Friday, October 30, 2009

प्लॅन्चेट - पान १४

प्रतिक्रिया: 
रितूला पुढे येताना पाहून त्या स्त्रीने मनुच्या गळ्याला धरून त्याला एका हातावर अधांतरी लोंबकळतं उभं केलं. रितूने पुढे उचललेलं पाऊल मागे घेतलं आणि ती ढसाढसा रडू लागली. मनूचे डोळे अजूनही मिटलेलेच होते. त्याला काही कळत होतं की नाही कुणास ठाऊक पण रितूला त्याची ती अवस्था पहावत नव्हती. उभं रहाण्याचे त्राण तिच्या पायात उरले नाहीत. ती खाली कोसळली.

"तुला काय हवं असेल ते देईन मी. माझा मनू.... माझा मनू...." हातातील मेणबत्ती टाकून रितूने त्या स्त्रीच्या समोर हात जोडले.

ती स्त्री रितूकडे पाहून खदाखदा हसू लागली. एका हातात लोंबकळत ठेवलेल्या मनूला तिने धाडकन जमिनीवर सोडून दिलं. रितूच्या तोंडून अस्फूट किंकाळी बाहेर पडली. ती धडपडत मनूजवळ जात असतानाच ती स्त्री, मनू आणि रितूच्या मधे येऊन उभी राहिली. रितू मान उंचावून तिच्याकडे पहात होती.

बुब्बुळं नसलेले आपले पांढरे डोळे रितूवर रोखून ती स्त्री मंद स्मित करत होती. हळूहळू रितूच्या चेहे-यावरले सर्व भाव विरले. निर्विकारपणे उभं राहून तिने आपली नजर त्या स्त्रीच्या नजरेत मिसळली. रितूच्या चेहे-यावरही तसंच स्मितहास्य उमटलं.

हळूहळू त्या स्त्रीची आकृती नष्ट होऊ लागली. रितूने डोळे मिटून घेतले आणि ति निश्चल उभी राहिली. काही क्षणांनंतर रितूने खाडकन डोळे उघडले. रितूचे डोळे आता तसेच पांढरेफटक दिसत होते. खाली पडलेल्या मनूकडे तिने निर्विकार नजरेने पाहिलं. त्याला एका हाताने फरफटत आणून तिने बेडरूममधल्या पलंगावर झोपवलं आणि स्वत:ही त्याच्या बाजूला झोपी गेली.

*****

रितूला सकाळी उशीराच जाग आली. उठल्यावर तिने सर्वात आधी टेबलावरच्या घड्याळात पाहिलं. साडेदहा वाजले होते.

"अं...? इतका उशीर?" रितूने मनूकडे नजर टाकली. मनूदेखील अजून गाढ झोपेत होता. त्याला आणखी थोडा वेळ झोपू द्यावं असा ती विचार करत असतानाच तिचा टेबलावर ठेवलेला मोबाईल वाजला. रिंगटोनवरूनच तिने ओळखलं की हा राजेशचा फोन आहे.

"हां रितू .... आज येतेयंस ना?"

"हो, हो."

"मनू काय करतोय?"

"झोपलाय."

"झोपू देत त्याला. तू तिथून निघालीस की मला फोन कर म्हणजे मला अंदाज राहील तुझ्या पोहोचण्याचा. मी स्टेशनवर येतो, तुला पिक-अप करायला.”

“ओ.के." रितूने हसत उत्तर दिलं.

"आणखी काय? झालं का तुमचं शोधकार्य पूर्ण?"

ते वाक्य ऐकताक्षणी रितूच्या चेहे-यावरचं हसू मावळलं. तिचा चेहेरा एकदम दगडी झाला.

"चल, फोन ठेवते मी.... घरी आले की बोलू..."

"रितू? हॅ..... हॅलो रितू....?"

तिकडे राजेश विचारात पडला होता. “आपण असा काय प्रश्न विचारला की रितूने इतक्या रागात फोन बंद केला…. नाही.... राग नसेल, कदाचित मनू उठला असेल.... मनूची खूप काळजी असते तिला.....”ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

2 comments:

  1. katha ekdum pakad ghenari aahe......pudhche bhag kadhi post karnar.........

    ReplyDelete
  2. अदि, पुढचे भाग येत्या दोन-तीन दिवसात पोस्ट करतेय. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

    ReplyDelete