Monday, October 5, 2009

प्लॅन्चेट - पान ११

प्रतिक्रिया: 
“छे! तासाभरात येईन म्हणाले होते. आता दोन तासांच्या वर उलटून गेले. ही पोरं काय करत असतील कुणास ठाऊक?”

रितूने आपल्या चालण्याचा वेग वाढवला पण वाट जणू संपतच नव्हती. शहरात राहिलेल्या रितूला गावातील दगड्धोंड्यांवरून चालण्याची सवय नव्हती. मधेच ठेचकाळायला होत होतं. त्यात करकरीत तिन्हीसांजेचा अंधार आणि महादूच्या आजोबांनी घराबद्दल सांगितलेल्या गोष्टींनी तिच्या मनावर भितीचा पगडा बसला होता. मनूला दुस-यावर सोपवून आजवर ती कधीच कुठे गेली नव्हती. ’आजच आपल्याला ही बुद्धी कशी काय झाली’, म्हणून ती मनातल्या मनात स्वत:लाच बोल लावत होती.

इतक्यात तिला आपल्या मागून कुणीतरी चालत असल्याचा भास झाला. ती जागच्याजागी थबकली. तसा पावलांचा आवाजही थांबला. रितूने मागे वळून पाहिलं. तिच्याशिवाय त्या बांधावर कुणीच नव्हतं. रितू पुन्हा चालायला लागली तसा पावलांचा आवाज पुन्हा येऊ लागला. मागून येणारा आवाज हा आपल्या पावलांच्या आवाजाचा प्रतिध्वनी नाही, हे रितूला पक्कं कळलं होतं पण यावेळेस मागे वळून पहाण्याची तिची हिम्मत झाली नाही. तिचं चालणं पळण्यात बदललं. धावत धावत ती तिच्या घराच्या कुंपणापर्यंत आली.

लांबूनच घराचा दरवाजा बंद असलेला तिला दिसला. तिच्या काळजाचा एक ठोका चुकला. ती आपला पाठलाग, भिती सर्व सर्व विसरली. मनूच्या काळजीने ती झपझप चालत दरवाजाजवळ गेली. दरवाजा नुसताच ओढून घेतलेला दिसत होता. थरथरत्या हातांनी दरवाजा लोटून रितूने घरात पाऊल ठेवलं. थंड हवेची एक झुळूक तिच्या अंगावरून निघून गेली. रितूचं अंग शहारलं.

“मनू....?”

तिच्या उत्तराला प्रतिसाद आला नाही.

“साहिल... अमित....?”

आतली भयाण शांतता रितूला वेडावून दाखवत होती. मनूला शोधण्यासाठी तिने संपूर्ण घर पालथं घातलं. मनूच काय पण साहिल, अमित कुणाचाच पत्ता नव्हता.

"अजून हे तिघे स्टोअररूममधेच आहेत की काय?" रितूने लगबगीने तळघराचा जिना गाठला.

“मनू...?” रितूने दरवाजावर थाप मारली.

“मम्मीऽऽ....”

आतून मनूची रडकी हाक ऐकूनसुद्धा रितूला हायसं वाटलं. तिने धक्का देऊन दरवाजा उघडला. आतलं दृश्य पाहून रितू जागच्या जागी खिळली.

आत एका रॉकिंगचेअरला झोके देत मनू एकटाच पाठमोरा उभा होता. कुठलंसं गाणं म्हणत होता. रितूने दारातूनच त्याला हाक मारली.

"मनू?"

मनूने शांतपणे मागे वळून पाहिलं आणि रितूचे डोळे विस्फारले. मनूचा चेहेरा खूप प्रौढ आणि पांढरा फटक दिसत होता. रितूकडे पाहून मनू भयाण हसला.

"मम्मी..."

हा आवाज मनूचा नव्हताच. रितू अविश्वासाने मनूकडे पहात होती. हळूहळू मनूच्या चेहे-यात बदल होऊ लागला. चेहेरा जाऊन त्याजागी आता कवटी दिसू लागली.

रितूच्या तोंडून भयातिरेकाने किंकाळी बाहेर पडली.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment