Tuesday, September 8, 2009

प्लॅन्चेट - पान ४

प्रतिक्रिया: 
केवळ मॉल्स नि पब्स नाहीत म्हणून त्या गावाला शहर म्हणायचं नाही, इतकंच. नाहीतर पल्लवीला तिथे अजिबात बोअर होणार नाही. उलट तुम्ही पहाल, एक वर्षानंतर माझं कॉन्ट्रॅक्ट संपलं ना की पल्लवीच मला तिथे रहाण्याचा आग्रह करेल.”

राहूलच्या या उत्तराने रितूला बराच दिलासा मिळाला. राहूलकडून तिला आणखीही काहीतरी जाणून घ्यायचं होतं, तेवढ्यात बाहेरून सुधाकररावांचा आवाज आला.

“येऊ का अरविंदा?”

“अरे ये, ये. तुझीच वाट पहात होतो.”

“हे घे. हे पेपर्स.” असं म्हणून हातातलं करारपत्र सुधाकररावांनी अरविंदरावांच्या हातात दिलं. अरविंदरावांनी ते संपूर्ण करारपत्र वाचलं.

“गुड, गुड,” स्वत:शीच मान डोलावत ते म्हणाले आणि त्यांनी ते करारपत्र राजेशच्या समोर धरलं.

“हं, राजेश. हे घे. पूर्ण वाच आणि मगच सही कर.”

राजेशने करारपत्र वाचून त्यावर सही केली. मग अरविंदरावांनी सही केली.

“चला, आता ते समोरचं घर कायदेशीररित्या राजेशच्या नावावर होणार. काळजी नाही.” अरविंदराव म्हणाले.

“हो ना. सगळं कायदेशीर असलं म्हणजे कसं बरं असतं.” अरविंदरावांच्या बोलण्याला दुजोरा देण्यासाठी काहितरी बोलायचं म्हणून सुधाकरराव बोलले.

“पण मला एक कळत नाही. त्या घरमालकाने इतक्या कमी किंमतीत ते घर काय म्हणून विकलं असेल?” राजेश अरविंदराव आणि सुधाकरराव यांच्याकडे आळीपाळीने पहात म्हणाला.

“काय करायचंय आपल्याला?” सुधाकरराव राजेशला झटकत म्हणाले. “अशा चौकशा करत बसलं तर घराच्या किंमती फुगत फुगत आकाशाला भिडतात. असे झटपट व्यवहार केले ना की कामं कशी स्वतात होतात. तूच सांग राजेश, फक्त पाच लाखाला अशी जागा तुला कुठे मिळाली असती रे? अरे, एकदा का गावाच्या प्रगतीने वेग धरला ना, की ह्या पाचाचेच पन्नास लाखही होतील.”

"पण काका तरीसुद्धा...."

"चला, या करारपत्राची झेरॉक्स काढायला हवी आता.” एवढं म्हणून राजेशला टाळत सुधाकरराव पटकन घराबाहेर पडले.

राजेशने अरविंदरावांकडे पाहिलं. अरविंदराव घराबाहेर पडणा-या सुधाकररावांकडे पहात होते. त्यांच्या कपाळावर नकळत एक आठी उमटली.


ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment