Thursday, October 1, 2009

प्लॅन्चेट - पान ७

प्रतिक्रिया: 
“"व्हॉट इज रॉंग विथ यू, रितू? या जागेबाबत मी साशंक होतो ते या जागेच्या झालेल्या झटपट व्यवहारामुळे? अरविंदकाकांवर विश्वास आहे पण पैशाचे व्यवहार इतक्या चटकन झाले की त्यात आपलं नुकसान होण्याची शक्यता असते, असं मला वाटलं म्हणून मी ते मॅटर तुझ्याशी डिस्कस केलं आणि तू...."

"मी वेगळं काय करतेय? आपलं नुकसान होऊ नये म्हणूनच प्रयत्न करतेय ना?"

"हे.. हे, असे?" टेबलावर पडलेल्या त्या जुन्या ड्रेसकडे हात करत राजेश त्राग्याने म्हणाला.

"मग कसे? हे बघ राजेश, तुझा असल्या गोष्टींवर विश्वास नसेल पण माझा आहे. चांगलं असतं तसंच वाईट पण असतं."

"असतं ना! मी कुठे नाही म्हणतोय. पण भुतं-खेतं? अगं शहरात शिकलेली, ग्रॅज्युएट झालेली बाई तू."

"दादा," पल्लवी मधे पडत म्हणाली, "मला नाही वाटत वहिनीची भूमिका चुकीची आहे."

"काय?...."

"अरे, तूच विचार कर. या जागेचा मालक तुला न भेटता, तुझ्याशी न बोलता, तू म्हणालास त्या रकमेला तुला जागा द्यायला तयार झाला. तू जागा विकतही घेतलीस. पण या गावाबद्दल किती माहिती आहे तुला? खुद्द अरविंदकाकांनी आपल्या गावाचं तोंड पंचवीस वर्षांनंतर पाहिलंय. राहूल आणि साहिलला तर माहितच नव्हतं की आपलं गाव कसं दिसतं. अरविंदकाका तुझ्याचसमोर म्हणाले ना की गावाची लोकवस्ती वाढलीय. पूर्वी जेमतेम शे-दोनशे वस्ती असलेलं गाव आता बरंच पसरलंय म्हणून? आणि विसरलास, ते आणखी काय म्हणाले होते?"

"काय म्हणाले होते?" राजेशने डोळे बारीक करून विचारलं.

"हे घर, अरविंदकाकांचं घर, आज ज्या ठिकाणी उभं आहे, ती जागा पूर्वी गावाबाहेर होती. शेतांवर नजर ठेवण्यासाठी म्हणून ही उंच घरं बनवली गेली होती. आता लोकवस्ती वाढली तशी घरही वाढली पण ही दोन घरं पूर्वी खूप एकाकी असायची. त्यातही अरविंदकाकांच्या घरचं इथे फार कुणी नसायचं म्हणून या पाटलांच्या घरचीच लोकं अरविंदकाकांची शेती सांभाळायची. त्याचे त्यांना पैसेही मिळायचे."

"मग? त्यात काय?’

"असं काय करतोस दादा? कैलास पाटील गेल्या वीस वर्षांपासून मुंबईत आहे. तो जागेच्या व्यवहारासाठीसुद्धा इथे फिरकला नाहिये. तुला हे संशयास्पद वाटत नाही?"

"मला एक कळत नाही, पल्लवी. संशयास्पद म्हणजे भुतं खेतं, असं तू केव्हापासून मानायला लागलीस?"ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment