Wednesday, November 25, 2009

प्लॅन्चेट – पान १८

प्रतिक्रिया: 
“तू आधी तिला चुकीचं ठरवलंस, आता वेडं ठरवून मोकळा झालास?” पल्लवीने रागाने डोळे मोठे करत विचारलं.

“शट अप, पल्लवी! रितू वेडी नाहीय.” राजेशचा आवाजही वाढला होता.

“नाहिये ना वेडी? मग तिला त्या चांदोरकरांच्या हॉस्पिटलमधे का ठेवून आलास तू? अरे तिला काय वाटलं असेल, याचा विचार केलास का?”

“मला तिचा आणि तुमच्या दोघांचाही विचार करायचा होता, म्हणून तिला तिकडे ठेवून आलोय. तुला काही माहित नाहीये, इकडे काय झालंय ते.”

“तेच ना! आज अचानक परत आले नसते, तर तेही माहित झालं नसतं.”

पल्लवीला कसं समजावून सांगावं ते राजेशला समजत नव्हतं. त्याने हताश होऊन पल्लवीचे दोन्ही खांदे धरले.

“पल्लवी.... मी खरंच जास्त काही समजावून सांगण्याच्या मन:स्थितीत नाहीये. रितूला मी फक्त दोन दिवसांसाठी तिकडे ठेवून आलोय. तेही तू आणि मनू इथे सुरक्षित असावेत म्हणून. मला आत्ता ताबडतोब आनंदगावला निघायचंय. तू आता आलीच आहेस तर प्लीज.... तुझी कामं कॅन्सल कर नाहीतर मला मनूला त्याच्या मावशीकडे पाठवावं लागेल.”

“नको, मी थांबेन मनूसोबत.” पल्लवीला परिस्थितीची कल्पना आली. “पण आत्ता, इतक्या संध्याकाळी जाण्याची खरंच गरज आहे का? तू तिकडे पोहोचेपर्यंत अकरा-बारा तरी वाजलेले असतील.”

“मी अरविंदकाकांना फोन केलाय. ते स्वत: साहिलला घेऊन आनंदगावच्या फाट्याजवळ थांबणार आहेत. काळजी करून नकोस.”

पल्लवीने नापसंतीजनक मान हलवली आणि ती राजेशच्या बेडरूममधून बाहेर पडली. दरवाजाच्या बाहेरच मनू बसला होता. त्याचे डोळे रडून रडून लाल झाले होते. मुसमुसत तो बाहेर आलेल्या पल्लवीकडे पहात होता.

"अलेऽ, का ललतो माजा शोनू?" पल्लवी पटकन त्याच्याजवळ गेली. त्याचे डोळे पुसून त्याला उचलून घेतलं.

"बाबा, मम्मीला कुठे ठेवून आला?" मनूच्या स्वरात भिती आणि आईची काळजी होती.

"कुठे नाई! अरे मम्मी तुझी मावशीकडे गेलीय ना! मग तिला यायला थोडा लेट होणार आहे. म्हणून आज आपण दोघांनी खेळायचं आणि तिची वाट पहायची. रात्री मम्मी येईलच ना!....आपण तिला सांगायचं...."

मनूची समजूत काढण्यासाठी पल्लवी जसं जमेल तसं खोटं बोलत होती. बोलत बोलत ती त्याला स्वत:च्या बेडरूममधे घेऊन गेली. पंधरा मिनिटांनी तिचा मोबाईल वाजला. मनुच्या नकळत जाता यावं म्हणून राजेशने घराबाहेर पडल्यावर तिला फोन करून कळवलं.

कशीबशी मनूची समजूत काढून, त्याला जेवण भरवून, पल्लवीने त्याला लवकर झोपवलं. त्याला थोपटताना तिला रितूचे शब्द आठवले.

“पल्लवी, तुम्ही सर्वांनी सुखी आणि सुरक्षित रहावं एवढीच माझी अपेक्षा आहे. म्हणूनच मी हे पाऊल उचलतेय....”

पल्लवीच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं.

“त्यादिवशी वहिनी तसं म्हणाली आणि आज दादाही तेच म्हणतोय.... हे दोघेही आपलं कुटुंब सुरक्षित रहावं म्हणून नेमकं करतायंत तरी काय?.... आणि मला का सांगत नाहीय कुणीच काही?.... सुरक्षा का, कशापासून काहीच कळत नाहीये.”

दारावरच्या बेलने तिची तंद्री भंग पावली.

“दादा परत आला वाटतं.” पल्लवी धावतच हॉलमधे आली. मनूची झोप तिला डिस्टर्ब करायची नव्हती.

दार उघडल्यावर पल्लवी चकितच झाली.

“वहिनी तू? अगं तू तर चांदोरकरांच्या सॅनिटोरियममधे होतीस ना?”

रितू तिला काही उत्तर न देता तिचा हात बाजूला करून आत शिरली. पल्लवी तशीच चेहे-यावर प्रश्नचिन्ह घेऊन रितूकडे पहात होती.

“शट द डोअर.” रितूने आज्ञेच्या सुरात पल्लवीला फर्मावलं.

पल्लवीने तिच्याकडे पहात पहातच दरवाजा बंद केला. रितू काही वेगळीच दिसत होती. तिच्या गो-या कातडीवर किंचित काळपटपणा चढला होता. केसांच्या जटा झाल्या होत्या. चेहरा ओढलेला दिसत होता. डोळ्याची पापणीही न लवू देता ती पल्लवीकडे पहात होती.

पल्लवी मनातून चांगलीच घाबरली होती पण उसनं अवसान आणत तिने रितूला पुन्हा विचारलं. “वहिनी, तुला हॉस्पिटलमधून सोडणार होते तर तिथून फोन करायचास ना!”

“राजेश कुठे आहे?” रितूने पुन्हा इंग्रजीतच विचारलं.

“तो.... अं.... तो....”

“कुठाऽऽय तो?” रितू किंचाळली.

अचानक तिच्या चेहे-यात विलक्षण बदल झाले. कातडीचा काळपटपणा संपूर्ण अंगावर पसरला. डोळ्यातील काळ्या बाहुल्या दिसेनाश्या झाल्या. दात विचकून ती पल्लवीकडे पहात होती. तिचा तो अवतार पाहून पल्लवीने जिवाच्या आकांताने किंकाळी फोडली.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

2 comments:

  1. Planchet chi purna katha keva yenar?

    ReplyDelete
  2. प्लॅन्चेट कथा क्रमश: प्रसिद्ध होत आहे. मात्र रोज एक पान पोस्ट करणं सध्या तरी शक्य होत नाही. तरीही वेळ मिळाल्यास दोन ते तीन पानं एकाच दिवशी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन.

    ReplyDelete