Saturday, October 31, 2009

सिरियल किलर

प्रतिक्रिया: 
काही दिवसांपूर्वी शमिता नावाच्या माझ्या मैत्रीणीचा सकाळी अकरा-साडेअकराच्या सुमाराला फोन आला. तिच्या स्वरावरून खूप डिप्रेस वाटत होती. म्हणाली, "थोडावेळ तुझ्याकडे येऊ का गं"?. म्हटलं, "ये, त्यात विचारायचं काय?" शमिता तशी बिनधास्त मुलगी. रोखठोक बोलणं पण मनाने एकदम स्वच्छ. आज अचानक परवानगी घेऊन माझ्या घरी येण्याची हिला का गरज भासली, मला कळेचना.

अखेर आली. लेकाला सोबत घेऊन आली म्हणून मीही खूष झाले. मी दरवाजा उघडल्यावर दारातूनच मान आत घालून इकडे तिकडे पाहिलं नि मग म्हणाली, "थॅंक गॉड!" ती कशाला ’थॅंक गॉड’ म्हणाली, ते मलाही समजलं नाही पण आलीय म्हणजे बोलणार आहे, हे निश्चित होतं म्हणून मी काही प्रश्न विचारले नाहीत.

सरबताचा दुसरा घोट घेताना तिने घडाघडा बोलायला सुरूवात केली. तिने जे काही सांगितलं ते, जर म्हटलं तर काहीच नव्हतं. अगदी चेष्टेवारीसुद्धा नेता आलं असतं. म्हटलं तर खूप गंभीर होतं. आजच्या महाराष्ट्र टाईम्समधील ’शंभर धागे दु:खाचे’ या लेखावरून मला त्याची कल्पना आली.

शमिता नाही, शमिताच्या सासूबाई संध्याकाळी सात वाजता टी.व्ही. वरील मालिका पहाण्यास सुरूवात करतात ते रात्री अकरा पर्यंत त्यांच्या ’बॅक टू बॅक’ मालिकांचा अत्याचार सुरूच असतो. त्यांच्या या मालिका प्रेमावर शमिता जाम म्हणजे जाम वैतागली होती.

"खरं सागते, एक वेळ त्यांनी माझा सासू म्हणून छळ केला असता, तर परवडलं असतं मला पण ह्या मालिका नकोशा वाटतात गं." शमिताच्या चेहे-यावर वैतागल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.

"तुला माहितेय, दिवसभरात कितीतरी गोष्टी विसरतात त्या पण संध्याकाळी सात वाजता त्या टि.व्ही. लावायला आजपर्यंत विसरलेल्या नाहीत. मी इकडे देवापुढे दिवा लावत असते आणि तिकडे त्यांची सिरीयल सुरु होते. इकडे मी सोहमसोबत ’शुभं करोति’ म्हणत असते आणि तिकडे हॉलमधे त्यांच्या कुठल्या ना कुठल्या सिरियलमधे काही तरी वाईट घडलेलं असतं. मग रडारड सुरू होते. दर दोन मिनिटांनी एक आलाप आळवला जातो. मला तर सिरियलमधील त्या आलापाच्या आवाजावरून आता या वेळी कोणती सिरियल सुरू आहे, हे समजतं. कधी कधी तर हे मालिकेचं संगीत आहे की कुत्र्याचं रडणं, यातला फरक कळेनासा होईल, इतपत हा आलाप आळवला जातो आणि हा अत्याचार रात्री अकरा पर्यंत सुरूच असतो."

मला हसू आवरलं नाही पण तिची समस्या गंभीर होती. तिला म्हटलं, "शमे, तुला बोलायला खूप लागतं ना? इतकं आहे, तर जरा सासूबाईंसोबत बोलत जा की. मुद्दाम आपल्या कुकींग टिप्स विचारायच्या. स्वयंपाक करता करता एखादी गोष्ट त्यांना विचारायची. इतक्या वर्षांनीही सुनेला आपला सल्ला लागतो, हे पाहून सासू म्हणून त्यांनाही बरं वाटेल. तू घरात असून त्यांच्याशी बोलत नसशील तर त्या तरी बिचा-या कशात मन गुंतवणार गं?"

"तुला काय वाटतं, मी हे सगळं करून पाहिलं नसेल? अगं, त्यांच्या मालिका सुरू असताना त्यांना नुसती हाक मारली तर त्या वैतागतात. अशा टिप्स विचारायला गेले तर काय होईल कुणास ठाऊक? परवा त्यांची भाची आली होती घरी, त्यांना भेटायला. ह्या तिच्याशी मोजकंच बोलल्या. का, तर म्हणे, "तिच्याशी बोलत बसले असते, तर ’जनम-जनम’ च्या भागात शेवटी काय होतं ते कळलं नसतं. बरं एकदा शेवट बघून भागत नाही. दुस-या दिवशी सकाळी या सगळ्या सिरियल्सचं पुर्नप्रक्षेपण होतं, तेही त्यांना पहायचं असतं. मगाशी तुझ्या घरात आले तेव्हा टी.व्ही. सुरू नाही हे पाहून बरं वाटलं."

तिच्या ’थॅंक गॉड’चा अर्थ मला आत्ता कळला.

"मग असं कर, तूही सासूबाईंसोबत मालिका पहायला बसत जा...." शमिताच्या चेहे-यावर असे काही भाव आले की मी वाक्य अर्धवटच सोडून दिलं.

"बाई गं. मालिकेत पहाण्यासारखं काही असतं तर मी एकतरी मालिका पाहिली असती. दोन दिवस मी त्यांच्यासोबत मालिका पहायला बसले. सासूबाई खरंच खुष झाल्या होत्या पण खरं सांगते, त्या पहात असलेल्या एकाही मालिकेत मला काहीही विशेष आढळलं नाही. त्याच त्या गडद मेक-अप केलेल्या बायका, तेच ते प्रसंग आणि तीच ती रडारड.

परागच्या वागण्यावरसुद्धा याचा खूप परिणाम झालाय गं. पूर्वी साडेसातच्या ठोक्याला घरी येणारा पराग आता रात्री नऊ वाजले, तरी ऑफिसमधेच असतो. रात्री अकरा ही त्याची घरी येण्याची बदललेली वेळ आहे. त्याला विचारलं, "हल्ली खूप काम असतं का ऑफीसात?" तर म्हणाला, "ऑफिसच्या कामाचं टेन्शन परवडतं पण संध्याकाळी घरात आल्यावर हे जे अभद्र रडगाणं ऐकावं लागतं, त्यापेक्षा ऑफिसमधे चांगला वेळ कटतो. परागने त्याच्यासाठी मार्ग शोधून काढला. मी काय करू गं?" शमिताच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते.

मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं, "शमू, तू एकदा सासूबाईंशीच याबाबत बोलून बघ ना!. त्यांना समजावून सांग. त्यांना म्हणावं, सोहमशी खेळत चला थोडावेळ."

शमिताचा चेहेरा खूप केविलवाणा झाला होता.

"काही बोलायची सोय उरली नाहीये, गं. मागच्या आठवड्यात परागच त्यांच्याशी बोलला. बोलला कसला माय-लेकाचं भांडणच झालं! सासूबाई त्याला जे काही म्हणाल्या, त्यावरून त्या या सिरियल्सच्या किती आहारी गेल्यात याची मला आणि परागला कल्पना आली. परागने तर हातच जोडलेत त्यांच्यापुढे"

"का गं? काय झालं?"

"आयुष्याचा जोडीदार निघून गेला की आपल्याला जोडे खावे लागतात .... असलं काहीतरी डायलॉगवजा भंपक उत्तर दिलं त्यांनी आणि सिरियलमधल्या बायका जशा तरातरा आपल्या खोलीत निघून जातात तशाच त्या निघून गेल्या. तुला विश्‍वास बसणार नाही, त्यांचा तो डायलॉग मी आदल्याच दिवशी ’सोबत ही सात जन्मांची’ या सिरियलमधे ऐकला होता. त्या प्रसंगापासून त्या परागशी बोलतच नाहीयेत."

शमितावर अविश्‍वास दाखवण्याचा प्रश्‍नच नव्हता. तिच्या सासूबाईंबद्दल तिला किती आदर आहे, हे मला माहित होतं. प्रेमाला घरून विरोध झाला म्हणून पराग-शमिताने पळून जाऊन लग्न केलं पण परागच्या आईने म्हणजे शमिताच्या सासूबाईंनी कायम शमिताची बाजू घेतली. तिला आपल्या मुलीसारखी वागणूक दिली. त्या माऊलीबाबात शमिताला कळकळ वाटत होती. त्यांना ह्या मालिकेच्या दुष्टचक्रातून कसं सोडवावं, हे तिला कळत नव्हतं म्हणून बेजार झाली होती ती. तिला काही मदत करता येत नाही म्हणून मलाही वाईट वाटलं. थोडावेळ बसून ती निघून गेली. मी विचार करत होते.

पूर्वी रामन राघव सारख्या माणसाने निरपराध लोकांच्या खुनांचं सत्रं आरंभलं होतं म्हणून त्याला ’सिरियल किलर’ म्हणायचे. आता ह्या टी.व्ही. वरच्या सिरियल्सच आपल्या किलर झाल्यात. सिरियलमधल्या कुटुंबांमधे काय होतं ह्याची इतकी काळजी लागून रहाते की आपल्या कुटुंबात काय चाललंय याचा विसर पडतो. सिरियलचं दु:ख आपलं होतं आणि त्या दु:खाला कुरवाळत आपण आपल्याच माणसांना किती दुखावतोय, किती दुरावतोय हे लक्षातच येत नाही.

मनात हा विचार चालू असतानाच मला आईची आठवण झाली. बरेच दिवसात फोन केला नव्हता तिला. तिच्याकडे आता मोबाईल असल्यामुळे तिला कुठेही फोन करता येतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा!

"हॅलो, आई?"

"हं! कशी आहेस गं? ब-याच दिवसात फोन नाही."

"ठीक आहे. जरा कामात अडकले होते गं आई. तू कशी आहेस?"

"मी पण ठीक आहे. ए.... मी तुला पंधरा मिनिटांनी फोन करू का?"

"बिझी आहेस का?"

"नाही पण.... अगं टी.व्ही. वर ’ताईची माया’ सुरू आहे. कालचा भाग पहाता नाही आला मला...."

मी "बरं" म्हणून हसत हसत फोन बंद केला. काय बोलणार?

कालची गोष्ट, सासूबाई ब-याच दिवसांनी घरी आल्या म्हणून त्यांच्या आवडीचा स्वयंपाक केला. सर्वजण जेवायला बसलो तश्या सासूबाई आपली प्लेट घेऊन हॉलमधे गेल्या. सगळेच अवाक् होऊन त्यांच्याकडे पहात राहिले. त्यांच्याही ते लक्षात आलं. तशी ओशाळं हसून म्हणाल्या, ’परदेसी पिया’ ही माझी आवडती सिरियल आहे, एकही भाग चुकवलेला नाही ना म्हणून..."

सगळ्यांनी मुकाट जेवायला सुरूवात केली.

जेवण झाल्यावर पाहिलं तर सासूबाई आता ’अनोखा बंधन’ नावाची सिरियल पहात होत्या. शमिताचा प्रसंग काही डोक्यातून जात नव्हता म्हणून मीही कौतुकाने डोकावून पाहिलं की असं काय असेल ह्या सिरियल मधे की सासूबाई आमच्याबरोबर जेवायचं सोडून टी.व्ही. समोर जाऊन बसल्या. छान प्रसंग होता - एक सासू आपल्या सुनेच्या माहेरी जाते आणि सुनेच्या माहेरच्यांना अद्वातद्वा बोलून सुनेकडून दागिने मागून घेते. सिरियलमधील आई आणि सून दोघी रडत असतात आणि सुनेची भावजय सुनेकडे पाहून कुत्सित हसत असते.

सासूबाई सिरियलमधे चांगल्याच रंगल्या होत्या. मी माझी कामं आटोपण्यासाठी वळले आणि सासूबाईंचा मागून प्रश्‍न आला, "काय गं, ह्या सिरियलमधल्या सासूसारखी सासू तुला मिळाली असती, तर तू काय केलं असतंस?"

मला उत्तरच सुचलं नाही. मला समर्थांच्या ओळी आठवल्या, "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे."


टीप: प्रस्तुत कथेतील प्रसंग शंभर टक्के खरे आहेत
फक्त कथायोजनेसाठी प्रसंगातील पात्रांची व मालिकांची नावे बदलली आहेत. या कथेतील ’मी’ ही व्यक्तिरेखा म्हणजे लेखिका नाही. जिच्या नजरेतून ही कथा लिहीली आहे, ती ही व्यक्तीरेखा आहे.

11 comments:

 1. "सिरीयल किलर" नाव वाचून वेगळ्या अपेक्षेने वाचायला गेलो. वाचल्यानंतर कॉलेजचे दिवस आठवले. तेंव्हा मी देखील परागसारखा उगाचच उशिरा यायचो. कारण तेंव्हा "चार दिवस सासुचे" Peakला होते. आत्ता आत्ता दिवाळीला घरी गेलो तेंव्हा देखील सासू अजूनही ताठ दिसली. सुना मात्र थकलेल्या दिसल्या. सध्या एकटा राहतो त्यामुळे मला पाहिजे तेंव्हा पाहिजे ते पाहु शकतो. सुख आहे. लग्नानंतर हे झेलावं लागेल कदाचित.

  ReplyDelete
 2. माझी बायको तर सासू व्हायच्या अगोदर पासूनच या मालिका बघते आहे. काही उपाय सुचला तर मलाही कळवा :)

  ReplyDelete
 3. :-(
  agadi gharogharichi kahaNi zali ahe hi. bayaka TV serials chya premaat padatat, ani vyasan kasale paTkan laagate.

  jya mitrasobat amhi serials kasalya bhampak asatat mhanun hasanyavari gappa marayacho, parava tyane ani tyachya bayako ne amhala "karol bagh 12/24" serial pahayala lavali, hi serial nehemi sarakhi nahiye mhane, changali ahe. mala tari kahi vegali nahi vatali ti serial, pan to mitr ani tyachi bayko virodhi pakshala saamil zalyache feeling ale.

  bhaaratat milatat ki nahi ajun mahit nahi, pan ithe bluetooth connected wireless headphone miLatat. tuzya maitrini chya sasu la te gheun deta yeil. mhanje TV chya audio-out la te chhote device lavayache, ani wireless headphone ne tyanni awaj aikayacha.

  baki problem nahi solve hou shakat, pan maitrini chya gharatale dwani-pradooshaN tari kami hoil, sasu la na dukhavata.

  ReplyDelete
 4. सिद्धार्थ, लग्नासाठी मुलगी पहातानाच ’अट’ घाल म्हणजे तुझं सुख अबाधित राहील आणि भविष्यही. मी देखील काही काळ एकटी रहात होते, त्यावेळेस ’न जाणो, हे सिरियलचं व्यसन आपल्याला लागलं तर?’ या भितीपोटी मी टी.व्ही. घेतलाच नाही. आजदेखील माझ्या घरात मी टी.व्ही. पहाते तो नॅट जिओ, डिस्कव्हरी दाखवल्या जाणा-या कार्यक्रमांसाठी.

  ReplyDelete
 5. Pravin, मालिका पहाणा-यांत सर्व वयाच्या व्यक्तींचा भरणा आहे. पूर्वी मालिका पहाणं ही मला बायकांची मक्तेदारी वाटत होती. जेव्हा दोन वयस्क काकांना ’मिहीर जिवंत होईल का?’ ची चर्चा करताना पाहिलं, तेव्हा कपाळावर हात मारून घेतला. यावर उपाय एकच -’रिमोट आपल्या हातात असतो.’ दहा रुपयांची भाजीची जुडी घेताना आपण ती आतून बाहेरून पारखून घेतो, तर सिरियलची कुवत पहिल्या दहा भागांत कळल्यावर ती पहायचीच कशाला?

  ReplyDelete
 6. सर्किट, मला वाटतं तसे ब्ल्यूटूथ हेडफोन भारतातही मिळतात. सर्वांच्या कानावर अत्याचार होण्यापेक्षा ज्याला हवा आहे, त्याने अत्याचार सहन करण्यासाठी हा उपाय चांगला आहे पण सिरियल ऍडिक्टेड लोकांसमोर हा पर्याय ठेवताना आधी खूप विचार करावा लागेल. त्यांच्यावर जर सिरियलचा अंमल असेल, तर या पर्यायावर सिरियलमधलं उत्तर न मिळो म्हणजे मिळवलं.

  सिरियल पहाणं चूक आहे, असं मला वाटत नाही मात्र त्यात किती गुंतून पडायचं हे मात्र आपल्या हाती नक्की आहे.

  ReplyDelete
 7. या लेखाला मायबोलीमनोगत या संकेतस्थळांवरही अभिप्राय प्राप्त झाले.

  ReplyDelete
 8. नशिब म्हणावे तिच्या सासुबाई सिरीयल्स बघतात.

  येथे तर नवराबायकोची महिने नी महिने गाढ्भॆट, बोलणे चालणे नाही.

  मधेच ती काय बोलायला लागली तर त्यांचा संदर्भ लागता लागत नाही, नंतर मग लक्षात येते बायको कोणत्यातरी सिरीरल बद्दल बोलत आहे

  ReplyDelete
 9. हरेकृष्णजी, वाचून सुरूवातीला हसू आले पण या समस्येवर काहीतरी उपाय निघायलाच हवा. खोटं इतकं खरं वाटायला लागलंय की खरं काय असतं हेही आपण विसरत चाललोय. घराघरांत ही परिस्थिती आहे. ’कहानी घर घर की’ नावाची एक मालिका होती, जी सुरूवातीच्या काही भागांपर्यंत खूप छान होती. मग तीही टिपिकल सास-बहू टाईप मालिका झाली. वास्तविक पहाता, सिरियल दाखवताना स्वातंत्र्य म्हणून १०-१५ वर्षांपूर्वीचा काळ एकदम पुढे सरकवला जातो पण सिरियलमधील व्यक्तिरेखा तशाच तरूण दिसतात, हे न पटणारं आहे, हे कळत असूनही सिरियल पहाण्याचा हव्यास धरणारी लोकं आहेत. या सिरियल तर ’जनरल’ आहेत पण ’पौराणिक’ कथा किंवा ’ऐतिहासिक कथां’वर बेतलेल्या मालिकाही कधी कधी अतिरेकी दृश्य दाखवतात तेव्हा हताश व्हायला होते.

  ReplyDelete
 10. खरच ह्या सिरीअल ने अगदी वैताग आणलाय. काही बोलायची सोयच नाही आपल्याला. काही बोलायचे असते पण सिरीअल आडवी येते. खर तर माझ्याकडे अनेक मुलांची उदाहरणे आहेत जी फक्त खरी सिरीअल बघतात म्हणून घरी जाणून बुजून लेत जातात. आणि घरच्यांशी बोलत पण नाही.

  ReplyDelete
 11. ISPER EK UPAY HAI IDOT BOX BECH DO
  AND ONLY LISTING SONG
  THANK YOU

  ReplyDelete