Saturday, November 7, 2009

नो कट!

प्रतिक्रिया: 
काही दिवसांपूर्वी माझ्या घराजवळ चित्रपटातील एका दृश्याचं चित्रीकरण करण्यात आलं. जवळ-जवळ तीन तास दिग्दर्शक एकच दृश्य चित्रीत करीत होता. त्याने अॅक्शन म्हटलं की एक अभिनेत्री धावत धावत यायची आणि सर्वांना काहीतरी सांगायची. बस, इतकंच दृश्य! पण चित्रपटात ते परफेक्ट असावं म्हणून त्यासाठी तीन तास घालवावे लागले. किती ही मेहनत! असा मनाजोगता शॉट मिळावा म्हणून त्या दृश्याशी निगडीत असलेले सर्वच जण खूप मेहनत घेत असतात.

मात्र चित्रपटात काही दृश्य अशीही असतात जी चित्रीत करताना कुठेही काटछाट केली जात नाही. कॅमेरा फिरवला जातो आणि दिग्दर्शकाने दिलेलं काम पात्रांनी व इतरांनीही चोख बजावायचं असतं. अर्थात, यासाठी आधी भरपूर तालमीही झालेल्या असतात पण तरीही, जर दहा सेकंदांच्या चित्रीकरणासाठी तीन तास जाऊ शकतात तर तीन ते चार मिनिटांच्या सलग चित्रीकरणासाठी आधी किती तालमी कराव्या लागल्या असतील?

आता या दृश्याचंच पहा ना! ऑन्ग बॅक १ आणि २ मधे काम केलेल्या टोनी जा ने ’टॉम यम गुन्ग’ या चित्रपटातही तशीच तगडी हाणामारीची दृश्य दिली आहेत. पण ’’टॉम यम....’मधील हाणामारीच्या या दृश्याचं वैशिष्ट्य हे की हा संपूर्ण सीन सिंगल टेक आहे. नो कट!

काही बदमाश ’खाम’च्या हत्तीला पळवून नेतात. मग खाम आपल्या हत्तीला परत घेऊन जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जातो. त्याची कहाणी म्हणजे ’टॉम यम गुन्ग’ अर्थात ’स्पेक्टॅक्युलर’. सुमारे चार मिनिटं मिनिटं चालणा-या या हाणामारीच्या दृश्यामधे एकदाही कॅमेरा बंद केला गेलेला नाहीये. पण हे एकच वैशिष्ट्य नाहीये. दृश्य मारामारीचं आहे नि त्याला हवा असलेला बदमाश आहे दुस-या माळ्यावर. तिथे त्याला पोहोचता येऊ नये म्हणून बदमाशाचे साथिदार खामसमोर निरनिराळे हाणामारीचे डावपेच टाकतात आणि खाम त्या सर्वांवर मात करून कसा पुढे पुढे जातो आणि कॅमेरा त्याच्या मागे मागे कसा फिरवला आहे, ते पहाण्यासारखं आहे.तसा सिंगल टेक शॉट हा प्रकार काही भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नाही. १९६९ मधे प्रदर्शित झालेल्या ’आराधना’ या चित्रपटातील “रूप तेरा मस्ताना” या गाण्याचं चित्रीकरणही असंच सलग केलेलं आहे.’कॅश’ या नवीन चित्रपटातील “ए छोरी जरा नचके दिखा” हे गाणं हेदेखील सिंगल टेक आहे, हे बहुधा फार कुणाच्या लक्षात आलं नाही.
सिंगल टेकचा मोह न आवरल्यामुळेच असेल कदाचित, फराह खाननेदेखील दिग्दर्शिका म्हणून केलेल्या पदार्पणात ’मै हूँ ना! या चित्रपटातील “चले जैसे हवाएँ” हे गाणं झायेद खानच्या प्रवेशापर्यंत सिंगल टेक चित्रीत केलेलं आहे.मात्र, सिंगल टेक, नो कटचा मोह फक्त चित्रपटवाल्यांनाच असतो असं नाही बरं का! काही वर्षांपूर्वी बहूचर्चित ’एक शून्य शून्य’ या मालिकेच्या एका भागाचं सलग २२ मिनिटं सलग चित्रीकरण करण्यात आलं होतं.

त्याही पलिकडे उडी मारून सोनी वाहिनीवर दाखवल्या जाणा-या सी.आय.डी. या मालिकेच्या एका भागाचं सलग चित्रीकरण करण्यात आलं होतं २५ मिनिटे! लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समधे याची नोंदही झाली आहे.

पण हे प्रचंड मेहनतीचं काम आहे. तालमी करताना तेच तेच करून कंटाळा येणं, चिडचिड होणं खूप स्वाभाविक असतं. अगदी चित्रण सुरू असतानाही छोट्याशा चुकीमुळे चित्रीकरण पुन्हा पुन्हा केलं जाणं हे निश्चितच कंटाळवाणं, वेळकाढू आणि त्रासदायक आहे.

मला तर वाटतं की सर्वात मोठा सिंगले टेक असेल तर तो नाटकात. कारण चित्रपट किंवा मालिकांमधे चित्रीकरणाच्या वेळेस ’कट’ ला संधी असते पण नाटक एकदा एकदा का रंगमंचावर सुरू झालं की मग नो कट!


आत्ताच ट्विटरवर pvinayak यांनी सांगितलं की मराठी ’गोलमाल’ मधील ’झोल करून टाक’ हे गाणेही असेच नो कट चित्रीत केलेले आहे. म्हणून ही माहीती व चित्रफीत ब्लॉगवर अद्ययावत करत आहे.
2 comments:

  1. सिंगल टेक पाहायला खूप मजा येते, आणि अभिनेत्यांच्या स्टेप्स लक्षात ठेवण्याच्या कसबाचेही कौतुक वाटते.
    सगळ्यात अवघड काम असते ते सिनेमाटोग्राफरचे, आणि अदृश्य दिग्दर्शकाचे.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर, Anand. असा सिंगल टेक ओ.के. झाला की सर्वांनाच मेहनत फळाला आली असं वाटत असेल.

    ReplyDelete