात होते. साहिल नकारार्थी मान हलवत तिथेच थरथरत उभा होता.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

5 comments:

 1. :( EK CH paan post kele te pan etkya diwasani :( try karana 2.3 paane ektre takaycha plzzzzz

  ReplyDelete
 2. हो निलिमा, मी आता रोज एक पान पोस्ट करणार आहे. माझ्या संगणकाच्या बदलामुळे पानं पोस्ट करणं थोडं लांबणीवर पडलं.

  ReplyDelete
 3. कांचन लिही न पुढे मलाही आवडते तुझे लिखाण वाचायला.

  ReplyDelete
 4. धन्यवाद अनुक्श्री, मलाही रोज एक पान पोस्ट करायला आवडेल. मध्यंतरी संगणकाच्या बदलांमुळे आणि कामात प्रचंड व्यस्त झाल्याने कथा नियमित पोस्ट करता येत नव्हती.

  ReplyDelete
 5. तुमचं इंग्रजीत लिहिलेलं नाव समजलं नव्हतं. क्षमस्व! ते अनुक्षरे आहे, असं आत्ताच कळलं.

  ReplyDelete