Friday, August 14, 2009

गॉड ब्लेस यू.... - पान ३०

प्रतिक्रिया: 
शेवटी रस्ता सापडला! पुन्हा एकदा प्रियालाच बळी बनवावं लागणार होतं पण काही हरकत नव्हती. दिपकचा काटा काढण्याचा याहून सुंदर मार्ग मला दुसरा सापडला नव्हता.

मी दिपककडे प्रियाचा विषय काढला. दिपकही प्रियाकडे आकृष्ट झालेला दिसत होता. पण प्रियाने जिथे मनोजची डाळ शिजू दिली नाही तिथे दिपकची काय कथा? मी त्याला निराळाच मार्ग सुचवला. जे सरळ मार्गाने मिळत नाही, ते वाकड्या मार्गाने मिळवायचं. मी त्याला तो मार्ग सांगितल्यावर आधी तो दचकलाच!

“काय? मी तिच्यावर....अरे नाही नाही, शक्य नाही.” दिपक म्हणाला.

“नाही काय? ती तुला भाव देणार आहे का? नाही ना? मग काय हरकत आहे?” मी म्हणालो.

“त्यापेक्षा मी तिला एकदा डायरेक्ट विचारतोच ना?”

“आणि ती ’नाही’ म्हणाली तर?”

दिपकने माझ्या या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही पण तो तिला प्रपोज करणार याची मला खात्री होती. त्याने प्रियाशी काय बोलणं केलं हे मला माहित नाही पण पुढच्या वेळी तो मला भेटला तेव्हा त्याचा दुर्मुखलेला चेहेरा पाहून मी काय समजायचं ते समजून गेलो. मी सांगितलेल्या पद्धतीनेच प्रियाला ताब्यात घेणं कसं योग्य आहे हे मी त्याला पटवून दिलं. त्याला मदत करायची तयारीही दर्शवली. दिपक तयार झाला. आम्ही दोघांनी मिळून एक प्लॅन बनवला. त्यानुसार मी गोरेगावच्याच आनंद लॉज नावाच्या एका थर्ड क्लास लॉजमध्ये खोट्या नावाने पंधरा दिवसांचं बुकींग करून ठेवलं.

प्लॅनप्रमाणे ज्या दिवशी प्रियाचा शेवटचा ड्रॉप असेल, त्यादिवशी दिपक मला फोन करून ही सूचना देणार. मग मी प्रियाच्या आधी जो कुणी गाडीतून उतरणारा असेल, त्या व्यक्तिच्या एरियात दिपकच्या गाडीची वाट पहायची असं ठरलं होतं. प्रिया गाडीत एकटी उरल्यावर दिपकने काही ना काही कारण काढून दोन-तीन मिनिटं गाडी थांबवायची होती, म्हणजे मला डिकीत शिरता आलं असतं. त्यानंतर गाडी जी थांबणार ती सरळ अशा आडरानात जिथे प्रियाची किंकाळीही बाहेर जाऊ शकणार नाही. प्रियाचा सो कॉल्ड बॉडीगार्ड अमोल प्रभाकर ज्या दिवशी सुटीवर असेल, तो दिवस आमच्या प्लानसाठी सर्वात योग्य होता. पण त्यादिवशी प्रियाचं नशीबच खराब होतं. अमोलच्या तब्येतीत अचानक काहीतरी बिघाड झाला आणि तो घरी लवकर निघून गेला. दिपकने ताबडतोब मला फोन करून ही बातमी कळवली. त्या दिवशी संध्याकाळपासूनच पाऊस लागला होता. प्लान अंमलात आणण्यासाठी सुंदर दिवस होता तो.

त्य दिवशी गाडी कॉल सेंटरच्या बाहेर पडल्यापासून दिपक सतत माझ्याशी संपर्क ठेवून होता. नील परेरा उतरल्यावर प्रियाला करंगळी दाखवून दिपक बाहेर पडला. मी तेवढ्या अवधीत डिकीत जाऊन लपलो. पावसाच्या आणि विजांच्या आवाजात प्रियाला मी डिकीत शिरल्याचं कळलं पण नाही. दिपकने पुन्हा गाडी सुरू केली. ’गाडी आडरानात नेल्यावर मला कोणतीही खूण करू नकोस, मी स्वत:च बाहेर येईन,’ असं मी दिपकला आधीच बजावून ठेवलं होतं. त्यामुळे मला कोणताही इशारा न देता दिपक प्रियाच्या मागे लागला. इथेच माझा दिपकला खलास करण्याचा खरा प्लान सुरू होत होता.

माझ्या अपेक्षेप्रमाणे प्रिया दिपकला विरोध करून कारच्या बाहेर पडली आणि दिपकपासून लांब पळाली. दिपकही तिच्यामागोमाग धावला. त्याचा फायदा घेऊन मी डिकीतून बाहेर आलो आणि त्या दोघांच्याही नजरेला न पडता मी त्यांच्यात चाललेली झटापट पहात होतो. प्रियाने दिपकच्या हातातून पडलेला चाकू लांब फेकून दिला आणि मला कल्पना सुचली. मी सोबत आणलेला चाकू खिशात ठेवला, हॅन्डग्लोव्हज चढवले आणि त्या दोघांच्या नकळत प्रियाने फेकलेला चाकू उचलून घेतला.

प्रियावर बलात्कार झाला काय आणि न झाला काय मला काहीच फरक पडत नव्हता. कोणत्याही परिस्थितीत मला दिपकला जिवंत सोडायचं नव्हतं. प्रियाने दिपकवर हल्ला केला आणि दिपकला ढकलून देऊन ती कारच्या दिशेने पळाली. दिपक तिला पुन्हा पकडण्यासाठी उठला. त्याचवेळी मी मागून येऊन त्याच्या पाठीत चाकू खुपसला. दिपकने वळून मला पाहिलं आणि त्याला परिस्थितीची कल्पना आली. मी त्याला ढकलून दिलं पण तो चिवट निघाला. पुन्हा उठून तो कारच्या दिशेने धावू लागला. मीही दिपकच्या मागून पळत होतो. तेवढ्यात मला प्रिया कारच्या जवळ दिसली. मी पटकन एका झाडामागे लपलो.

ही कथा सुरूवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment