Saturday, August 1, 2009

गॉड ब्लेस यू... - पान १२

प्रतिक्रिया: 
“मला ही बातमी सरकारी वकिलांकडून कळली.” वर्मा खाली मान घालून पुटपुटला.

“जोरात बोला मि. बर्मा, तुमचं उत्तर कोर्टाला ऐकू गेलं पाहिजे.” समीर बॅ. खंदा-यांकडे एक कटाक्ष टाकत म्हणाला.

“दॅट्स ऑल युवर ऑनर.”

वर्मा निघून गेला तसं बॅ. खंदार्यांचनी पुढचा साक्षिदार बोलावला.

“अमोल प्रभाकर.”

नाव पुकारताच एक वीस-बाविशीचा युवक साक्षिदाराच्या पिंजर्यांत येऊन उभा राहिला आणि त्याने शपथ थेतली.

“नाव?”

“अमोल प्रभाकर.”

“काय काम करता?”

“कॉल इंडिया या कॉल सेंटरला कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो.”

“अमोल, समोरच्या पिंजर्या्त उभ्या असलेल्या तरूणीला ओळखता तुम्ही?”

“ओळखतो. माझ्याच प्रोसेसला काम करत होती ती.”

“प्रियाचे आणि तुमचे संबंध कसे होते?”

“मी प्रियाला मैत्रीण समजत होतं पण तिचं मात्र माझ्यावर प्रेम होतं.”

समीरने चमकून अमोलकडे पाहिलं. प्रियादेखील अमोलचं उत्तर ऐकून अवाक्‍ झाली होती.

“तुमचं प्रियावर प्रेम नव्हतं?”

“नव्हतं.”

“दॅट्स ऑल युवर ऑनर. क्रॉस.” समीरकडे पाहात बॅ. खंदारे म्हणाले.

समीर आपल्या खुर्चीतून उठला आणि शांतपणे एक एक पाऊल टाकत अमोलच्या पिंजर्या.पाशी गेला.

“अमोल, बडींग म्हणजे काय?”

“अं....?” अमोलने आपल्याला प्रश्न नीटसा कळला नाही असं दाखवलं.

“बडींग म्हणजे काय?” समीरने थोडया मोठया आवाजात विचारलं.

“बडींग म्हणजे एखाद्या अनुभवी एक्झिक्युटीव्हचा लाईव्ह कॉल ऐकण्यासाठी शिकाऊ एक्झिक्युटीव्हने त्याच्यासोबत बसणं आणि तो कॉल ऐकणं.”

“तुमच्या हाताखाली प्रियाने आठवडाभर ट्रेनिंग घेतलं.... अर्थात बडिंग केलं, राईट?”

“राईट, सर.”

“प्रिया तुमच्याबरोबर बडींग करत असताना तिचं तुमच्यावर प्रेम आहे, हे तुम्हाला केव्हा जाणवलं?”

“जाणवलं म्हणजे.... ती कधी कधी सहेतूक स्पर्श करायची, सूचक बोलायची त्यावरून मी तसा अंदाज बांधला.”

“अच्छा! काय बोलायची ती?”

“ती म्हणायची की तुझ्यासारखा लाईफ पार्टनर ज्या मुलीला मिळेल ती भाग्यवान असेल.”

“आणखी काय बोलायची?”

“असंच काहीतरी सूचक बोलायची.”

“तेच ते सूचक बोलणं ऐकायचं आहे कोर्टाला, बिनधास्त सांगा तुम्ही.” समीरने अमोलच्या नजरेला नजर भिडवत म्हटलं.

“युवर ऑनर, हे आरोपिच्या वकिलांनी काय चालवलंय? आरोपीचं आपल्यावर प्रेम होतं हे साक्षिदाराने आधिच सांगितलंय. साक्षिदार शपथ घेऊन खोटं बोलणार नाही, हे आरोपीच्या वकिलांनी लक्षात ठेवायला हवं.” बॅ. खंदारे उठत म्हणाले.

“माझ्या ते चांगलंच लक्षात आहे, युवर ऑनर,” समीर नम्रपणे म्हणाला पण मला पुन्हा एकदा माझ्या सहकारी मित्राना सांगावंसं वाटतं की कोर्टाला अंदाज नको असतात.

आरोपीच्या काही वाक्यामधून जर साक्षिदाराने काही निराळा अर्थ काढला असेल, तर ती साक्षिदाराची चूक आहे. आरोपीची नाही. उद्या मी पण सरकारी वकिलांना म्हणेन की त्यांच्या नाकासारखं माझं नाक असतं, तर मलाही भाग्यवान असल्यासारखं वाटलं असतं. याचा अर्थ माझं सरकारी वकिलांवर प्रेम आहे, असा होत नाही.”

“कुठून कुठे नेताय प्रकरण, सरदेसाई?” खंदारे वैतागून बोलले. त्यांचं वैतागणं साहजिकच होतं. समीरच्या त्या वाक्यामुळे कोर्टरूम खुसखुसत होती. समीरने पुढे बोलायला सुरूवात केली.

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या

No comments:

Post a Comment