Thursday, October 1, 2009

प्लॅन्चेट - पान ९

प्रतिक्रिया: 
“डोन्ट वरी यार. कुछ नही होगा.... हा फक्त एक प्रयोग आहे....मी रितू वहिनीला यातलं काहीच सांगितलेलं नाही....अरे बाबा, उद्या संध्याकाळी, ती गावात कुणाला तरी भेटायला जाणार आहे, ती वेळ आपल्यासाठी एकदम सोयीची आहे....ती येईपर्यंत आपलं काम झालेलं असेल....च्‍! आता नसते घोळ घालू नकोस.... तू ये इथे.... पप्पांशी काय बोलायचं ते मला माहित आहे.... काय वेडा झाला काय?.... अरे अशा गोष्टी कुणी आई-बापाला सांगतं का?.... माझ्या दादाला सुद्धा मी हे सांगितलेलं नाही तर....हं! दॅट्स लाईक अ गुड फ्रेंड.... चल देन.... बाय!” साहिलने बोलणं संपवून मोबाईल बंद केला आणि दारात उभ्या असलेल्या रितूला पाहून चपापला.

“त्‍... तुम्ही.... अरे, वहिनी, तुम्ही केव्हा आलात?”

“आई-वडिलांपासून काही गोष्टी लपविण्याचा सल्ला तू तुझ्या मित्राला देत होतास ना, तेव्हा.”

साहिलचा जीव भांड्यात पडला. “नशीब! हिने सुरूवातीपासून काही ऐकलेलं नाही तर.”

“अहो वहिनी, त्याचं काय आहे...माझा एक मित्र आहे, अमित नावाचा. तो योगाच्या क्लासला जात होता. तिकडे त्याला मेडीटेशन कसं करायचं ते शिकवलंय पण ते करण्यासाठी त्याच्या घरी पुरेशी जागाच नाहिये. मी म्हटलं की सुटीत मी गावी जातोय, तेव्हा माझ्या गावच्या घरी तुला भरपूर जागा मिळेल मेडीटेशन करण्यासाठी. तर नाही आला आणि आता मला मस्का लावत होता.”

“असं आहे काय!” रितूने हसत म्हटलं.

“हो ना! पण एक अडचण आहे वहिनी.”

“काय रे?”

“माझा मित्र खूप लाजाळू आहे. त्याला जर मेडीटेशन करताना कुणी पाहिलं ना, तर त्याचं लक्षच उडेल. म्हणून त्याला साधना करताना आसपास कुणी नको होतं. त्याचसाठी तर मी त्याला म्हणालो की अशा गोष्ट आईबाबांना सांगायच्या नसतात.”

“आई-बाबांना सांगायचं की नाही ते माहीत नाही, साहिल. पण कोणतीही साधना, अभ्यास करायचा तर एकाग्रचित्त हे हवंच.”

“तेच ना. त्याच कामात मला तुमची मदत पाहिजे होती, वहिनी.”

“माझी. बरं बोल, काय करू?”

“आमच्या घरी नाही म्हटलं, तरी एक-दोन माणसं येतातच. त्यामुळे व्यत्यय हा येणारच. पण तुम्ही हे जे घर विकत घेतलंय ना, त्यात बेसमेंटला एक ऐसपैस रूम आहे. काल तर ती रूम पूर्ण स्वच्छ सुद्धा झालीये. तुम्ही ती रूम माझ्या मित्रासाठी उपलब्ध करून दिलीत तर.... नाही म्हणजे, उद्या सकाळी राजेशदादा, पल्लवी आणि राहूलदादासोबत मुंबईला जातोय, तुम्ही पण गावात कुणालातरी भेटायला जाणार आहात, तर... कुणी नसलं तर माझ्या मित्रालासुद्धा प्रॅक्टीस करताना कम्फर्टेबल पण वाटेल ना! आम्ही फार वेळ नाही थांबणार….आम्हाला एक तास पुरेल”

रितूने क्षणभर विचार केला.

“स्टोअय्र रूम द्यायला हरकत नाही पण मला खरं सांग साहिल, तुझा मित्र ’मित्रच’ आहे ना?”

“बास का वहिनी? तुमच्याशी इतकं खोटं बोलेन का मी?”

रितूने त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हटलं, “तू खोटं बोललास तरी मला ते कळेलच साहिल. कारण तुझ्या मित्राची भेट घेतल्याशिवाय मी घरातून बाहेरच पडणार नाही.”

साहिलने वरकरणी हसून रितूचं कडवट बोलणं ऐकून घेतलं.

“ठिक आहे, वहिनी. माझ्या मित्राला भेटून मगच बाहेर पडा तुम्ही.”ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment