Wednesday, August 5, 2009

गॉड ब्लेस यू... - पान १६

प्रतिक्रिया: 
तो मला ज्या दिवशी भेटला त्याच रात्री त्याने गळफास लावून आत्महत्या केली. मनोजची आठवण म्हणून मी ते लॉकेट कायम गळ्यात घालायचे. त्या लॉकेटची एक स्पेशालिटी होती. वरून ते साधं सुधं लॉकेट वाटायचं पण त्या लॉकेटच्या आत बोटाच्या पहिल्या पेराएवढं एक पातं दडवलेलं होतं. त्या दिवशी दिपकच्या मानेत मी तेच पातं खुपसलं होतं.

मनोजने मला प्रपोज केलं होतं, ही गोष्ट माझ्या घरी माहित नसली तरी कॉलेजमध्ये बर्या्च जणांना माहित होती. त्याच्या आत्महत्येनंतर दुसर्याा दिवशी पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावून घेतलं. सुमारे तासभर ते निरनिराळे प्रश्न विचारत होते. नंतर एक इन्स्पेक्टर आत आला आणि त्याने मला सांगितलं की मनोजचा भाऊ महेश ठाकूर माझ्यावर केस दाखल करणार आहे. माझ्या तोंडचं पाणीच पळालं.

मी आणि मनोज त्याच्या मृत्यूपर्यंत मित्र-मैत्रीणच होतो, हे मी वारंवार त्या इन्स्पेक्टरला पटवून द्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला फसवणूकीच्या आरोपावरून अटक केली. मनोजच्या आत्महत्येची केस स्टॅन्ड झाली तेव्हा माझं नशीब चांगलं होतं की काय म्हणून माझ्या कॉलेजमधल्या एक-दोन जणांच्या साक्षीमुळे हे सिद्ध झालं की मनोजचे आणि माझे संबंध मैत्रीच्या पातळीवर होते. पण मला जो वकील देण्यात आला होता त्याचं असं म्हणणं होतं की मनोजने आत्महत्या केलीच नाहिये. आत्महत्या भासवणारा तो एक खून आहे.

मी केसमधून निर्दोष सुटून घरी आले पण आईवडिलांच्या नजरेत मी कायमची अपराधी ठरले होते. तेही माझा काहीही गुन्हा नसताना. पण माझ्या शेजारच्याच घरात रहाणारा दिपक मात्र माझी बाजू घेऊन माझ्या आईवडीलांची समजूत काढत होता. दिपक आणि मी लहानपणापासून शेजारी रहात होतो, त्यामुळे त्याचं आमच्या घरी येणं जाणं पूर्वीपासूनच होतं.

मात्र मनोजची केस सुरू असतानाच दिपकचं आमच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. कधी आईची चौकशी करायला, तर कधी बाबांशी गप्पा मारायला दिपक येऊ जाऊ लागला. केस निकालात निघाल्यावर तर काही ना काही तरी कारण काढून दिपक माझ्याशीही बोलू पहात असे. त्याने माझी बाजू घेऊन आईबाबांची बरीच समजूत काढली होती त्यामुळे मनात नसलं तरी मी त्याच्याशी बोलत होते.

एक दिवस दिपकने आपण मुंबईला जात असल्याची घोषणा केली. त्याला नोकरी मिळाली होती मुंबईला. माझंही नाशिकमध्ये निरनिराळ्या ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय करणं सुरूच होतं. पण मनासारखी नोकरी मला मिळेना.

दिपकला मुंबईला जाऊन तीन महिने झाले असतील. एक दिवस त्याची आई आमच्या घरी आली. “दिपकचा फोन आला होता, दिपक खूप खूष आहे तिकडे,” असं बरंच काही माझ्या आईला सांगत होती. मग तिने एकदम तिचा मोहरा माझ्याकडे वळवला.

“तुही पहा की मुंबईला एखादी नोकरी. इथं नाहीतरी तुझं जमत नाहीच आहे आणि इथल्या प्रावेट हॉपिसात काय मिळणार क्लार्क बनून?”

“बरं पहाते.”

“अगं बरं काय? दिपक सांगत होता. तो एका कॉल सेंटरला गाडी चालवतो. तिकडे बर्यायच मुली काम करतात. पगारपण खूप जास्त मिळतो म्हणे. तुला हवं असेल तर नाव पत्ता देते कंपनीचा.”

“देऊन ठेवा. मी पाहिन चौकशी करून.”

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment