Saturday, November 7, 2009

प्लॅन्चेट - पान १५

प्रतिक्रिया: 
रात्रीचा दीड वाजत आला तरी राजेश अजून बिछान्यावर तळमळतच होता. दोन्ही हात डोक्याच्या मागे घेऊन तो विचार करत होता.

"गावावरून आल्यापासून रितूला काय झालंय कळत नाही.... घटकेत चांगली असते, घटकेत तिला काय होतं कुणास ठाऊक?... स्वत:शीच काहीतरी बडबडत असते.... गेल्या दोन दिवसांत तिने धड खाल्लेलं नाही.... कुणाशी धड बोलत नाही.... मनूला तर अगदी वाळीतच टाकलंय तिने.... तिला बरं नसतं तर झोपून राहिली असती.... हे तिचं वागणं काहीतरी विचित्रंच वाटतंय.... गावच्या त्या माणसाकडून काय ऐकून आलीय काय माहित.... त्यामुळेच तर ती असं वागत नसेल ना...."

विचारांच्या नादात राजेशने कूस बदलली अन्....

.... केव्हढ्यांदा दचकला तो!

रितू टक्क जागी होती आणि त्याच्याचकडे टक लावून पहात होती! तिची ती नजर पाहून राजेश मनातल्या मनात चांगलाच चरकला पण स्वत:ला सावरत तो तिच्याजवळ सरकला.

"काय गं... झोप येत नाहीये का?" त्याने काळजीने तिच्या केसांतून हात फिरवला.

रितूने नकारार्थी मान हलवली आणि त्याचा हात आपल्या गालावर ठेवून तिने डोळे मिटले.

"खूप दमल्यासारखं वाटतंय पण झोपच लागत नाहीये." तिच्या डोळ्यांतून अश्रूचा एक थेंब उशीवर पडला.

“कधी कधी होतं असं. खूप दमलो ना, तरी नाही झोप लागत. तू डोळे मिटून पडून रहा, मी तुला थोपटतो म्हणजे बरं झोप लागेल तुला.”

राजेशने तिच्या खांद्यावर थोपटायला सुरूवात केली. रितूने पुन्हा त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या दिशेने ओढलं. तिचा उद्देश ओळखून राजेशने रितूला मिठीत घेतलं. तिच्या पाठीवरून हात फिरवता फिरवता राजेशच्या लक्षात आलं की रितूचे शरीर बर्फासारखं थंडगार पडलंय. तिला याबाबत विचारावं म्हणून राजेशने मिठी सोडवली. पण रितू मात्र निराळ्याच मन:स्थितीत होती. तिने आवेगाने राजेशचं चुंबन घेण्यास सुरूवात केली. चुंबनाच्या धुंदीत राजेशलाही आपल्या प्रश्नाचा विसर पडला. दोन-तीन क्षणांनंतर त्याला जाणवलं की काहीतरी निराळं घडतंय. चुंबनाचा हा आवेग रितूचा नाही. त्याने खाड्कन डोळे उघडले.

चुंबन घेता घेता रितू पांढ-या फटफटीत डोळ्यांनी त्याच्याकडे पहात होती. राजेशने दचकून रितूला मागे लोटलं. तशी ती अचकट विचकट हसत त्याच्या जवळ आली.

"तुझ्या रितूपेक्षा माझ्या बरोबर जास्त सुखी होशील तू..." तिने भेसूर हसत म्हटलं.

"क्.... क्.... कोण आहेस तू?" राजेशने मागे सरकत विचारलं. त्याला भितीही वाटत होती आणि आश्चर्यही! ’रितू’ अस्खलीत इंग्रजीत बोलत होती.

"कोण म्हणजे? रितू! तुझी रितू..." तिने हसत हसत उत्तर दिलं.

राजेश धडपडत बिछान्यावरून उतरला आणि टेबललॅम्पच्या दिशेने सरकला. एका हाताने त्याने टेबललॅम्प घट्ट धरून ठेवला होता.

"नाही.... नाही.... तू रितू नाहीस.... तू रितू नाहीस...."

"मग कोण आहे मी? सांग ना तूच. अरे हे बघ ना, माझे हात, माझं शरीर सगळं रितूचंच आहे." ती जवळ येत चालली होती.

"नाही....रितूच्या रूपात तू कुणीतरी.... नाही..... मी तुला सोडणार नाही...." बोलता बोलता राजेशने टेबललॅम्प उचलला.

"सोडणार नाहीस?" ती पुन्हा दात विचकून हसली. "तेच तर हवंय मला. मी तुझ्याबरोबर कायम रहायला...."

तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच राजेशने हातातला टेबललॅम्प तिच्या तोंडावर मारला. ती खाली वाकली. चेहे-यावर रक्ताचा ओघळ वहात असल्याने तिचा चेहेरा आणखीनच भयाण दिसत होता. राजेश तिच्यावर आणखी एक वार करणार इतक्यात ती रडू लागली.

"राज, प्लीज मला मारू नकोस.... प्लीज..."

राजेशने तिच्याकडे निरखून पाहिलं. रितूचे डोळे आता पूर्ववत झाले होते. त्याने हातातला टेबललॅम्प टाकून दिला आणि रितूला जवळ घेतलं.

"रितू?.... रितू.... आय अॅम सॉरी..... आय अॅम रियली सॉरी...."ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment