Wednesday, November 18, 2009

प्लॅन्चेट - पान १७

प्रतिक्रिया: 
“याला ’मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ असं म्हणतात,” डॉ. चांदोरकरांनी डोळ्यावरचा चष्मा काढत म्हटलं.

“मी ऐकून आहे याबद्दल पण डॉक्टर, रितूला हे कशामुळे झालं असावं?” राजेशने काळजीच्या सुरात विचारलं.

“तुम्ही मगाशी मला सांगितलंत की तुमच्या पत्नीचा भूतं-खेतं, जादू-टोणा यासारख्या गोष्टींवर विश्वास आहे. भितीमुळे तसले सिनेमे पहाणंसुद्धा त्या टाळतात....”

“हो ना! सारखं आजारी असल्यासारखं वाटतं, असं म्हणते ती. अचानक खुनशी वागायला लागते. अचानक ती एकदम शांत होते....”

“एक्झॅटली, मिस्टर कासले. अशा कमकुवत मन असलेल्या लोकांच्या बाबतीत कधीकधी काय होतं की त्यांनी एखादी भूताखेताची कथा ऐकलेली असते आणि आत्यंतिक भितीतून आपण ज्या गोष्टीबद्दल ऐकलेलं असतं, ती आपल्याच बाबतीत घडतेय असं त्यांना वाटत रहातं. हल्लीच रिलीज झालेला “भूलभुलैया” नावाचा चित्रपट पाहिलाय तुम्ही?”

“नाही. पण कथा माहित आहे.”

“तसंच काहीसं घडतंय तुमच्या पत्नीच्या बाबतीत. अहो इथे तर एका शरीरात दोन व्यक्तीमत्त्वांचा संघर्ष आहे, काही काही प्रकारांत तर एका शरीरात तीन-चार व्यक्ती दडलेल्या असतात!”

“अरे बापरे!”

“काळजी करू नका. अशा मानसिक विकारांतून पेशंट पूर्ण बरा होऊ शकतो. तुमच्या पत्नीच्या बाबतीत सांगायचं झालं तर.... त्यांच्याशी बोलताना मी एका गोष्टीची नोंद केली. एका विशिष्ट प्रश्नापर्यंत त्या नॉर्मल असतात. तो प्रश्न विचारला की त्या आक्रमक होतात. मग त्यांचं वागणंच बदलून जातं.

तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही नवीन जागा ज्या गावात विकत घेतलीय, तिकडे जाऊन आल्यापासून त्यांचं वागणं बदललंय. तर.... तिकडे जाऊन काही माहिती काढता येईल का? कदाचित तुम्हाला अशी माहिती मिळेल की ज्यामुळे तुमच्या पत्नीच्या वागण्यात फरक पडला.”

राजेशला ओशाळल्यागत झालं. रितूची बाजू ऐकून न घेता, त्यावर विचार न करता, तिला गावी सोडून तो मुंबईला निघून आला होता. जी गोष्ट तो सहज म्हणून सोडून देऊ पहात होता, तीच गोष्ट दुखण्याचं मूळ होती.

“खरं सांगायचं तर डॉक्टर, आम्ही गावी असताना रितूला कुणाकडे तरी त्या घराबद्दल चौकशी करायला जायचं होतं. तिला एक जुना ड्रेस सापडला होता घरात आणि त्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. पण माझा भुता-बितावर विश्वास नाही म्हणून मी त्याला नकार दिला. पण रितू माघार घ्यायला तयार नव्हती. म्हणून मीच रागाने बहिणीला घेऊन मुंबईला निघून आलो. त्यानंतर दोन दिवसांनी रितू आली. पण जेव्हा आली तेव्हा ती इतकी बदलली होती की आमच्या बोलण्यात त्या घराचा विषय निघालाच नाही. तिचं वागणं पाहूनच मी इतका अस्वस्थ होती की मला ते लक्षातच राहिलं नाही.”

“देअर यू आर, मिस्टर कासले. कदाचित तुम्ही त्यांच्याबरोबर या गोष्टीबाबत बोलला असतात, तर त्यांना काय होतंय याची तुम्हाला कल्पना आली असती. या क्षणी त्यांचा आजार अगदी पहिल्या पायरीवर आहे. आपल्याला असा काही विकार आहे, हेही त्यांना निटसं उमगलेलं नाहीये. हीच वेळ आहे त्यांच्यावर योग्य उपचार होण्याची आणि त्यासाठी आपल्याला योग्य दिशा माहित असायला हवी.”

“ठिक आहे. मी गावी जाऊन माहिती काढतो.”

“बाय द वे.... तुम्ही तुमच्या मिसेसना केव्हा पासून ओळखता?”

“जवळ-जवळ दहा ते पंधरा वर्षं झाली. आम्ही कॉलेजपासून एकत्रच आहोत.”

“त्यांना अशा प्रकारचा त्रास याआधी कधी....”

“कधीच नाही. खरंतर माझी आई गेल्यावर मला रितूचीच जास्त काळजी होती. पण तीच सर्वात जास्त खंबीर होती त्या वेळेस.”

“हं! तर मग तुम्ही माहिती काढाच.”

“ठीक आहे. पण.... एक अडचण आहे.”

“सांगा ना.”

“रितू कशी वागते, ते तुम्ही पाहिलतच. मी नसताना ती अशी वागायला लागली तर तिला कोण सावरणार?.... माझी बहीण तिच्या नियोजित पती सोबत एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी बाहेर असते. तिला अजून या प्रकाराची मी कल्पनाही दिलेली नाही. माझा मुलगा दिवसभर आयासोबत राहिल पण रात्रीचं काय?”

डॉक्टर स्मितहास्य करत राजेशकडे पहात होते.

“याचसाठी त्यांना माझ्या सॅनिटोरियममधे ठेवा असं म्हणालो होतो मी.”

राजेश खाली मान घालून म्हणाला, “आता तोच पर्याय जास्त योग्य वाटतोय मलाही.”ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

2 comments:

  1. He kramasha ka aahe??? Laukar laukar purna kara na..... :)

    ReplyDelete
  2. Swats, आपली उत्सुकता समजू शकते. संगणकाच्या पुर्नयोजनेमुळे थोडा विलंब लागत आहे.

    ReplyDelete