Monday, August 10, 2009

गॉड ब्लेस यू... - पान १९

प्रतिक्रिया: 
पण अमोल नुसतं बोलून थांबला नाही. शिफ्ट संपल्यावर आम्ही गाडीत बसलो. अमोलने जाणूनबुजून स्वत:च्या घराजवळ ड्रॉप घेतलाच नाही. म्हणाला, ’प्रियाला ड्रॉप करून मग चालत घरी जाईन.’ दिपकचा नाईलाज झाला. त्याने गाडी माझ्या घराच्या दिशेने वळवली.

त्यादिवशी रेहाना आणि सुल्ताना उतरून गेल्यावर अमोलने दिपकला उभं आडवं फायर करायला सुरूवात केली. ’पुन्हा जर प्रियाला त्रास दिलास तर तुझी चामडीच लोळवीन, असा दमही दिला.’ दिपकने अमोलची माफी मागितली. माझीही माफी मागितली. झाला प्रकार फक्त आम्हा तिघांतच होता.

त्यानंतर प्रत्येक दिवशी अमोल मला सोडायला येत असे आणि मग स्वत:च्या घरी पायी जात असे. हा प्रकार सुमारे आठवडाभर सुरू होता. २४ ऑगस्टला रात्री आठ-साडेआठच्या दरम्यान अमोलची तब्येत खूप बिघडली. त्याला उलट्यांवर उलट्या होऊ लागल्या. शेवटी फ्लोअर मॅनेजरने स्वत:च येऊन अमोलला ’घरी जा’ असं सांगितलं.

अमोल त्या दिवशी मेडिकल लीव्ह घेऊन घरी गेला. मला अमोलची इतकी काळजी लागली होती की तो आज रात्री ड्रॉपला माझ्यासोबत नाही हेही मी विसरले. जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा ट्रान्सपोर्ट सुपरवायझर अमोलच्या जागी नील परेराला अॅतडजस्ट करत होता.

मी रेहाना आणि सुल्तानाला रिक्वेस्ट केली की त्यांनी माझ्यानंतर ड्रॉप घ्यावा. पण त्यांनी नकार दिला. मी सुपरवायझरला माझी गाडी चेंज करायला सांगितली पण तो म्हणाला की आता काहीच करता येणार नाही. माझी नील परेराशी विशेष ओळख नव्हती पण म्हटलं, ’आपल्याच प्रोसेसला आहे तर एकदा रिक्वेस्ट करून पाहू य’. पण नीलनेही नाही म्हटलं.

मला घरी एकटं जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. निल रस्त्यात माझी समजूत काढत होता की शेवटच्या ड्रॉपला इतकं काही घाबरायचं कारण नाही वगैरे, वगैरे. पण त्याला खरी परिस्थिती माहीत नव्हती आणि माहित नसणंच चांगलं म्हणून मीही त्याच्या ’हो’ ला ’हो’ म्हणत होते. रेहाना आणि सुल्ताना गाडीतून उतरून गेल्यावर निल आणि माझ्यामधलं संभाषण जवळजवळ थांबलंच होतं. बाहेर पाऊस सुरूच होता. काही वेळाने निल उतरून गेल्यावर मी डोळे मिटून गाडीत बसले होते. मधेच दिपकने हाक मारली.

“प्रिया, आय अॅलम सॉरी.”

“अं....?”

“मी तुझ्याशी तसं वागायला नको होतं, त्या दिवशी. मलाच कळलं नाही मी काय बोलतोय ते.”

त्याच्या बोलण्याचा रोख मला कळत नव्हता म्हणून मी काही प्रतिक्रिया न देता त्याचं बोलणं ऐकत होते.

ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्या.

No comments:

Post a Comment