Friday, November 13, 2009

प्लॅन्चेट – पान १६

प्रतिक्रिया: 
रितू अजूनही अस्वस्थपणे स्वत:च्या हातरूमालाशी चाळा करत बसून होती. खरं तर डॉक्टरांचं आणि राजेशचं आत चाललेलं संभाषण तिला ऐकायचं होतं पण स्वत: डॉक्टरांनीच तिला बाहेर बसायला सांगितल्यावर तिचा नाईलाज झाला. तिचं एक मन म्हणायचं, "राजेश बाहेर आला की सांगेलच ना!", तर दुसरं मन म्हणायचं, "सांगायचंच असतं तर बाहेर कशाला जायला सांगितलं असतं?"

पंधरा मिनिटांनंतर मात्र रितूला बसून बसून कंटाळा येऊ लागला. ती उभी राहून काचेतून आत पहात डॉक्टर आणि राजेश काय बोलतायंत याचा अंदाज घेऊ लागली. तेवढ्यात राजेशला खुर्चितून उठलेलं पाहून ती पुन्हा जागेवर जाऊन बसली.

"चल, डॉक्टर बोलावतायंत."

राजेशने तिलाच आत बोलावल्यावर तिला बरं वाटलं की निदान जे काही चाललंय त्यात आपल्याला सामील करून घेतलं जातंय.

"या, मिसेस कासले. बसा. तुम्हाला मी बाहेर बसवलं म्हणून वाईट वाटलं असेल पण तुमचे मिस्टर तुमच्याबद्दल काही सांगत असताना तुम्हाला संकोचल्यासारखं वाटू नये म्हणून मला तसं करावं लागलं."

रितू त्यांच्याकडे पाहून हसल्यासारखं केलं.

“मी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर तुमची काही हरकत नाही ना?”

रितूने "नाही" म्हणताच डॉक्टरांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली.

"तुमचे मिस्टर सांगत होते की काल रात्री तुम्ही त्यांच्याशी अगदी विचित्र वागलात. तुम्हाला आठवतं ते?"

रितूने खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. तिचा हात नकळत डोक्यावरच्या जखमेवर लावलेल्या पट्टीवर गेला.

"तुम्ही जेव्हा आनंदगावला गेला होतात, तेव्हा विचित्र घटना घडल्याचं आठवतंय तुम्हाला?”

रितूने बाजूला राजेशकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा नकारार्थी मान हलवली.

डॉक्टर चांदोरकर हे निष्णात मनोविकारतज्ज्ञ होते. रितूच्या नकार देण्याच्या पद्धतीवरून रितू राजेशच्या उपस्थितीत बोलायला तयार नाहीये, हे त्यांना चटकन समजलं.

"मिस्टर कासले, डोन्ट माईंड पण आता तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा."

राजेश समजल्यासारखी मान डोलावत बाहेर निघून गेला.

"बोला, मिसेस कासले. आता तर काही प्रॉब्लेम नाही ना?" त्यांनी स्मितहास्य करीत विचारलं.

“नाही. "पण मी काय सांगू? मलाच समजत नाहीये मला काय झालंय ते. आतून खूप आजारी असल्यासारखं वाटतंय. वेगाने धावावंसं वाटत असताना कुणीतरी जबरदस्तीने आपल्याला धरून ठेवलंय असं काहीतरी फिलींग येतंय...."

रितू बोलत असताना डॉ. चांदोरकर चेहे-यावर कोणताही भाव न आणता तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होते. तिची नजर, हातवारे करण्याच्या पद्धती, बोटांच्या हालचाली याकडे त्यांचं बारीक लक्ष होतं.

“....मी नक्की असं सांगू शकत नाही..... मला अंधूकसं आठवतंय डॉक्टर.... पण स्वप्नात पाहिलेली ती बाईच माझा ताबा घेऊ पहातीय असं मला वाटतं."

“बरं. मिसेस कासले, तुम्हाला गावच्या घरात काही संशयास्पद वाटलं म्हणून तुम्ही गावातल्या एका बुजुर्ग माणसाला भेटायला गेला होतात म्हणे? तिकडे काय माहिती मिळाली हे तुम्ही सांगू शकाल?"

डॉक्टरांच्या या वाक्यासरशी रितू एकदम ताठरली. क्षणार्धात तिचा चेहेरा बदलला. डोळे आग ओकू लागले.

“तिने जेवढं सांगितलंय, तेवढंच खूप आहे तुझ्यासाठी. जास्त शहाणपणा केलास तर इथेच संपविन तुला.” ती गुरगुरत्या स्वरात म्हणाली आणि तिने टेबलावरचा पेपरवेट उचलला.

रितूच्या वागण्यात झालेला बदल पाहून डॉक्टरांनी सावध पवित्रा घेतला. खुर्चिवरून न उठता ते मागे सरकले. रितूच्या नकळत त्यांनी स्वत:च्या पायाखालचं बटण दाबलं. ताबडतोब त्यांचा असिस्टंट बाहेरून आत आला. त्याला पाहून राजेश ताडकन उठला आणि त्याच्या मागोमाग डॉक्टरांच्या केबीनमधे गेला.

“रितू...?” राजेशने तिला हाक मारली.

रितू काही न समजल्यासारखी डॉक्टरांकडे, राजेशकडे आणि असिस्टंटकडे आळीपाळीने पहात होती.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment