Wednesday, October 7, 2009

अब तक बच्चनच!

प्रतिक्रिया: 
काही म्हणा, बच्चन तो बच्चनच! अभिनयात त्याचा बाप कुणी नाही. सुपरस्टार ऑफ द मिलेनियम ही उपाधी त्याला शोभून दिसते. तीन दशकांहून जास्त काळ त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. कित्येक हिरो त्याच्यामागून आले आणि गेलेसुद्धा! हा तिथेच आहे पाय रोवून.

परवा टी.व्ही. चॅनल सर्फिंग करताना ’बेस्ट ऑफ कॉफी विथ करण’ची थोडीशी झलक पहायला मिळाली. त्यात होता बच्चन, शाहरूख आणि जया बच्चनसोबत. बच्चनची बसण्याची स्टाईल, कुणी बोलत असताना त्याच्याकडे पहाण्याची स्टाईल, त्याची बोलण्याची स्टाईल सगळं कसं अनोखं आहे. त्याचा आदर्श ठेवत कित्येक तरूणांनी त्याच्यासारखी हेअरस्टाईल केली, त्याच्यासारखे कपडे घातले. कितीतरी हिरोंनीसुद्धा त्याच्यासारखा अभिनय करण्याचा प्रयत्न केला पण बच्चनची ओरिजिनॅलिटी कुणालाच नाही पकडता आली.

त्याच्या एकूण व्यकिमत्त्वातच रूबाबदारपणा आहे. तरूण असताना ज्या ताकदीने त्याने हिरो उभे केले त्याच ताकदीने साठी उलटल्यावरही तो अभिनय करतो आहे. त्याचा नायक असो वा खलनायक, दमदारच असतो. मला तर लहान असताना कुठलाही पिक्चर असो, त्यात बच्चन नसेल तर पिक्चरला मजा येणार नाही असंच वाटायचं.

मी दुसरीत किंवा तिसरीत असेन. माझे बाबा मला ठाण्याच्या आनंद टॉकिजला ’मुकद्दर का सिकंदर’ दाखवायला घेऊन गेले होते. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. तो पहिला चित्रपट होता ज्यात मी पहिल्यांदा बच्चनला मरताना पाहिलं होतं. कसला मूड ऑफ झाला होता माझा! "बच्चन मरतो म्हणजे कसला चांगला पिक्चर? हे लोक असं दाखवूच कसं शकतात?" असे कितीतरी प्रश्न मी बाबांना विचारले होते. बाबांनी सर्व हसण्यावारी नेलं पण आईशपथ सांगते, ’मुकद्दर का सिकंदर’ मी पुन्हा कधीही पाहिला नाही. मला त्या चित्रपटाची कथाही आता लक्षात नाही. मोठी झाल्यावर शोले, दिवार सारख्या चित्रपटात अमिताभला मरताना पाहिलं. त्याचा खलनायकी भूमिका असलेला परवाना आणि सौदागर पाहिला. तेव्हा तसं काही वाटलं नाही पण लहानपणी चित्रपटात बच्चनला मरताना पाहून जी काही घालमेल झाली होती, त्यामुळे ’मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट पाहण्याचं धाडस मी कधीच केलं नाही आणि करणार सुद्धा नाही.

नाटकाच्या तालमी करताना सुरूवातीला हातवारे कसे करायचे हे समजायचंच नाही. स्टेजवर आपला संवाद नसताना नुसतं उभं रहायचं असेल तर ’हातांचं काय करायचं’ असा मला प्रश्नह पडायचा. "अमिताभचे चित्रपट पहात जा, हातांचं काय करायचं ते कळेल," माझ्या गुरूंनी मला नाटकाच्या एका तालमीच्या वेळेस हा सल्ला दिला. गुरूजींचा हा सल्ला मी ताबडतोब मानला. बच्चनचे चित्रपट बारकाईने पाहिले आणि हातांचं काय करायचं ते बरोबर समजलं.

त्याचा आदर्श ठेवून जगण्याच्या कल्पना वेडगळ वगैरे वाटत असतील तर त्याचा आयुष्यपट पहावा. एखाद्या हिरोसारखाच जगतोय तो. त्याचा आवाज नापास करण्यासाठी ऑल इंडिया रेडिओचे शतश: आभार मानले पाहिजेत. नाहीतर बच्चन आपल्याला न्यूजरिडर म्हणून ऐकावा लागला असता. चित्रपटसृष्टीत कराव्या लागलेल्या स्ट्रगल ला कंटाळून हा नायक जेव्हा पुन्हा आपल्या गावी जात होता, तेव्हा त्याला जंजीर ची लॉटरी लागली. एका रात्रीत सुपरस्टार झाला तो. त्या चित्रपटातील नायिका त्याच्या ख-या आयुष्यातही नायिका म्हणून आली. त्याच्या जुन्या आणि केव्हाच संपलेल्या प्रेमप्रकरणाची चर्चा आजही रंगात असते. बच्चनसुद्धा मिडियाला काही बाईट मिळू नये म्हणून प्रयत्नशील असतो पण आजही ’ते नेमकं काय होतं’ हे गूढ जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आणि त्याचे चाहते नसलेल्यांनाही असते. बच्चनचा कुठलाही चित्रपट पडला तरी बच्चन मात्र त्यावेळी सुपरहिट होता. ’कुली’ चित्रपटाच्या वेळेस झालेल्या अपघातातून तो वाचावा म्हणून त्याच्या चाहत्यांनी व्रत वैकल्यं केली, नवस केले. बच्चनच्या लोकप्रियतेने कोणती उंची गाठली आहे, हे सर्व जगाला समजलं.

अब तक बच्चनच!


राजकारण काही आपला प्रांत नाही, हे कळल्यावर बच्चन गुमान राजकारणातून बाहेर पडला आणि चित्रपटसृष्टीत कम बॅक केलं. त्याच्या ए.बी.सी.एल. कंपनीचं दिवाळं वाजलं. कर्जबाजारी झाला बच्चन पण हिंमत नाही हारला. ’कौन बनेगा करोडपती’ सारख्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून ख-या अर्थाने करोडपती झाला तो बच्चनच. गेलेली पत, गमावलेला पैसा पुन्हा मिळवला. त्याचा मुलगा चित्रपटसृष्टीत येऊन जुना झाला पण बच्चन मात्र अजून नव्या नवलाईने वावरतो आहे.

त्याचं बच्चन हे आडनाव त्याच्या वडिलांची म्हणजे श्री. हरिवंशराय बच्चन यांची देणगी आहे. हरिवंशरायजींना घरात प्रेमाने ’बच्चन’ असे पुकारले जात असे. प्रेमाने पुकारण्यासाठी वापरलेल्या नावानेच आपली ओळख व्हावी म्हणून हरिवंशरायजींनी नावापुढे आपल्या मूळ ’श्रीवास्तव” या आडनावाऐवजी ’बच्चन” हे आडनाव लावलं आणि तेच नाव पुढे या घरातील सर्व सदस्यांनी आडनाव म्हणून स्विकारलं.

बच्चनला सून मिळाली तिही जगत् सुंदरी. एका सुपरस्टारची सून म्हणून अशीच असणार होती कुणीतरी. तिच्या आणि मुलासोबत केलेल्या ’कजरारे’मधे लक्षात राहिला तो बच्चनच! एक हात वर करून त्याचं नाचणं, त्याचं ते शिट्टी मारणं, एक भुवई उडवणं, मधेच चकित होऊन ‘हांऽय’ म्हणणं त्यालाच शोभतं. बच्चनला नाचताना पाहून त्याला नाचता येत नाही असं कुणीतरी म्हणेल का?

त्याला तेलाच्या, चॉकलेट, पाचक गोळ्यांच्या जाहिरातीत पाहून आपण हसतो पण समजा त्याने नसती केली, तर ती जाहिरात तितकीच मजेदार झाली असती? २००५ साली त्याची आतड्याची शस्त्रक्रिया झाली तेव्हा, अगदी गेल्या वर्षी तो रूटीन चेक-अप साठी म्हणून पुन्हा हॉस्पिटलाईज्ड झाला तेव्हादेखील त्याच्यासाठी प्रार्थना करून चाहत्यांनी आपण त्याच्यावर पूर्वीइतकीच प्रेम करतो हे दाखवून दिलं. चाहत्यांच्या प्रेमाच्या बळावरच जगत असावा हा हिरो कारण ’आय थिंक डॅड शुड स्लो डाऊन नाऊ," असं खुद्द त्याच्या मुलाने म्हटल्यानंतरही आपण या वर्षी बच्चनला अलादिन आणि बिग बॉस मधून पहाणारच आहोत. वय झालं पण रूबाबदारपणा कमी नाही झाला. त्याच्या अभिनयावर लोक स्तुतिसुमनं उधळतात तेव्हा, “आय अॅम अ डिरेक्टर्स अॅक्टर”, असं तो नम्रपणे सांगतो.

बदलत्या काळानुसार चाहत्यांच्या संपर्कात रहाण्यासाठी आपणही बदललं पाहिजे हे लक्षात घेऊन त्याने ब्लॉग सुरू केला. अभिनेत्यांच्या ब्लॉग्समधे बच्चनच्या ब्लॉगवर सर्वात जास्त हिट्स आजही असतात. आजवर घडलेल्या कुठल्याही सामाजिक वा राजकिय घडामोडींमधे त्याने दिलेल्या प्रतिक्रिया या शांत व संयत असतात. जास्त लांब कशाला त्याच्या पत्नीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची जबाबदारी घेऊन त्याने सर्वांसमोर माफी मागीतली तेव्हाही तो प्रत्येक शब्द न् शब्द तोलून मापून बोलला.

अमिताभ म्हणजे अमर्याद तेज! त्याच्या या नावाला साजेसाच आयुष्यपट आहे त्याचा! मला मात्र त्याला बच्चनच म्हणायला आवडतं. एका चित्रपट वाहिनीवर ’अब तक बच्चन’ या नावाने त्याच्या चित्रपटांचा महोत्सव सुरू आहे. खरं आहे, हेच नाव बच्चनच्या कारकिर्दीला शोभून दिसतं - किती आले नि किती गेले, अब तक बच्चनच!

7 comments:

 1. आपण बाबा या वलयांकीत व अत्यंत मेहनती जबरदस्त व्यक्तीमत्वाचे डायहार्ड पंखा. खरे आहे किती आले अन गेले परंतु या सम हा!
  लेख आवडला.

  ReplyDelete
 2. खरयं तुझं...किती आले किती गेले हा माणूस मात्र टिकून आहे...
  Tanvi

  ReplyDelete
 3. भानस, Tanvi, प्रतिक्रियांसाठी मन:पूर्वक आभार!

  ReplyDelete
 4. अमिताभने अभिनय न करता त्याचा नुसता आवाज देखील चित्रपटाला एक वेगळा दमदार effect देतो.

  ReplyDelete
 5. अरे वा कांचन ! बच्चन म्हणजे माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय !!
  अमिताभबद्दल मी लिहिलेले हे लेख वाचलेस का?
  ’बच्चन येतो ना भौ !’
  http://atakmatak.blogspot.com/2008/11/ss_25.html

  ’बच्चन दर्शनमात्रे... (पूर्वार्ध)’
  http://atakmatak.blogspot.com/2008/08/blog-post.html

  ’बच्चन दर्शनमात्रे... (उत्तरार्ध)’
  http://atakmatak.blogspot.com/2008_08_01_archive.html

  ReplyDelete
 6. संदिप, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! तू लिहिलेले दोन्ही लेख वाचले (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध सुद्धा!). ह्या माणसाबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे.

  ReplyDelete
 7. सिद्धार्थ, तुमच्या प्रतिक्रियेला उशीरा उत्तर दिल्याबद्दल दिलगीर आहे! तुमचं म्हणणं एकदम पटलं. बच्चनचा आवाज दमदार आहे म्हणून तर कितीतरी चित्रपटांमधे सुरूवातीला सुत्रधाराच्या आवाजाचं निवेदन बच्चननेच केलंय. त्याच्या ए.बी.सी.ल. चा पहिला चित्रपट ’तेरे मेरे सपने’ मधेही त्याचाच आवाज आहे सुरूवातीला.

  ReplyDelete