Friday, November 6, 2009

'गैर' पहाण्यात काहीच गैर नाही

प्रतिक्रिया: 

क्या बात है यार! मराठी रहस्यप्रधान चित्रपटांबद्दल अपेक्षा उंचावणारा चित्रपट म्हणजे ’गैर’. मराठीतही असा सस्पेन्स थ्रिलर असू शकतो यावर विश्वासच बसत नाही. उत्कृष्ट कथेला तितक्याच ताकदीच्या दिग्दर्शनाची व निर्मितीची जोड असेल तर मराठी चित्रपटात काय घडू शकतं हे तुम्ही गैर मधे पहाच! चित्रपट पहात असताना, ’अरे हे काय दाखवलंय, असं का.... असं का नाही, हे पटत नाही’, असे बरेच प्रश्‍न तुमच्या मनात येतील पण.... त्या सर्व प्रश्नांना चित्रपटाच्या अखेरपर्यंत थोपवून धरा.

सतीश राजवाडे हे उत्तम दिग्दर्शक आहेत, हे त्यांनी यापूर्वीच सिद्ध केलेलं आहे. गैर चित्रपटातील त्यांच्या खास ’टच’ मुळे चित्रपटाला सुंदर गती लाभली आहे. उत्सुकता शेवटपर्यंत ताणून ठेवण्यात 'गैर' यशस्वी ठरला आहे. चित्रपटात निर्माते संजय घोडावत यांच्या दिमाखदार कार्स वापरल्या असल्या तरी त्यांचं कुठेही अवाजवी प्रदर्शन नाही. अगदी चॉपरचा (म्हणजे आपलं हेलिकॉप्टर हो!) वापरही मोजकाच पण नेमक्या वेळेस केलेला आहे. तरीही चित्रपटाला ग्लॅमरस व फ्रेश लूक देण्यात निर्माता व दिग्दर्शक दोघेही यशस्वी ठरले आहेत. सतीश राजवाड्यांना तरूण पिढीची ’नॅक’ सापडली आहे.

Gair (2009) - Marathi Suspense Thriller


या चित्रपटात गाणी आहेत पण ती आवश्यक तिथेच येतात. प्रसंगानुसार संगीतबद्ध केलेली गाणी आपल्याला चित्रपटात गुंतवून ठेवतात. संदिप कुलकर्णी व अमृता खानविलकरवर चित्रीत केलेलं चित्रपटातील सर्वात पहिलं गाणं वातावरणातील गूढपणा आणखीनच गडद करतं. त्यात बराचसा सहभाग ’हरिहरन’ यांच्या आवाजाचा आहे. संदिप कुलकर्णी हे उत्तम अभिनेता म्हणून ओळखले जात असले, तरी त्यांना नाचगाणं करताना कुणी पाहिलं असेल असं वाटत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि देहबोलीला अनुसरून त्यांना दिलेल्या नृत्याच्या ’स्टेप्स’ नृत्यदिग्दर्शकाचा अनुभव व कसब दर्शवतात. अभिनयाचं म्हणाल तर, सर्वच कलाकारांनी आपापलं काम चोख केलं आहे. शेवट नीट पाहिलात तर हे वाक्य जास्त पटेल.

हिंदी चित्रपट निर्मात्यांनी गैर पाहिल्यानंतर आपला मोहरा मराठी चित्रपटांच्या दिशेने वळवला तर त्याचं नवल वाटायला नको. मुंबई पोलिसांनी संजय घोडावत यांनी निर्मित केलेला ’जेल’ पाहिलाच आहे. त्यांचीच निर्मिती असलेला ’गैर’ही अवश्य पहावा. आणखीही बरंच काही लिहायचं होतं पण लिहीता लिहीता रहस्यभेद नको व्हायला. इतकंच सांगेन, गैर पहाण्यात काहीच गैर नाही.


हेही वाचून पहा:

अब तक बच्चनच

सिनेमॅटीक लिबर्टी की नो कॉमनसेन्स?

11 comments:

 1. गणेश म्हणतात त्याप्रमाणे कॉमेडी आणि मेलोड्रामा सोडून व्यावसायिक मराठी सिनेमा नाही बनत, सस्पेन्स थ्रिलर तर जवळपास दुर्मिळच.
  सतीश राजवाडे यांच्याकडून अपेक्षा तर आहेतच, सिनेमा पाहायलाच हवा! धन्यवाद.

  ReplyDelete
 2. Anand, सतिश राजवाडेंना चित्रपटाची कथा आणि मालिकेची कथा यातील फरक समजला आहे. मराठी चित्रपटांनी आपली चाकोरी सोडून निराळ्या दिशेने सुरू केलेली वाटचाल नक्कीच यशस्वी होईल. गणेश मतकरींची चित्रपट समिक्षा मीदेखील वाचते. त्यांच्या लेखनामुळे मला बरेच चांगले चित्रपट पहाता आले. आपलाही कॅनव्हास नावाचा ब्लॉग आहे तो पाहिला. लवकरच त्यावरील लेखनही वाचेन.

  ReplyDelete
 3. मी देखील गणेश मतकरींच्या ब्लॉग वरूनच चित्रपटाची लिस्ट घेत असतो आणि मग पाहत असतो. चित्रपट परीक्षण लिहिण्याच्या बाबतीत मात्र आम्ही करंटे आहोत, माझ्या ब्लॉग वर फक्त सिनेमा पहिल्याच्या नोंदी असतात, बाकी विशेष काही नाही.
  अजून जर एखादी वेब साईट किंवा ब्लॉग माहित असेल चित्रपट विषयक तर जरूर कळवा. तसे लोकप्रभा मध्ये सुद्धा चित्ररंग मध्ये माहिती येत असते, ती देखील उत्तम आहे.

  ReplyDelete
 4. गणेश मतकरी सिनेमाची टॉप टू बॉटम समिक्षा लिहितात. मुख्य म्हणजे हा सिनेमा पहा असं ते कधीही सांगत नाहीत पण तरीही आपल्याला सिनेमा पहावासा वाटतो. मला स्वत:ला फार चांगलं समिक्षण करता येतं असं वाटत नाही म्हणूनच मीही वर्तमानपत्रातील समिक्षा वाचते. मतकरींच्या ब्लॉगशिवाय ’नस्ती उठाठेव’ या ब्लॉगवर तुम्हाला टवाळकी शिणूमाची... या लेबलखाली सिनेमाची समिक्षण वाचायला मिळतील.

  ReplyDelete
 5. आधिच सांगितलं की हा सस्पेन्स सिनेमा आहे, तेंव्हा मला वाटलं की तुम्ही हा स्पॉयलर पोस्ट ( म्हणजे आधीच शेवट लिहुन टाकायचा) टाकता काय म्हणुन. जसे गुमनाम मधे खुनी कोण हे आधिच समजलं तर?? तसं मी कांही फार जास्त सिनेमा पहात नाही, पण जर एखाद्या गोष्टीचा शेवट आधी समजला की उगिच वाईट वाटत रहातं.. की जर शेवट माहिती नसता, तर पाहिला असता म्हणुन..
  आता नक्की पाहिन हा सिनेमा.. :)

  ReplyDelete
 6. नाही महेंद्रजी, तसं करणं चांगल्या चित्रपटाला नजर लावणं आणि माझ्यासारख्या फिल्लम्बाजाने स्वत:शी केलेली प्रतारणा ठरली असती. मी स्वत: नाट्य, सिनेक्षेत्र जवळून पाहिलं आहे. चित्रपट चालो अथवा न चालो... त्यासाठी हेल्पर पासून ते अभिनेत्यापर्यंत सर्वच किती ढोरमेहनत करतात, ते मी पाहिलं आहे. शेवट सांगून टाकणं म्हणजे या सगळ्याशीच बेईमानी ठरली असती. माझी इच्छा आहे की तमाम मराठी जनांनी आणि मराठी चित्रपट म्हणजे ’तमाशा’ असं म्हणून नाकं मुरडणा-या मराठेतर जनांनी हा चित्रपट आवर्जून पहावा.

  ReplyDelete
 7. नमस्कार
  मी इथे पहिल्यांदाच आलो आहे .
  तुमच्या ब्लॉग चा लूक खूपच आवडला .

  looking fwd to explore this blog more..

  ReplyDelete
 8. अमोल, आपल्या प्रशंसोत्गारांबद्दल आभारी आहे. पुन्हा अवश्य भेट द्या व ब्लॉगवर उपलब्ध असलेल्या कथा आणि कविता वाचून प्रतिक्रिया कळवा.

  ReplyDelete
 9. या लेखाला ’मायबोली’ या संकेतस्थळावरही अभिप्राय मिळाले.

  ReplyDelete
 10. मजा माहित आहे गैर बद्द्ल काहीच माहित नसतानाही तो पाहायचा असं ठरवलं आहे आणि आता तर तो रहस्यप्रधान आहे म्हटल्यावर पाहिनच..तसंही चित्रपट पाहाणं परदेशात देशी काही पाहायचं म्हणूनही पाहिले जातात पण मग त्यात चांगले मिळाले की बरं वाटतं..आता हा suspense म्हटलं म्हणजे पाहायला नक्कीच मजा येईल...इतक्यात "सावरखेड एक गाव पाहिला" आणि तोही आवडला पण इतकं मोजकं चित्रपटांबद्द्ल लिहिता नाही येत...ही पोस्ट मस्त झालीय आटोपशीर आणि गैरबद्द्ल उत्कंठा वाढवणारी..आता फ़क्त कधी मुहुर्त येतो ते पाहायचं.....

  ReplyDelete
 11. अपर्णा,
  तांत्रिकदृष्ट्याही मला हा चित्रपट परिपूर्ण वाटला. रहस्यप्रधान चित्रपटांमधे रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवणं महत्त्वाचं. त्यामुळेच मी पोस्ट लिहितानाही रहस्य फुटणार नाही याची काळजी घेतली. तूही हा चित्रपट पाहण्याआधी कथा माहित करून घेऊ नकोस. कथा हीच खरी चित्रपटाची गंमद आहे. मराठीमधील गैरच्या आधीचे रहस्यप्रधान चित्रपट आणि गैर यांची तुलना केली तर गैर निश्चितच सरस आहे. सावरखेडही सुरेख रहस्यप्रधान चित्रपट होता पण तो खूप लांबल्यासारखा वाटला. गैर बघण्याचा मुहूर्त लवकर काढ.

  ReplyDelete