Monday, October 26, 2009

प्लॅन्चेट - पान १३

प्रतिक्रिया: 
हॉलमधे पाऊल ठेवल्याक्षणी रितूला रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला.

"अच्छा, म्हणजे ह्या बाजूने आवाज येतोय तर!"

रितू घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने वळली. जेमतेम पाच-सहा पावलं ती चालून गेली असेल आणि तिच्या लक्षात आलं की हा आवाज बाहेरून नाही, घरातूनच कुठूनतरी येतोय! हातापायावरून वारं गेल्यासारखं वाटलं तिला. हातातील मेणबत्ती थरथरू लागली. तिला मागं वळायचंही सुचेना. तेवढ्यात कुणीतरी तिला नाजूक आवाजात हाक मारली.

"रितू....? रिऽतू...."

तो आवाज ऐकून रितू जागच्या जागी गारठली. भितीने आपलं हृदय बंद पडणार की काय असं तिला वाटू लागलं. आवाजाचा उगम शोधण्याचा विचार मनातून काढून टाकत रितू पुन्हा बेडरुमच्या दाराशी आली. बाहेर लावून घेतलेला दरवाजा तिने आत लोटला पण दरवाजा उघडला नाही. तिने पुन्हा दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आतून बंद झाला होता. रितूने दारावर धडका देऊन, लाथा मारुन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही.... आणि अचानक तिच्या लक्षात आलं की 'इतक्या आवाजाने मनू तर नक्कीच जागा झाला असता! निदान त्याचा आवाज तर आपल्याला ऐकू यायला हवा की नको?'

तिच्या मनात काय चाललंय हे जणू कुणीतरी ओळखलं होतं. मनूच्या रडण्याचा आवाज तिला ऐकू आला. रितूने काळजीने बेडरूमच्या दरवाजावरूनच हात फिरवत मनुला धीर देण्याचा प्रयत्न केला. मनूच्या रडक्या आवाजातल्या क्षीण हाका तिला ऐकू आल्या आणि हाका येत होत्या बरोबर विरुद्ध दिशेने. स्टोअररूममकडून!

आता मात्र रितूचा धीर सुटला. मागचा पुढचा काही विचार न करता धडाधड पाय-या उतरत तिने स्टोअररूम गाठली. तिने हात पुढे करण्याआधीच दरवाजा आपसूक उघडला.

सामोरच्या दृश्याकड़े रितू आ वासून पहात होती. एक स्त्री स्टोअररूममधल्या रॉकींग चेअरवर बसून झोके घेत होती. मनु तिच्या कुशीत गाढ झोपला होता आणि ती त्याला कुठलंसं गाणं गाऊन थोपटत होती. मेणबत्तीच्या प्रकाशातही रितूने तिच्या अंगावरच्या पोषाख चटकन ओळखला. स्टोअररूमच्या साफसफाईच्या वेळेस महादूला जो पोषाख सापडला होता, तसलाच पोषाख त्या स्त्रीच्या अंगावर होता.

रितू कमालीची घाबरली होती. पण मनूला त्या स्त्रीच्या ताब्यात पाहून तिच्यातल्या आईने भितीवर मात केली. मनूला त्या स्त्रीच्या हातून परत मिळवण्याच्या दृष्टिने रितूने दरवाजातून आत पाऊल टाकलं. त्यासरशी ती स्त्री ताडकन उठली. मनूला आपल्या दोन्ही हातांवर तोलून अत्यंत अभद्र सूरात हेल काढून तिने स्वत:भोवती मान फिरवली. रितू नखशिखांत थरथरत होती. पण तरीही तिने पुढे पाऊल उचललं.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment