Tuesday, September 8, 2009

प्लॅन्चेट - पान ३

प्रतिक्रिया: 
“पल्लवी बेटा, खूप भाग्यवान आहेस तू. राजेश आणि रितू सारखे दादा वहिनी तुला मिळालेत.” अरविंदराव पल्लवीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.

पल्लवीने सिम्तहास्य करीत रितू आणि राजेशकडे पाहिलं. प्रेम, कृतज्ञता, अभिमान अशा कितीतरी भावना डोळ्यांवाटे तिच्या हास्यात उतरल्या होत्या.

“काका, पल्लवी आता तुमची मुलगी आहे. वागता बोलताना तिचं काही चुकलं तर मोठ्या मनाने....” राजेशला पुढे बोलवेना. दोन्ही हात अरविंदरावांसमोर जोडून तो उभा होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

अरविंदरावांनी राजेशचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले.

“अरे, काय हे? राजेश, तुझी बहिण आता माझी मुलगी आहे असं म्हणालास ना? मग आपल्याच मुलीवर कुणी रागावतं का? मला तर खात्री आहे. पल्लवीच्या वागण्या-बोलण्यात चूक होणं शक्यच नाही. रितूसारखी वहिनी असताना तर अजिबात नाही.”

“मला लाजवू नका काका,” रितू म्हणाली. “सासूबाईंना वचन दिलं होतं मी. त्यांच्या मुलीला स्वत:च्या मुलीप्रमाणे वाढवेन म्हणून. मी माझं कर्तव्य केलं.”

“हो बेटा. तू तुझं कर्तव्य अगदी चोख बजावलंस. काळजी करू नकोस. आमच्या घरात पल्लवी तुमच्याच घरात असल्यासारखी राहील.” अरविंदराव म्हणाले.

राहूल अरविंदरावांकडे पहात म्हणाला, “बाबा, वहिनींना कसली काळजी वाटतीय, मला माहित आहे.”

अरविंदरावांनी राहूलकडे प्रश्नाार्थक पाहिलं. रितू, राजेश आणि पल्लवीही राहूलकडे पहात होते.

“वहिनी, मी जरी लग्न झाल्यानंतर खेडेगावात जाऊन माझी डॉक्टरकीची प्रॅक्टीस करणार असलो तरी श्रीरामपूर हे तसं सुधारलेलं गाव आहे. तुम्ही ह्या आनंदगावावरून श्रीरामपूरची कल्पना करताहात ना?”

रितूने होकारार्थी मान डोलावली.

राहूल तिला समजावण्याच्या उद्देशाने पुढे बोलू लागला.

अहो वहिनी, ह्या आनंदपूरमधे सगळाच आनंद आहे. सुधारणा होतेय आहे पण सुधारणेचा वेग अतिशय मंद आहे. श्रीरामपूरचं तसं नाही. श्रीरामपूरमधे वीज आहे, पाणी आहे, दहावीपर्यंत शाळा आहे. छोटं हॉस्पिटल आहे. गावातील वस्ती सुशिक्षित लोकांची आहे. गावातील ब-याच लोकांचा या ना त्या कारणाने शहराशी संबंध येतो. केबल टी. व्ही., सार्वजनिक वाचनालय यामुळे ही लोकं ताज्या बातम्यांनी अपडेट आहेत.
ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment