Monday, August 10, 2009

गॉड ब्लेस यू... - पान २१

प्रतिक्रिया: 
समीर प्रियाच्या चेहे-या वरच्या एक्स्प्रेशन्स पहात होता. तिच्यावर गुदरलेला प्रसंग कोणत्याही मुलीला भितीदायक वाटणाराच होता.

“प्रिया, तू जेव्हा त्या आडरानातून बाहेर पडलीस तेव्हा एखादं वाहन, सायकल म्हण, स्कूटर म्हण तुला रस्त्यात दिसली होती का?” समीर.

“नाही. म्हणजे आता आठवत पण नाही. मी इतकी घाबरले होते की त्या दुधाच्या टेंपो ड्रायव्हरने लिफ्ट दिली नसती, तर मी पळत पळत पोलिस स्टेशन गाठलं असतं.”

“पोलिस स्टेशनला जाण्याआधी तू कुणाला फोन वगैरे केला होतास?”

“नाही.”

“तू गाडीत असताना दिपकने कुणाला फोन केला होता?”

“हो. तो कुणाशी तरी बोलत होता खरं. पण मला ऐकू गेलं नाही निटसं. मी नीलबरोबर बोलत होते. नील दिपकच्या बाजूला बसला होता आणि मी मागच्या सीटवर रेहाना आणि सुल्ताना सोबत बसले होते. त्यांच्या हसण्याखिदळण्यात मला नीलचं बोलणंही नीट ऐकू येत नव्हतं. दिपक तर खूपच हळू आवाजात फोनवर बोलत होता.

“तुझं खास कुणाशी असं शत्रुत्वं होतं का? इथे किंवा नाशिकला?”

“नाही, अजिबात नाही.”

“दिपकचे कुणी शत्रू होते?”

“काही कल्पना नाही. तो नाशिकला असताना हूडपणा करायचा पण त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल मला जास्त माहिती नाही.”

“मनोज ठाकूरशी असलेली तुझी मैत्री आणखी कुणाच्या डोळ्यात सलत होती?”

“तसं तर काय, बर्यारच मुलींना माझा हेवा वाटायचा. आणखी दोन-तीन मुलं माझ्या मागे होती पण त्यांच्यापैकी कुणी मजोजशी ह्या गोष्टीवरून शत्रुत्व घेतलेलं मला आठवत नाही. पण मनोजची आणि माझी मैत्री बर्याअच जणांच्या चर्चेचा विषय होती.”

“मनोजची फॅमिली कशी आहे?”

“मनोजचे वडील गेल्या वर्षी वारले. ते स्वभावाने तसे बरे होते. मनोजच्या आईला मात्र श्रीमंतीचा खूप गर्व होता. त्यांना त्यांची सूनही त्यांच्याचसारखी श्रीमंत घराण्यातील हवी होती, असं मनोजने एकदा मला सांगितलं होतं. मनोजच्या भावाबद्दल मला फारशी माहिती नाही. त्याचं आईवडीलांशी पटायचं नाही म्हणून तो मनोज आणि त्याच्या आईवडिलांसोबत रहात नव्हता इतकंच मला माहिती आहे.”

“तुझ्यावर जी नाशिकला केस झाली होती, त्यात जास्त पुढाकार कोणाचा होता, असं तुला वाटतं?”

“मनोजच्या भावाचा, महेश ठाकूरचा. त्यानेच कोर्टात ओरडून ओरडून सांगितलं होतं की ’प्रियाने मनोजला आशेला लावून सोडून दिलं म्हणून त्याने आत्महत्या केली.’

“तुझा महेश ठाकूरशी कधी संबंध आला होता?”

“कधीच नाही. लहानपणीसुद्धा आम्ही कधी बोललो नाही एकमेकांशी.”

“हा जो तुझा कॉल सेंटरमधला मित्र आहे, अमोल. त्याचं कुणाशी अफेअर आहे?”

“हो. सोनिया मेहता नावाची त्याची प्रेयसी आहे. ती आमच्याच प्रोसेसला काम करते.”

“हं. ओ.के. प्रिया, माझं इथलं काम संपलंय. आता कोर्टात भेटू.”

प्रियाचा निरोप घेऊन समीर बाहेर पडला तेव्हा विचारांवर साचलेलं मळभ थोडंस दूर झाल्यासारखं वाटलं त्याला. प्रियाने सांगितलेली हकिकत आणि समीरच्या असिस्टंटने नाशिकला जाऊन प्रियावर झालेल्या पहिल्या केसची आणलेली माहिती हे एकाच चित्राचे दोन तुकडे आहेत असं त्याला वाटत होतं. नशिबाने साथ दिली तर कदाचित केसच्या पुढच्या तारखेला तो सत्य उघड करू शकणार होता.

ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

3 comments:

  1. वा...! उत्कंठा आणखीणच वाढत चालली आहे.!

    ReplyDelete
  2. भुंगा, प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.

    ReplyDelete
  3. lavkarat lavkar prakashit kara i am waiting

    ReplyDelete