Saturday, September 26, 2009

प्लॅन्चेट - पान ६

प्रतिक्रिया: 
बराच वेळ झाला तरी महादू आणि त्याची माणसं तळघरातील स्टोअररूममधून काही बाहेर यायला तयार नाहीत तशी रितूने वरून आवाज दिला.

"महादूदादा, इतका वेळ का लागतोय बरं त्या खोलीत?"

"अवो ताई, लई कचरा जमा करून ठेवलाता या पाटलानं. जरा ह्ये बगा काय हाय त्ये."

रितू जिना उतरून तळघरात आली. स्टोअरूममधे रचून ठेवलेलं सामान इतस्तत: विखुरलेलं होतं. त्याच पसा-यात उघड्या असलेल्या मोठ्या पेटीकडे महादू हात दाखवत होता.

रितूने पुढे जाऊन पाहिलं. पेटीत जुने फोटो, कपडे, काही कागदपत्रं यांचा पसारा दिसत होता. त्यातल्या एका वस्तूने रितूचं लक्ष वेधून घेतलं.

एका स्त्रीचा पोशाख होता तो. इंग्रजी चित्रपटात जुना काळ दाखवताना बायकांचे जसे कपडे असायचे तसा पोशाख होता तो. पांढरट गुलाबी घेरदार झगा, फुग्याच्या लांब बाह्या, नक्षिदार झालर, गळ्याजवळ सॅटीनची रिबिन. इतकी वर्षं पेटीत बंद राहिल्यामुळे त्याला जुनकट वास येस होता. झुरळांनी नि उंदरांनी जागोजागी कुरतडला होता. आनंदगावासारख्या खेडेगावात राहणा-या कैलास पाटलाच्या घरात असा ड्रेस काय करत होता, याचा रितूला प्रश्न पडला.

"काय विंग्रजी बाया आनून नाचवत व्हता का काय हा पाटील?" महादूने म्हटलं. त्याच्या सोबत असलेले त्याचे जोडीदारही फिदीफिदी हसू लागले. रितूने त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांचं हसणं बंद झालं. महादूला वरच्या हॉलमधे भेटायला बोलावून रितू निघून गेली.

“दादा, तुम्हाला ह्या घराबद्दल काही माहिती आहे का?”

"मला न्हाई पन माज्या आजाला म्हाईत असंल. त्योच ह्या गावातला जुना मानूस हाये." तिच्या प्रश्‍नामागील गंभीरता महादूलाही जाणवली होती.

"मला त्यांना भेटता येईल का?"

"यील की! पन थांबाव लागंल. त्यो माज्या बा संगं गेलाय तालुक्याच्या गावाला, माज्या भनीच्या घरी. दोन-तीन दिवसानी आला की कळीवतो."

"ठिक आहे, चालेल. हा ड्रेस मी माझ्याकडे ठेवते. तुम्ही बाकीची रुम आटोपून घ्या आणि ती पेटी आहे ना, मोठी.... ती एका बाजूला तशीच ठेवा. मी नंतर पाहिन."

"बाऽरं," असं म्हणून महादू पुन्हा आपल्या कामाला निघून गेला.


ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment