Thursday, September 24, 2009

प्लॅन्चेट - पान ५

प्रतिक्रिया: 
"तुला काय वाटतं रितू? मी केलं ते बरोबर केलं का?" राजेशने विचारलं.

"हे बघ राज, आता जागा विकत घेतलीच आहे तर तिचे फायदे तोटे कळतील ना हळूहळू. अरविंदकाका काही आपल्याला अशीतशी जागा पाहून देणार नाहीत. तेच म्हणाले ना, की जागेच्या मालकाला इथली सर्व प्रॉपर्टी विकून परदेशात स्थायिक व्हायचंय म्हणून."

"हो गं. पण असं व्हायला नको की तो जागेचा मालक, कैलास पाटील परदेशी जायचा आणि त्याचा कोणी भाऊबंद उपटायचा, जागेचा हक्क सांगण्यासाठी."

"तसं झालंच तर बघून घेता येईल. हे बघ, आपण करार करताना सर्व कागदपत्र नीट चेक केलेली आहेत, ती खरी असल्याची पडताळणी केलेली आहे. मग कशाला घाबरायचं?"

"पण मग ते सुधाकरकाका काही डिटेलमधे बोलायला तयार का नव्हते? असं आटोपतं घेऊन निघून का गेले ते?"

रितू राजेशला काही उत्तर देणार इतक्यात मनू साहिलचं बोट धरून घरात शिरला. त्या दोघांना पाहून राजेशने हात कोपरापासून हात जोडले.

"या, या. झालं गाव उंडारून? अरे साहिल, इथे तुझ्या मोठ्या भावाच्या नि माझ्या बहिणीच्या लग्नाची बोलणी सुरू होती आणि तुम्ही दोघं कुठे गायब झाला होतात?"

"मम्मी, साहिलकाकाने एकदम फास्ट फास्ट सायकल चालवली. बाबा, मी आणि साहिलकाका नदीवर गेलो होतो. मी पाणी उडवून साहिलकाकाला भिजवून टाकलं." मनूने उत्साहाने चित्कारत माहिती पुरवली.

"हं! आता सर्दी झाली तर रडायचं नाही हं, मनोबा. आई-बाबांना न सांगता गेला होतास तू." रितू म्हणाली.

"सॉरी रितू वहिनी. तुम्हाला न विचारता मी मनूला घेऊन गेलो. मी खरंतर मनूला घेऊन जाणारच नव्हतो. पण मी सायकल काढली आणि हा मागेच लागला.” साहिलने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

"अरे, तुला काही म्हटलं का मी साहिल? आमच्या मनूचा पाय घरात टिकतच नाही. घरात असला तर खेळण्यांची मोडतोड करतो नि घराबाहेर पडला तर पुन्हा घरात येण्याचं नाव नाही काढत. त्याला तुझ्याबरोबर जाताना पाहिलं होतं मी म्हणून तर इतकी निर्धास्त होते.”

"साहिल, आता आलाच आहेस तर मला सांग, गावात ह्या घराच्या साफसफाईसाठी माणसं मिळतील का रे?" राजेशने विचारलं.

"हो! मिळतील ना! कधी हवी आहेत सांगा?"

"उद्या सकाळपासून."

"ठीक आहे. मी असं करतो, आत्ताच महादूच्या घरी सांगून येतो. तो त्याच्यासोबत निदान दोन जणांना तरी घेऊन येईलच."

"बेस्ट!"

साहिल निघून गेला आणि मनूने पुन्हा त्याच्या छोट्या सहलीच्या गमती जमती सांगायला सुरुवात केली.ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

2 comments:

  1. मी ही कथा वाचण्यासाठी खूप उत्सुक आहे. या कथेची पानं लवकर पोस्ट करा.

    ReplyDelete
  2. Shalmali, आपल्या प्रतिक्रियेसाठी आभार. लेखन काही काळ थांबले होते त्यामुळे पाने पोस्ट करता आली नाहीत. आता लवकरात लवकर पोस्ट करेन.

    ReplyDelete