Thursday, October 22, 2009

प्लॅन्चेट - पान १२

प्रतिक्रिया: 
"शी:! कसलं अभद्र स्वप्न होतं ते....!"

रितू दचकून जागी झाली आणि पलंगावर उठून बसली. तिचा श्वासोच्छवास वेगाने होत होता. पण आता भानावर आली होती ती. आपण जे पाहिलं ते स्वप्न होतं, हे लक्षात आल्यावर तिने सर्वात आधी नजर टाकली ती बाजूला झोपलेल्या मनूकडे. त्याला शांत झोपलेलं पाहून तिचा जीव भांड्यात पडला. त्याच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवून तिने तो स्वत:च्या ओठांवर टेकवला.

टेबलावरचा छोटा दिवा लावून तिने घडयाळात पाहिलं. पहाटेचे दोन वाजले होते. तिच्या घशाला चांगलीच कोरड पडली होती. टेबलावरची पाण्याची बाटली उचलून निम्मी बाटली तिने गटागट संपवली. स्वप्नामुळे मनावर पसरलेला गढूळपणा किंचित कमी झाल्यासारखा वाटला तिला. बाटलीवर हात ठेवून ती स्वत:शीच विचार करत होती.

"असं स्वप्न कसं पडलं आपल्याला?.... याआधी असं घाबरायला कधी झालं नव्हतं.... काल महादूच्या आजोबांनी जे काही सांगितलं त्याचा तर परिणाम नाही ना हा?....छे! राजेश म्हणतो तेच खरं.... काही ऐकलं, की आपण उगाच आपल्या परिने त्याचा अर्थ लावत बसतो आणि सुरू होतात कल्पनांचे खेळ.... पण मग संध्याकाळी महादूच्या आजाने जे सांगितलं ते जर खरं असेल तर....”

इतक्यात रितूला रडण्याचा स्वर कानी आला. बाहेर कुठे तरी एक स्त्री करूण आवाजात रडत होती. रितू सावध होऊन तो आवाज ऐकू लागली.

“कोण रडत असेल?.... असेल कुणीतरी.... आपल्याला काय करायचंय?....पण.... इतक्या रात्री.... दोन वाजता....?

कुतुहलापोटी रितूने पलंगावरून उठून बिचकत बिचकत खिडकी उघडली. बाहेर काळ्याकुट्ट अंधाराशिवाय काही नव्हतं. तरीही तिने त्या आवाजाच्या दिशेचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पण रडण्याच्या आवाजाची दिशा निराळीच होती. रितूने खिडकी बंद करून घेतली नि त्याच वेळी लाईट गेली. रितूचे हातपाय पुन्हा गळाले.

धडपडत जाऊन तिने बिछाना गाठला. डोळे घट्ट मिटून आणि डोक्यावरून पांघरूण घेऊन कोणतीही हालचाल न करता ती तशीच पडून राहिली. डोळे मिटलेले असले तरी कानांपर्यंत तो रडण्याचा आवाज येतच होता. पाच-दहा मिनिटांनी पांघरूणामुळे तिला उकडायला लागलं. नाईलाजाने हळूहळू पांघरूण बाजूला करून तिने डोळे किलकिले करून सभोवार पाहिलं. डोळे अंधाराला सरावल्यामुळे तिला ब-यापैकी दिसत होतं.

"नुसती लाईट गेली तर आपली ही अवस्था!" रितू स्वत:च्या भित्रेपणावर वैतागली.

तिकडे त्या स्त्रीच्या रडण्याचा आवाज कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता. रितूला भिती वाटत असली तरी त्या रडण्याच्या आवाजाने ती पुरती बेचैन झाली होती. पण दरवाजा उघडून बाहेरच्या हॉलमधे पाऊल टाकण्याचंही धाडस तिला होत नव्हतं. वीस मिनिटं ह्या कुशीवरून त्या कुशीवर केल्यानंतर ह्या आवाजा उगम माहिती पडेपर्यंत आपल्याला झोप लागणार नाही याची तिला खात्री पटली. मनाचा हिय्या करून ती उठली.

टेबलाच्या ड्रॉवरमधून माचीस काढून तिने मेणबत्ती पेटवली. मेणबत्तीच्या ज्योतीने संपूर्ण रूममधे उदासवाणा पिवळा प्रकाश पसरला. अंधारापेक्षा रितूला त्या प्रकाशाचीच जास्त भिती वाटायला लागली. तिने आजूबाजूला पाहिलं. रुममधल्या वसूंच्या लांबच लांब नि वेड्यावाकड्या सावल्या आपल्या अंगावर येतायंत असा तिला भास झाला. ती पटकन नजर वळली आणि झोपलेला मनू तिच्या दृष्टीस पडला. झोपेत मनूचा चेहेरा आणखीनच निरागस दिसत होता. त्याच्याकडे एकदा पाहून तिने दरवाजाची कडी काढली आणि बाहेर पाऊल टाकलं.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment